...नहीं तो पैसा वापिस!

19 Jan 2026 09:48:48
 
दिल्ली दिनांक
pakistans ispr ‘‘ले आयो! तुम्हे जो करना है! दायेंसे आना, बायेंसे आना, उपरसे आना, नीचे आना, एकठ्ठे आना या किसीके साथ आना! एक बार मजा ना करा दिया तो पैसा वापिस!’’ हा एखाद्या हिंदी चित्रपटातील डॉयलाग वगैरे नाही तर पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी लेफ्ट. जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारतासंदर्भात उच्चारलेले शब्द आहेत. पाकिस्तानी जनरल इधरसे ‘आना’- उधरसे ‘आना’ असे म्हणत असले तरी पाकिस्तानची स्थिती जेब मेें नही ‘चार आना’ अशी आहे. लेफ्ट. जनरल चौधरी हे पाकिस्तानच्या आयएसपीआर म्हणजे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स, तिन्ही सेनादळांचे मुख्य माहिती अधिकारी आहेत. ऑपरेशन सिंदूर काळात तेच पाकिस्तानच्या वतीने दररोज पाकिस्तानी व जागतिक प्रसार माध्यमांशी संपर्क साधत होते.
 

अहमद शरीफ चौधरी 
 
 
 
मग्रुरीचा अर्थ : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे मनोबल का उंचावले हे समजण्यास मार्ग नाही. फिल्ड मार्शल असिम मुनीर यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात भारताच्या विरोधात उच्चारलेली भाषा आणि आता लेफ्ट. चौधरी यांची ही भाषा मिळतीजुळती आहे. भारत हा मर्सिडिस कार आहे तर पाकिस्तान हा गिट्टीने भरलेला ट्रक. गिट्टीने भरलेल्या ट्रकने मर्सिडिसला धडक दिली तर मर्सिडिसचे काय होईल याची जरा कल्पना करा अशा शब्दांत मुनीर बोलले होते.
पैसा वापिस... : चौधरी यांनी आपल्या खास शैलीत पैसा वापिस करण्याची भाषा उच्चारली असली तरी, ‘वापिस’ करण्यासाठी पाकिस्तानजवळ पैसा आहे कुठे? कधी जागतिक बँक तर कधी आंतरराष्ट्रीय नाणे निधी तर कधी चीन-सौदी अरेबिया यांच्याकडे भिकेची झोळी फिरवायची आणि त्यात जमा झालेल्या पैशातून आपला खर्च कसाबसा चालवायचा अशी स्थिती असणाऱ्या पाकिस्तानने पैसा वापिस करण्याची भाषा कशाच्या भरवशावर उच्चारावी हे अनाकलनीय आहे.
विमानांना मागणी? : पाकिस्तानने कराची एरो कॉम्प्लेक्समध्ये चीनच्या साहाय्याने जेएफ- 17 थंडर या लढाऊ विमानांचे उत्पादन सुरू केले आहे. या विमानांनी भारतासोबत झालेल्या संघर्षात फार मोठी कामगिरी बजावली असा पाकिस्तानचा दावा असून, त्यानंतर या विमानांना जोरदार मागणी येत असल्याचे पाकिस्तानचे सरंक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले आहे. ज्या प्रमाणात आमच्याकडे या विमानांच्या खरेदीची मागणी होत आहे ती पाहता आम्हाला आता परदेशी कर्जाची गरज राहणार नाही असा दावाही आसिफ यांनी केला आहे. आसिफ यांच्या या दाव्यानंतर, बांगलादेश व सुदान या दोन देशांनी पाकिस्तानकडून जेएफ-17 विमाने खरेदी करण्याची चर्चा सुरू केली आहे.
तैमूरची चाचणी : पाकिस्तानने 3 जानेवारी रोजी ‘तैमूर’ या आपल्या प्रक्षेपणास्त्राची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे पाकिस्तानने घोषित केले. पाकिस्तानी प्रचार माध्यमे तैमूरला पाकिस्तानी ‘स्टॉर्म शॅडो’ असे संबोधित आहेत. हे ब्रिटनच्या एका प्रक्षेपणास्त्राचे नाव आहे आणि युक्रेन युद्धात याचा वापर केला जात आहे. रशियाच्या प्रक्षेपणास्त्रांना प्रतिशह देण्यासाठी ब्रिटनने या प्रक्षेपणास्त्रांचा पुरवठा युक्रेनला केला आणि हे प्रक्षेपणास्त्र प्रभावी सिद्ध होत आहे. जमीन व समुद्रावरील आपले लक्ष्य अचूक भेदणारे प्रक्षेपणास्त्र असा याचा उल्लेख केला जात आहे.
 
तैमूरचा पल्ला 600 किलोमीटरचा असल्याचे सांगितले जाते. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास भारताची राजधानी नवी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई तैमूरच्या टप्प्यात असल्याचे पाकिस्तानने न बोलता सांगितले आहे. 13 फूट लांबी असणारे हे प्रक्षेपणास्त्र 18 ते 24 हजार फूट उंचीवर जात आपले लक्ष्य टिपू शकते.pakistans ispr यात फ्रान्स बनावटीची अत्याधुनिक अशी आदेश प्रणाली वापरण्यात आली आहे. तैमूर हे परंपरागत शस्त्रांसाठी वापरले जाणार असून, अण्वस्त्र वाहून नेणारे तैमूर विकसित केले जाईल काय याचा खुलासा पाकिस्तानने केलेला नाही. पण, येणाèया काळात तैमूरचा आण्विक अवतार तयार केला जाऊ शकतो असे मानले जाते.
‘ड्रोन’चा वापर : एका ताज्या घटनाक्रमात ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने प्रथमच भारतीय सीमेत काही ‘ड्रोन’ पाठविल्याची घटना घडली. सांबा, राजौरी, पूंछ या अतिदुर्गम भागात हे ड्रोन पाठविण्यात आले होते. भारतात घुसलेल्या व स्थानिक दहशतवाद्यांसाठी मादक पदार्थ व शस्त्रे पाठविण्यासाठी याचा वापर करण्यात आला असावा असा भारतीय सुरक्षा संस्थांचा कयास आहे.
2026 ची तयारी? : पाकिस्तान 2026 मध्ये भारताशी युद्ध करण्याची तयारी करीत आहे काय या प्रश्नावर चौधरी यांचे उत्तर होते, भारत आमचे अस्तित्व मानण्यास तयार नाही. आमची निर्मिती अल्लाने केली आहे. मग, भारत आमचे अस्तित्व कसे नाकारू शकता? जनरल चौधरी म्हणतात त्याप्रमाणे पाकिस्तानची निर्मिती खरोखरीच अल्लाने केली असेल तर मग अल्लाने पाकिस्तानच्या हाती कटोरा का दिला हा एक प्रश्नच आहे. की ही पण अल्लाचीच कृपा आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जनरल चौधरी वा कोणत्याही पाकिस्तानी नेत्याजवळ नाहीत.
कर्ज वाढले : दरम्यान, पाकिस्तानवरील विदेशी कर्ज सतत वाढत असून एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज अशी पाकिस्तानची स्थिती तयार झाली आहे. पाकिस्तान कर्जबाजारी झाला आहे. पाकिस्तान आपला शस्त्रसाठा वाढवीत असला तरी त्याचा परकीय चलनाचा साठा कमी होत आहे. यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून वारंवार समज दिली जात आहे. पण, तरीही पाकिस्तानचा युद्धज्वर कमी झालेला नाही. उलट ऑपरेशन सिंदूरनंतर तो वाढला आहे. पाकिस्तानी लष्करी अधिकारी पैसा ‘वापिस’ करण्याच्या वल्गना करीत असले तरी त्यांच्याजवळ विदेशी कर्ज परत करण्यासाठीच पैसा नाही, ते कसा पैसा ‘वापिस’ करणार?
अर्थसंकल्पाची तयारी : आणखी 12 दिवसांनी 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला जाईल. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्यासमोरील एक मोठे आव्हान पेट्रोलियम पदार्थांच्या किमती स्थिर ठेवणे हे राहणार आहे. कारण, भारताला स्वस्त दरात मिळणारे रशियाचे कच्चे तेल आता कमी मिळणार आहे. भारताच्या एकूण आयातीपैकी 31 टक्के आयात रशियातून होत होती. आता यात कपात झाली आहे. याचा परिणाम म्हणजे भारताला सौदी अरेबिया व इराण या आपल्या परंपरागत तेल पुरवठा करणाèया देशांकडून तेल आयात करावी लागणार आहे. इराणचे तेल काही प्रमाणात स्वस्त आहे. पण, तेथील स्थितीही तणावाची झाली आहे. त्यातही अमेरिकेने इराणवर लावलेले आर्थिक निर्बंध हा भारतासाठी एक अडचणीचा मुद्दा ठरू शकतो. या साऱ्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढण्यात होईल असे मानले जाते. रशियातून आयात केल्या जाणाऱ्या तेलाच्या भरवशावर भारताला पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात यश आले होते. पण, आता रशियन तेलाच्या आयातीत झालेली घट व दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारतील चढते भाव याचा परिणाम भारतीय बाजारावर होईल असे मानले जाते. याला हाताळणे हे अर्थमंत्र्यांसमोरील मोठे आव्हान राहणार आहे.
मोठे आव्हान : राष्ट्रपती ट्रम्प यांनी भारतावर आणखी मोठे आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. याचा विचार अर्थमंत्र्यांनी व सरकारने केलेला असेल. त्याला हाताळण्यासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसावे अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रत्येक अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांसाठी एक आव्हान राहात असला तरी अमेरिकेने लावलेल्या आयात शुल्कामुळे 2026-27 चा अर्थसंकल्प सरकार समोरील मोठे आव्हान ठरणार यात शंकाच नाही.
Powered By Sangraha 9.0