पोलिस दलाच्या वतीने गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १६ ते १८ जानेवारी दरम्यान ऑपरेशन ‘निशाणा’ ही मोहीम राबविण्यात आली. या ४८ तासांत गुन्हेगारांची झाडाझडती घेत मोठी कारवाई करण्यात आली. तसेच वरिष्ठ स्तरावरील आदेशान्वये २० जानेवारी ते २० फेब्रुवारी या दरम्यान Operation 'Muskan' ऑपरेशन ‘मुस्कान’ ही मोहीम राबविण्यात येणार असून रेकॉर्डवर असलेल्या जिल्ह्यातील हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यात येऊन त्यांना त्यांच्या योग्य पालकांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी आज सोमवार १९ रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
Operation 'Muskan' पोलिस अधीक्षक अग्रवाल म्हणाले की, जिल्ह्यात राबविलेल्या निशाणा या मोहिमेत फरार, पाहिजे असलेले आरोपी, अजामीनपात्र वॉरंट असलेले, कोर्टातून जामीन रद्द झालेले, रेकॉर्डवर असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी तसेच टॉप २० तील दारू विक्रेते, शरीराविरुद्धचे, मालमत्तेचे गुन्हे करणारे, एनडीपीएस गुन्ह्यातील, एमपीडीए मधील सुटलेले तसेच हद्दपार आरोपींचा शोध घेण्यात आला. प्रत्येक पोलिस ठाण्यात विशेष पथके तयारी करण्यात आली होती. वर्धा, आर्वी, पुलगाव आणि हिंगणघाट या चार उपविभागातील अधिकारी व पथके, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, पोलिस अधीक्षक कार्यालयातील ४ विशेष पथके तयार करण्यात आली. ४८ तास ही मोहीम राबविण्यात आली. रेकॉर्डवरील सराईत, आवश्यक आणि पाहिजे असलेल्या १२३ जणांची यादी तयार करण्यात आली. ११६ जणांची चौकशी करून १० जणांना अटक करण्यात यश आले. दारूविक्रेते, मालमत्तेचे गुन्हे तसेच शरीरविरुद्धचे गुन्हे करणार्या ३६४ जणांची चौकशी केली असून २९० आरोपी मिळून आले. एनडीपीएल गुन्ह्यातील ९६ पैकी ५७, आर्म अॅट अंतर्गत ११४ पैकी ५०, एमपीडीए अंतर्गत ३४ पैकी २५ आरोपी मिळून आले. तसेच दोन वर्षातील २२१ जणांची झाडाझडती घेतली असता ४६ आरोपी हाती लागले. अशा एकूण ८६६ आरोपींची चौकशी केली असता ६०२ आरोपी मिळून आले. त्यापैकी २४ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक जैन यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी उपस्थित होते.