वसंत वाहोकर यांच्या नव्या काव्यसंग्रहाचे घरगुती प्रकाशन

19 Jan 2026 19:45:34
नागपूर,
new poetry collection ज्येष्ठ कवी वसंत वाहोकर यांच्या नव्या काव्यसंग्रह ‘तीन दगडांची चूल आणि चंद्र’ याचे आगळ्यावेगळ्या आणि आपुलकीच्या वातावरणात घरगुती पद्धतीने प्रकाशन नागपूर येथील त्यांच्या ‘राजधानी’ निवासस्थानी पार पडले. पत्नी मेघना वाहोकर यांच्यासह अंगणातील झाडे, घराच्या भिंती आणि शब्दांशी नातं जपणाऱ्या या चिरतरुण दांपत्याच्या स्नेहपूर्ण आतिथ्यात हा सोहळा संपन्न झाला. अहमदनगर येथील ‘शब्दालय’ प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ ज्येष्ठ चित्रकार सरदार जाधव यांनी रेखाटले आहे. एकूण ७४ कवितांचा समावेश असलेल्या या संग्रहाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल वसंत वाहोकर यांनी साध्या व अनौपचारिक मनोगतातून उपस्थितांशी संवाद साधला.
 
new poetry collection
 
प्रकाशनानंतर कवितेची एक छोटेखानी मैफल रंगली. अंगणातील फुलांच्या सान्निध्यात आणि निळ्या नभाखाली झालेल्या या मैफलीत मित्रकवींनी कविता वाचन केले व मुक्तपणे काव्यरसाचा आस्वाद घेतला. यापूर्वी ‘स्वप्नांवरून हत्ती झुलत जातात’ आणि ‘मनातील ऋतूंच्या नोंदी’ या काव्यसंग्रहांमधून मराठी रसिकांना समृद्ध करणाऱ्या वसंत वाहोकर यांच्या कवितेचा नवा आविष्कार या संग्रहातून वाचकांसमोर येत आहे. new poetry collection या कार्यक्रमास ज्येष्ठ कवी प्रफुल शिलेदार, तीर्थराज कापगते, मनीषा अतुल, संध्या पवार, श्याम धोंड, सुनील शिनखेडे, रश्मी पदवाड मदनकर, सुषमा मुलमुले, शुभदा फडणवीस यांची उपस्थिती होती. आपुलकी, सर्जनशीलता आणि कवितेच्या उत्सवाने नटलेला हा प्रकाशन सोहळा उपस्थित कवी व रसिकांसाठी दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला.
सौजन्य: रश्मी मदनकर, सपंर्क मित्र
Powered By Sangraha 9.0