तभा वृत्तसेवा यवतमाळ,
e mitra chatbot, विविध योजनांची माहिती नागरिकांना पारदर्शक आणि विनामूल्य स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून ‘ई-मित्र’ चॅटबोट प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. त्याद्वारे योजनेची परिपूर्ण माहिती केवळ दोन क्लिकवर मिळत असल्याने नागरिकांकडून वापर वाढत असून, जिल्ह्यात आतापर्यंत 42 हजार 452 नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे.
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना विनामूल्य व पारदर्शक स्वरूपात मिळावी या हेतूने जिल्हाधिकाèयांच्या संकल्पनेतून ‘ई-मित्र’ चॅटबोट प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित या प्रणालीत वापरकर्त्यांचे प्रश्न समजून घेऊन अचूक आणि उपयुक्त माहिती देण्याची क्षमता असते.
केवळ दोन क्लिकवर उपलब्ध
‘ई-मित्र’ चॅटबोटद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या एकूण 50 महत्त्वाच्या योजनांची माहिती केवळ दोन क्लिकवर उपलब्ध होत आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज राहत नाही. योजना कोणासाठी आहे, पात्रता काय आहे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि अर्ज कुठे करायचा, याची अचूक व संपूर्ण माहिती घरबसल्या मिळत असल्याने नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचत आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना या चॅटबोटचा मोठा लाभ होत आहे. योजनेची माहिती वेळेत मिळाल्यामुळे नागरिकांना थेट अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत होत आहे. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्याबरोबरच प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ होण्यासही मदत होत आहे.
वापर कसा करावा ?
ही प्रणाली वापरण्यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईलवरून व्हॉटस्अॅपद्वारे 89992 57536 या क्रमांकावर ‘हाय’ असा संदेश पाठवावा. त्यानंतर विविध योजनांची नावे दर्शनी भागात दिसतील. त्यानुसार आपणास हव्या असलेल्या योजनेचा क्रमांक समाविष्ट केल्यानंतर संपूर्ण माहिती उपलब्ध होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ‘ई-मित्र चॅटबोट’मुळे शासकीय योजनांची माहिती तत्काळ व घरबसल्या मिळत आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.