99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या सातारा नगरीत तब्बल 32 वर्षांनी होत असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ गुरुवारी रोवली गेली. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या निवडणुकांच्या राजकारणाच्या रटाळ, काहीशा उद्वेगजनक आणि काहीशा निराशाजनक बातम्यांच्या गदारोळापासून मराठमोळ्या महाराष्ट्राचे लक्ष आता साहित्य आणि संस्कृतीच्या परंपरेची पालखी वाहून नेणाèया सारस्वतांच्या मेळाव्याकडे लागले आहे. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची गादी असलेल्या मराठा साम्राज्याच्या राजधानीत हे साहित्य संमेलन होत आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्याची प्रतिष्ठा अधिक वृद्धिंगत झाली आहे. हा मराठी साहित्य संस्कृतीचा एक शुभशकुन आहे, असे म्हणावयास हवे. तसेही, सगळीकडेच सारे काही पारदर्शक नसते, असे वाटण्याजोगी स्थिती सर्वच क्षेत्रांत अलिकडे दिसते. साहित्याचे विश्व त्यास अपवाद असल्याचा छातीठोक दावा करता येणार नाही. आजवरच्या जवळपास प्रत्येक साहित्य संमेलनात अनेक प्रकारचे वाद निर्माण झाले. यंदाचे 99 वे साहित्य संमेलन त्यास अपवाद ठरले तर साहित्यशारदेची पालखी वाहून नेण्याची ही परंपरा शतकाच्या उंबरठ्यावर प्रगल्भ आणि समृद्ध झाली, असे म्हणता येईल.
संमेलनाचे पडघम वाजू लागले की, त्याआधी वादविषयांना तोंड फुटते. ही परंपराच झाल्याने, साहित्य संमेलने ही साहित्य विषयापेक्षा वादानेच अधिक गाजविली जातात, अशी समजूत दृढ व्हायला लागली; त्यालाही आता काही दशके उलटली आहेत. ‘साहित्य संमेलन हा एक प्रचंड वार्षिक समारोह असून त्याच्या अध्यक्षपदासाठी सर्व महत्त्वाकांक्षी स्त्री-पुरुष साहित्यिकांची भयंकर चढाओढ लागत असे. साहित्याशी संबंध असलेल्या व नसलेल्यांचाही या चढाओढीत समावेश असल्याने त्यातून अनेकांच्या सात्त्विकपणाचे मुखवटे गळून पडतात’, असा शेरा जुन्या पिढीतील प्रख्यात साहित्यकार व वात्रटिकाकार चिं. वि. जोशी यांनी 1958 साली, ‘अध्यक्षीय निवडणूक समारोह’ या कथेतून मारला होता. वादाचा हा वारसा तेव्हापासूनच सुरू आहे, असे म्हणता येईल. त्या वाक्यातून वादाची मुळे उघडी पडली आणि तरीही ती हट्टाने खोलवर रुजत गेली. त्यामुळे संमेलनाआधी वाद झडावेत किंवा वाद निर्माण होण्याची शक्यताच नसेल तर कोणताही साहित्यबाह्य मुद्दा उकरून तो कुटत बसावा, असा जणू मराठी मनाचा बाणाच असला पाहिजे. राजकारणी नेत्यांनी संमेलनाच्या मंचावर हजेरी लावावी का, हा शाश्वत वादाचा मुद्दा, अन्य काहीच नसण्याच्या काळात पुढे येतो आणि वर्षानुवर्षे त्यावर चर्चा करूनही त्याचे उत्तर सापडत नाही, अशा चाचपडल्या अवस्थेतच अनेक संमेलने संपन्न होऊनही जातात. राजकारण आणि साहित्य व्यवहार यांच्यातील नात्याशी या वादाचे धागेदोरे जोडले गेलेले आहेत. ‘मराठी भाषा फाटक्या वस्त्रांनिशी मंत्रालयाच्या दाराशी वर्षानुवर्षे ताटकळत उभी आहे,’ अशी विदारक व लाजीरवाणी खंत कविवर्य कुसुमाग्रजांनी व्यक्त केली; त्यालादेखील आता चार दशकांहून अधिक काळ लोटला असावा. आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठीची ती दुर्दैवी दशा संपून समृद्धीचे दिवस सुरू होतील, या अपेक्षांना धुमारे फुटत असताना होणाèया या साहित्य संमेलनात त्या दृष्टीने काही समजूतदार, प्रगल्भ आणि परंपरेच्या नकोशा समजुतींना मूठमाती देणारे काही घडावे ही मराठीजनांची अपेक्षा आहे. अंगावरच्या फाटक्या वस्त्रांची जागा संपन्न वस्त्रांनी घ्यावी, डोईवरच्या काटोरी मुकुटाची जागा समृद्धीची प्रतीके मिरविणाऱ्या सुवर्णमुकुटाने घ्यावी आणि मराठीने मंत्रालयाच्या दारासमोर ताटकळत उभे राहण्याऐवजी मंत्रालयाने मराठीला सन्मानाच्या पायघड्या घालाव्यात, असे दिवस अभिजाततेमुळे येऊ घातले आहेत. त्या अपेक्षांचे सोने होईल, असे काही संमेलनाच्या मंचावरून घडेल, अशीही मराठीजनांची अपेक्षा आहे. उद्धाराच्या अपेक्षेने मायमराठीला मंत्रालयाच्या दाराशी ताटकळावे लागेल, हे वास्तव आपण कित्येक वर्षे नाईलाजाने स्वीकारलेले होते. त्यामुळे राजकारण किंवा सत्ताकारण आणि मराठी साहित्य व्यवहार हे एकमेकांपासून कधी स्वतःस अलग करतील, ही समजूत आता कायमची पुसली तरच त्यासंदर्भातील वादास मूठमाती मिळेल. तसे व्हावे हीदेखील माय मराठीची अपेक्षा आहे. कारण मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची अभिवृद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचा खरा काळ सुरू झाला आहे. असे प्रयत्न करण्याची भाषाप्रेमींची इच्छा सुफळ संपूर्ण झाली, तर संमेलनांच्या परंपरेला वेगळी झळाळी येईल, यात शंका नाही.
सुमारे दीडशे वर्षांपूर्वी 1878 साली सुरू झालेल्या साहित्य संमेलनाच्या परंपरेने यंदा 99 व्या संमेलनाचा टप्पा गाठला, पण अनेक वर्षांपासून समोर असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यातच बराचसा काळ गेला आणि पुढे त्यात प्रश्नांची भरच पडत गेली. प्रत्येक संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षाने नव्या अध्यक्षाच्या खांद्यावर प्रश्न आणि समस्यांचे ओझे सोपवावे आणि तीच परंपरा पुढेही जपली जावी, असेच साहित्य संमेलनांबाबत होत गेल्याचे दिसते. आजवरच्या साहित्य संमेलनांत केवळ प्रश्न मांडले गेले. ते अगदीच अनाठायी आहे असे नाही, पण एखाद्या तरी साहित्य संमेलनाने अगोदर मांडल्या गेलेल्या प्रश्नाची उकल केली असती, तर नव्या प्रश्नांची यादी मर्यादित ठेवता आली असती. यंदाच्या साहित्य संमेलनात उद्घाटनाच्या दिवशी, आज ‘जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी प्रकाशन व्यवहार कोठे आहे,’ या विषयावरील परिचर्चेतून या यादीत नवी भर पडणार असावी. आशेचा एक किरण म्हणजे उत्तराच्या शोधासाठी काहीसा अवसर या संमेलनाच्या आखणीने राखून ठेवला आहे. ‘मराठी कोशवाङ्मयाच्या विस्ताराच्या दिशा’ या विषयावर होणाèया परिसंवादात पुन्हा मर्यादांवर चर्चा न होता, विस्ताराच्या नव्या दिशा शोधण्याचा आशादायक प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा गैर ठरणार नाही.
मराठी साहित्य, भाषा, कविता, 99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Satara, लोकजीवन, संस्कृती, परंपरांच्या चिंतेत आता एका नव्या चिंतेची भर पडली आहे. ‘मराठी समाज विचारभ्रष्ट होत आहे का, या अवस्थेतून त्याला बाहेर काढण्याची क्षमता आजच्या मराठी साहित्याकडे आहे का?’ या परिसंवादातही नवा प्रश्नच मांडला गेला आहे. मुळात ते खरोखरीच तसे आहे की, साहित्यविश्वास तसा आभास होत आहे, याचा अगोदर शोध घ्यावा लागेल. त्यासाठी या विश्वात झपाट्याने पसरत चाललेल्या आभासी समजुतींच्या आहारी न जाता प्रामाणिकपणे व तटस्थतेने या प्रश्नाकडे पाहावे लागेल. कारण प्रश्नावर चर्चा करण्याची परंपरा कोठे तरी थांबली पाहिजे, शंभर साहित्य संमेलने भरवूनही केवळ प्रश्नांवरच चर्चा होत असेल, तर उत्तरांचा शोध सुरू केव्हा होणार आणि उत्तरे केव्हा सापडणार, याचाही विचार आता व्हायला हवा. ‘मराठी साहित्यविश्वात भयकथा, रहस्यकथा, गूढकथांचा दुष्काळ आहे का’ हाही एक चर्चेचा विषय या निमित्ताने मंचावर येणार आहे. जुन्या पिढीतील काही नामवंत लेखकांमुळे या साहित्य प्रकाराने मराठी साहित्यविश्वात आपले स्थान निर्माण केले होते, हे खरेच आहे. त्यानंतर ती परंपरा फारशी जपली गेली नाही, हेही खरे आहे. त्यामुळे ‘दुष्काळ आहे’ हे या प्रश्नावरील उत्तर असणार हेदेखील ओघानेच येते. मग पुन्हा त्या प्रश्नावरच चर्चा करण्यात काय हशील आहे? उलट, या दुष्काळमुक्तीसाठी संमेलनाचा मंच काय करणार त्यावर या चर्चेतून विचारमंथन व्हायला हवे. तसे होईल ही अपेक्षा करण्यात गैर नाही.
‘मागे वळून पाहणे’ ही 99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Satara, मराठी संस्कृतीची सवय आहेच. ती चांगली आहे यातही शंका नाही. पण प्रत्येक इतिहास हा भविष्याची दिशा दाखविणारा ठरतो, असे म्हटले जाते. मागे वळून पाहिल्यानंतर जे काही दिसते, त्यापासून शिकून पुढच्या वाटा अधिक मोकळ्या करण्याच्या मानसिकतेची जोड या सवयीला मिळाली पाहिजे. स्त्री चळवळीच्या 50 वर्षांच्या वाटचालीकडे मागे वळून पाहताना, पुढच्या वाटचालीला संमेलनातून काय दिशा मिळते, याचीही मराठीजनांस उत्सुकता आहे. या चर्चेकडून त्या उत्तराची अपेक्षा आहे. कारण अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच्या मराठीसमोरील संधी आणि आव्हानांची चर्चाही या संमेलनाच्या निमित्तनने होऊ घातली आहे. हा केवळ मराठी भाषेसमोरील आव्हानांचा किंवा संधींचा मुद्दाच नाही. तो मराठी संस्कृतीचादेखील मुद्दा आहे. मराठी संस्कृतीची जोपासना करणाèया घटकांत मराठी भाषेचा- मग ती बोली भाषा असो की लिखित भाषा- मुद्दा महत्त्वाचा आहे. प्रत्येक दहा मैलावर भाषेचा लहेजा बदलतो असे म्हणतात; तरीही मराठी संस्कृतीचा एकसंधपणा मात्र टिकून असतो. तो तसाच राहिला पाहिजे, यासाठी भाषेची लय, लहिजा यांचे सारे सौंदर्य जपून आणि प्रत्येक लहेजाचा आदर राखून संस्कृतीचे संवर्धन व्हावे यासाठीही संमेलनांच्या मंचावर उत्तर शोधले गेले पाहिजे. प्रश्न अनेक आहेत, त्याची चर्चा करण्याची परंपरा आता संपावी आणि उत्तरांचा व उपायांचा शोध सुरू व्हावयास हवा. त्यासाठी शंभराव्या संमेलनाच्या उंबरठ्यावर उभे राहून त्याचा सुमुहूर्त करावयास हरकत नाही.