नवी दिल्ली,
Questions about Jadeja's role न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ अशी गमावल्यानंतर टीम इंडियातील बदलांवर चर्चा रंगू लागली आहे. या पराभवानंतर संघातील काही अनुभवी खेळाडूंच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, त्यात सर्वात जास्त चर्चा होत आहे ती अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या एकदिवसीय कारकिर्दीबाबत. अलीकडच्या काळात जडेजाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न झाल्याने त्याच्या संघातील स्थानावर गंभीर विचार सुरू असल्याचे चित्र आहे.

बराच काळ एकदिवसीय संघाबाहेर राहिल्यानंतर जडेजाला पुन्हा संधी मिळाली होती, मात्र तो त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकलेला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसह मागील सहा सामन्यांमध्ये तो प्रभाव टाकण्यात अपयशी ठरला. २०२४ पासून जडेजाने १३ एकदिवसीय सामने खेळले असून, त्यात त्याने केवळ १३७ धावा केल्या आहेत, त्या देखील ३४.२५ च्या सरासरीने. गोलंदाजीमध्येही त्याची कामगिरी फारशी दमदार राहिलेली नाही. या कालावधीत त्याने ४५.१६ च्या सरासरीने फक्त १२ विकेट्स घेतल्या आहेत. याउलट, अक्षर पटेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत स्वतःचा दावा अधिक मजबूत केला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत अक्षरने चांगली कामगिरी केल्याने संघ व्यवस्थापनासमोर पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या पुढील एकदिवसीय मालिकेसाठी संघाची निवड करताना जडेजावर पुन्हा विश्वास दाखवला जाईल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विराट कोहलीसोबत २००८ च्या अंडर-१९ विश्वचषकात खेळलेला माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी याने जडेजाच्या भवितव्याबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. जडेजाबद्दल बोलताना गोस्वामी म्हणाला की, गेल्या अनेक वर्षांपासून जडेजा भारतासाठी सामना जिंकणारा खेळाडू राहिला आहे, मात्र आता प्रश्न असा आहे की न्यूझीलंडविरुद्धचा सामना त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना ठरेल का. पुढील एकदिवसीय मालिका जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणार असून, त्यापूर्वी जडेजाच्या कारकिर्दीबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत त्याने दिले.