आर्वी,
surendra-kumbhare : तालुक्यातील चिंचोली (डांगे) येथील वीर पुत्र सुरेंद्र कुंभरे (३९) याचा दिल्ली येथे उपचारादम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. आज २ रोजी शासकीय इतमातात जवान सुरेंद्रवर अन्त्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील चिंचोली डांगे येथील सुरेंद्र कुंभरे २००९ पासून लष्कराच्या आयटीबिपी (भारत-तिबेट सीमा सुरक्षा दल) विभागात कार्यरत होते. ते आजारी असल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील लष्काराच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. जवान सुरेंद्र यांच्या मृत्यूची वार्ता गुरुवारी गावात धडकताच गाव शोकसागरात बुडाले. सुरेंद्र कुंभरे २०२७ मध्ये सेवानिवृत्त होणार होते.
सुरेंद्र कुंभरे यांचे पार्थिव दिल्ली येथुन विमानाने नागपूर येथे आले. नागपूर येथुन लष्कराच्या वाहनाने चिंचोली येथे आज २ रोजी आणण्यात आले. जवान सुरेंद्र यांचे पार्थिव घरी अन्त्यदर्शनासाठी ठेण्यात आला. त्यानंतर गावातील स्मशानमूमीत शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारत तिबेट सीमा सुरक्षा दल व पोलिस विभागाद्वारे मानवंदना देण्यात आली. श्रद्धांजली कार्यक्रमाला खासदार अमर काळे, आ. सुमित वानखेडे, आ. दादाराव केचे, तहसिलदार हरीश काळे, भारत तिबेट सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी, ठाणेदार सतीश देहंकर व मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. सुरेंद्र यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील व मोठा आप्त परिवार आहे.