श्रद्धेच्या पुनर्जागरणाचा नवा अध्याय!

02 Jan 2026 05:15:40
 
 प्रफुल्ल व्यास
 
new year celebration इंग्रजी नववर्षाच्या स्वागतालाही आता केवळ पार्ट्या, मद्य आणि जल्लोष इतकाच अर्थ उरलेला नाही तर वर्धेसारख्या ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा, सुंदरकांड, नामस्मरण, भजन-कीर्तन यांचा नाद उमटू लागला आहे. अयोध्या असो वा शिर्डी, शेगाव, तुळजापूर, अक्कलकोट, तिरुपती बालाजी आदी देशातील धार्मिक स्थळांवर नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची उसळलेली गर्दी हे केवळ दर्शन किंवा मौजमजा, सहल नव्हे तर सश्रद्धेचे प्रतीक आहे. आज जी पिढी साठीत आहेत त्यांनी आपल्या उमेदीच्या काळात (अपवाद वगळता) आमचा देवापेक्षा आमच्या हातावर विश्वास सांगत ‘दोन हस्तक आणि एक मस्तक’ सांगितले जात होते. त्याही पुढे जाऊन अंधश्रद्धेलाही त्यांच्याच काळात थोडी चेतना मिळाली होती.
 
 

प्रफुल्ल व्यास 
विज्ञानाची कास new year celebration धरत श्रद्धेला मागासपणा म्हटले जाऊ लागले होते. देवळं ओस पडू लागली होती! पण, काळाच्या ओघात समाजाने काही अनुभव घेतले आणि हातावरच्या विश्वासाला संकटात आधार देणाèया देवाच्या शक्तीचीही तितकीच गरज असल्याची जाणीव होऊ लागली. परिणामी देवांना, देवळांना ‘गोल्डन डे’ येऊ लागले. ‘एक लोटी जल, सारे समस्या का हल’ या विश्वासाने महादेवाच्या मंदिरात रांग लागू लागली हा सकारात्मक बदल आमची पिढी अनुभवते आहे. मराठी नववर्षाचे स्वागत करताना घराघरांत गुढी उभारल्या जातात. विदर्भात वर्धेतून गुढीपाडव्याच्या पहाटे ‘पाडवा पहाट’ हा कार्यक्रम सोशॉलिस्ट चौकात करण्याचा एक प्रघात पडला आणि त्याला 5 हजाराच्यावर वर्धेकर येतात. नागपूर, अमरावतीतही असाच कार्यक्रम होतो. विदर्भात सर्वदूर ‘पाडवा पहाट’ वा ‘सांज पाडवा’ होऊ लागला. हे सर्व केवळ परंपरा म्हणून नाही तर अभिमान म्हणून साजरे होत आहे. मराठी नववर्ष म्हणजे आपली कालगणना, आपला इतिहास, आपली संस्कृती! जसे इंग्रजी नववर्ष साजरे करणे वाईट नाही तसेच आपले मराठी नववर्षाचे विस्मरण होणे उचित नाही, याची जाणीव आता समाजाला होऊ लागली आहे.
 
 
दोन्हीचा सुवर्णमध्य साधण्याची कला आजच्या पिढीला म्हणजे आमच्या भविष्याला साध्य होऊ लागली, हेही काही कमी नव्हे! इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी वर्धेत सामूहिक हनुमान चालीसाचे आयोजन ही केवळ एक धार्मिक घटना नाही. ती सामूहिकतेची, संघटनाची आणि सार्वजनिक श्रद्धा ठरते आहे. 16 वर्षांपूर्वी एका राम मंदिरातून सुरू झालेला हनुमान चालीसा जवळपास 700 मंदिरांपर्यंत पोहोचला आहे. दरवर्षी 1 जानेवारी रोजी गल्लीगल्ली, मोहल्यामोहल्यातील मंदिरांमध्ये हनुमान चालीसा होऊ लागला. त्याच्या नामस्मरणातून समाजाला बळ मिळते, आत्मविश्वाास मिळतो. सुंदरकांडाच्या पठनातून रामकथेचा संदेश पुन्हा पुन्हा मनावर कोरला जातो. यावर्षी नववर्षाच्या स्वागताला अयोध्येतही प्रचंड गर्दी होती. शिर्डीत साईंच्या चरणी नतमस्तक होणारी गर्दी असो, शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा, कोल्हापूर, तुळजापूरला मातेच्या दर्शनासाठी आलेले कुटुंब असोत किंवा अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या नामस्मरणात तल्लीन झालेले भाविक असो या सर्वात श्रद्धेचा एकसमान धागा असून तो आता जगण्याचा अर्थ शोधतो आहे. आज शेगाव येथे दर्शनाला सात तास लागले तर सप्तशृंगी येथे 30 हजार भक्तांनी दर्शन घेतले. माणूस आज पुन्हा अर्थ शोधतोय् आयुष्याचा, कष्टांचा, यश-अपयशाचा! विज्ञानाने सुविधा, वायुगती, माहिती दिली. मात्र, समाधान हिरावून घेतले. त्यानंतर एकत्र वादळ आलं. स्पर्धा आली. ताण वाढला, एकटेपणा वाढल्याने देव आठवला. त्यामुळे आजचा सामूहिक हनुमान चालीसा होणारा दिवस उगवला! इंग्रजी नववर्षाच्या स्वागताला सामूहिक प्रार्थना, भजन, नामस्मरण जोडले जाणे ही सकारात्मकताच म्हणावी लागेल. देवळं पुन्हा गजबजत आहेत; त्याचबरोबर समाजकार्य, शिक्षण, आरोग्य, सेवा यातही धार्मिक संस्थांचा सहभाग वाढतो आहे. शिर्डी, शेगाव, अक्कलकोटसारख्या ठिकाणी केवळ दर्शन नाही तर अन्नछत्र, रुग्णसेवा, शिक्षणाची सोय दिसते. हीच खरी श्रद्धा जी केवळ मागते नाही तर देतेसुद्धा. पूर्वी ज्याला सण-उत्सव कंटाळवाणे वाटत होते, तोच तरुण आज ढोल-ताशांच्या तालावर नववर्षाचे स्वागत करतो आहे, सामूहिक हनुमान चालीसात सहभागी होतो आहे. देवळं ओस पडली अशी खंत व्यक्त केली जात होती. ती खंत इतिहासजमा होताना दिसते आहे. आता पुढे पुन्हा एक चळवळ सक्रिय करावी लागणार आहे ती म्हणजे वाढदिवसावर पाश्चात्त्यांचे आक्रमण! मेणबती विझवणे आणि केक तोंडाला फासणे या किळसवाण्या प्रकारातून बाहेर पडण्यासाठी, पाडण्यासाठीचा गतिरोधक ओलांडायाचा आहे... बघा जमले तर 21 व्या शतकातली नवीन उपलब्धी होईल.
 
 
 
 
 
9880903765 मोबाइल नंबर 
Powered By Sangraha 9.0