मालेगाव,
Islam Party in Malegaon मालेगाव महानगरपालिकेत महापौर निवडणुकीसाठी सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर इस्लाम पक्षाने महापौर निवडणुकीसाठी एआयएमआयएमकडे पाठिंब्याची मागणी केली असून दोन्ही पक्षांमध्ये सध्या चर्चा आणि वाटाघाटी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मालेगाव महानगरपालिकेत एकूण ८४ जागा असून महापौर निवडणुकीसाठी ४३ नगरसेवकांचा बहुमताचा आकडा आवश्यक आहे. मात्र निवडणूक निकालानंतर कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठता आलेला नाही. इस्लाम पक्ष ३५ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे, तर असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएमने २१ जागा जिंकत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाला १८ जागा मिळाल्या असून समाजवादी पक्षाने ५, काँग्रेसने ३ आणि भाजपने केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीतही इस्लाम पक्षाची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. मुस्लिमबहुल मालेगावमध्ये नव्याने स्थापन झालेल्या या पक्षाला तब्बल ४१.७ टक्के मते मिळाली आहेत. एआयएमआयएमला २५ टक्के, तर शिवसेना (शिंदे गट)ला २१.४ टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे इस्लाम पक्षाची चर्चा केवळ मालेगावपुरती न राहता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.
इस्लाम पक्षाची स्थापना आसिफ शेख रशीद यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये केली होती. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिले असून त्यांनी काँग्रेस आणि अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काम केले आहे. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीतील दमदार यशामुळे आसिफ शेख रशीद यांची राजकीय ताकद अधिक मजबूत झाली आहे. आता महापौरपद कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून येत्या काळात राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.