धाराशिव,
Thackeray group in Dharashiv धाराशिवमध्ये ठाकरे गटावर मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सध्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी केलेल्या युतीच्या निर्णयानंतर २९ नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याची रणनीती चर्चेत आहे. धाराशिव तालुक्यातील या पक्षप्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना या प्रवेशामुळे मोठा धक्का बसला असल्याचे स्थानिक राजकीय निरीक्षक सांगतात.
याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला धक्का बसला आहे. येथे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गोर्डे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा आज दुपारी १ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार असून, गोर्डे यांचे हजारो समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रवेशांमुळे भाजपची ताकद धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढली आहे, तर ठाकरे गटाचे स्थानिक स्तरावर राजकीय प्रभाव कमी होण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.