अग्रलेखः
turbulent present गेल्या चार वर्षांपासून जगावरची अस्थिरतेची सावली गडद बनत चालली आहे. यामध्ये सर्वच देश विनाकारण भरडले जात आहेत. स्वतःला महाशक्ती म्हणवून घेणारे अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी स्वीकारलेल्या स्वार्थी धोरणांमुळे सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात मुस्लिम कट्टरपंथीयांच्या धर्मांध राजकारणामुळे आणि अनेक भागांत मध्ययुगीन काळाप्रमाणे त्यांचे वर्तन असल्याने वातावरण आणखीनच चिघळले आहे. यामध्ये जीवित आणि संपत्तीचे नुकसान झाले ते सर्वसामान्यांचेच. इस्रायल-पॅलेस्टाईन, इस्रायल-इराण, इराण-लेबनॉन, रशिया-युक्रेन संघर्षात आतापर्यंत लाखो सामान्य नागरिक किडे- मुंग्यासारखे मेले. वित्तहानीची तर मोजदादच होऊ शकत नाही. आज अर्धे जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे, असे म्हणावे लागेल. जगात सुरू असलेली हिंसा, अनाचार आणि गरिबांचे होत असलेले दमन पाहता सध्याचे युग हे ज्ञानाचे आणि बुद्धिवंतांचे आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे वाटू लागते. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये जाऊन जो नंगानाच केला, हिंसा केली, शेकडो निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले, त्याची तुलना चंगेझखानच्या क्रूरतेशीस करावी लागेल. आपण काय करतो आहोत आणि कुणाला डिवचत आहोत, याचे भान नसलेल्या या हमासच्या हिंसाचाराचे अत्यंत वाईट परिणाम गाझातील जनता अजूनही भोगत आहे. हमासच्या पाठीशी कोण आहे, हे सर्वश्रुत आहे.
आजही इस्रायलचे गाझावरील हल्ले थांबलेले नाहीत. कधीकाळी अत्यंत समृद्ध, झगमगाटाने भरलेल्या गाझाचे रूपांतर आता स्मशानात झाले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत 81 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. यात प्रामुख्याने लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. हजारोंना अन्नाअभावी प्राण गमवावे लागले. आजही लक्षावधी पॅलेस्टिनी नागरिक गढूळ पाणी पिऊन आणि फाटक्या-तुटक्या तंबूत नरकासमान जीवन कंठित आहेत. पळीभर भाजी, भाताची काही शितं आणि ब्रेडच्या तुकड्यांसाठी मदत घेऊन येणाऱ्या वाहनांच्या मागे धावणारी मुलं आणि बुरखाधारी महिला पाहून आपले मन हळहळते खरे; पण, ही परिस्थिती ज्या हमासमुळे आली, त्या दहशतवादी संघटनेला आजही पाकिस्तान, मलेशिया आणि अरबस्थानातील काही सुन्नी देश पाठीशी घालत आहेत. मरण समोर असूनही तिथल्या बहुसंख्य जनतेची कट्टरता जात नाही. लाखो निष्पाप बालके आणि महिलांचा मृत्यू होत असताना कुठल्या धर्मासाठी हे सर्व काही केले जात आहे, असा प्रश्न त्यांना पडत नाही. जीवापेक्षा कुठला धर्म मोठा आहे? आज पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाची धग कमी झाली असली तरी हल्ले सुरूच आहेत. मनात आणले असते तर अमेरिकेसह जगातील अन्य आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या (वैचारिक किंवा मानवीयदृष्ट्या नव्हे) महाशक्ती असलेल्या अमेरिका-रशियासारख्या देशांना गाझातील हिंसाचार थांबविणे अशक्य नव्हते. पण, येथेही स्वहित आडवे आले. माणसं मरत राहिली अन् जग तमाशा पाहत बसले. मुस्लिम उम्माह केवळ कागदावरच्या गोष्टी आहेत, प्रत्यक्षात कुणीही गाझाच्या मदतीसाठी आले नाहीत आणि येणारही नाहीत.
2022 मध्ये आधीच रशिया-युक्रेन संघर्ष सुरू असतानाच गाझा युद्ध सुरू झाल्याने जग नाहक अशांततेत ढकलले गेले. गेली चार वर्षे हे युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंची अपरिमित अशी हानी सुरू आहे. फेब्रुवारी 2022 पासून सुरू झालेल्या या संघर्षात रशियाची मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली. रशियाचे आतापर्यंत सव्वा लाख सैनिक ठार मारल्याचा दावा युक्रेनने केला; तर आम्ही पावणेपाच लाख युक्रेनियन सैनिक ठार केल्याचा दावा रशियाने केला. युक्रेन सरकारने मात्र, आपले आतापर्यंत 31 हजार सैनिक मृत्युमुखी पडल्याचे म्हटले आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाची व्याप्ती केवळ अरब देशांपर्यंतच मर्यादित राहिली, पण रशिया-युक्रेन युद्धाची झळ साèया जगाला पोहोचत आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, या म्हणीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा अत्यंत कडवा आणि लहरी अध्यक्ष अमेरिकेला मिळाल्याने जगावर संकट ओढवल्यासारखे झाले. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी अनेक देशांवर प्रचंड व्यापार शुल्क आकारल्याने जगातील पुरवठा साखळीच विस्कळीत झाली आहे. बाजारपेठा अस्थिर झाल्या आहेत. याचा सर्वांत जास्त फटका प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या विशाल देशाला बसला. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे सुद्धा ट्रम्प यांच्याच जातकुळीतले आहेत, असे म्हणावे लागेल. कारण, अतिमहत्त्वाकांक्षा आणि कच्चे कान असलेल्या या नेत्याने नाटोहट्ट धरल्याने रशियाचे अरिष्ट युक्रेनवासीयांवर ओढून घेतले गेले. अन्नधान्य, कच्चे तेल, खनिजांनी समृद्ध असलेल्या देशाचे प्रमुख झेलेन्स्की यांनी साम्राज्यवादी आणि विरोधकांना क्रूरतेने चिरडून टाकण्याची प्रवृत्ती असलेले ब्लादिमिर पुतिन यांच्याशी शत्रुत्व घेऊन युक्रेनला कित्येक दशके मागे नेले. शक्ती असली, पण विवेक नसला तर विनाश अटळ असतो. अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या महाशक्तींना हे वास्तव न उमगणे हे जगासाठी घातक ठरणारे आहे. गेल्या चार वर्षांपासून युक्रेन रशियासोबत झुंज देत आहे ती स्वबळावर नव्हे; तर अमेरिका आणि युरोपियन देशांच्या मदतीवर.
आज जगात जेवढे मोठे संघर्ष निर्माण झाले आहेत-सुरू आहेत ते सारे भूमीसाठी आणि संसाधनांसाठी. रशियाकडे जगातील सर्वांत जास्त भूमी असूनही दुसऱ्या देशांची जमीन गिळंकृत करण्याची राक्षसी भूक पुतिन यांना लागलेली आहे. क्रिमिया यापूर्वीच गिळला. आता युक्रेनचा उत्तरी प्रांतही त्यांना हवा आहे. जे पुतिन करीत आहेत, तेच करण्याच्या दिशेने डोनाल्ड ट्रम्प यांनीही पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांची गिधाडी नजर ग्रीनलॅण्डवर पडली आहे. त्यामुळे युरोपात आणखी एक संघर्ष पेटण्याची भीती निर्माण झाली आहे. आम्ही नाही तर रशिया, चीन ग्रीनलॅण्ड घेईल, असे तकलादू कारण देत ट्रम्प यांनी हालचाली सुरू केल्या. व्यापाराचे प्यादे पुढे करीत ट्रम्प जगाला वेठीस धरत आहेत. ज्या भारताचे गुणगाण करताना ट्रम्प थकत नाहीत, त्या देशावरच अधिकतम व्यापारशुल्क लादण्याचे काम ट्रम्प यांनी केले. गेल्या अनेक महिन्यांपासून भारत 50 टक्के टॅरिफचा सामना करतो आहे. नाही म्हटले तरी आपल्या अर्थव्यवस्थेवर याचा नकारात्मक परिणाम होतोच आहे. ग्रीनलॅण्ड हा डेन्मार्कचा भूभाग आहे. या भूभागावर हवाई संरक्षण प्रणाली तयार करण्यासाठी आम्हाला ग्रीनलॅण्ड हवा असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. आपल्या भूभागाचे संरक्षण करण्यासाठी डेन्मार्क आणि अन्य युरोपियन देशांनी काही लष्करी तुकड्या रवाना केल्याने ट्रम्प संतापले आणि त्यांनी डेन्मार्कसह सात देशांवर 10 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. युरोपियन देशांना अमेरिकेचा हस्तक्षेप नको आहे. कारण, तसेही ग्रीनलॅण्डच्या परिसरात रशिया आणि चीन यांच्या हालचाली सुरू आहेत. नकाशावर ग्रीनलॅण्डचे अस्तित्व पाहता या भूभागातूनच हवाई मार्गाने हल्ला होण्याची भीती अमेरिकेला वाटत आहे. रशिया, अमेरिकेच्या धोरणामुळे युरोपात अशांतता असतानाच आता अरबस्थानातही नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.turbulent present इराणमध्ये प्रचंड हिंसाचार सुरू असून गृहयुद्धात आतापर्यंत 16 हजारांपेक्षा नागरिकांचा मृत्यू झाला तर साडेतीन लाख जखमी झाले आहेत. या संघर्षामागेही अमेरिका असल्याची पक्की धारणा इराणच्या सर्वोच्च मुस्लिम नेत्याची झाली आहे. वरकरणी ती चूक म्हणता येत नाही. अमेरिकेने इराणकडे विमानवाहू युद्धनौका रवाना केली आहे. मात्र, इराणनेही हार मानलेली नाही. या देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी तर ट्रम्प यांना गुन्हेगार म्हणून घोषित केले. अमेरिकेच्या तुलनेत इराण चिमुकला देश. पण, हा देशही फणा काढून उभा आहे. सर्वांना भांडण करण्याची खुमखुमी आहे; मग तो कुणीही असो. वाईट वाटते ते ताकद असलेल्या देशांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कृत्यांचे. वास्तविक पाहता महाशक्ती म्हणवून घेणाऱ्या देशांनी जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. काही देशांनी आगळिक केली असेल तरी व्यापक मानवहितासाठी मनाचा मोठेपणा दाखविणे आवश्यक असते. समज देण्यासाठी इतर मार्ग असतात. दुर्दैवाने अमेरिका, चीन, रशियासारखे बलाढ्य देश स्वत:च इतर देशांचा भूभाग बळकाविण्याची इच्छा बाळगून आहेत आणि हेच तिघे जगाला शांत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या संयुक्त राष्ट्रांचे म्होरके आहेत. अमेरिकेचा ग्रीनलॅण्डवर, रशियाचा युक्रेनवर तर चीनचा व्याप्त काश्मिरातील जमिनीवर डोळा आहे. एकूणच आज जगभरात अशांततेचे वातावरण निर्माण होण्यास हे महाशक्ती म्हणविणारे देश कारणीभूत ठरत आहेत. शांततेसाठी महाशक्तीने अधिक जबाबदारीने आणि इतरांनी संयमाने वागायचे असते. प्रामुख्याने धर्मांधता आणि विस्तारवाद ही इंधने संघर्ष पेटवत आहेत हे साऱ्यांना दिसते; पण कुणीच थांबत नाही; कुणीच थांबवतही नाही.