“इंदूरमध्ये पाणी नाही तर जणू विष वाटले गेले आणि प्रशासन कुंभकर्णी झोपेत होते"

02 Jan 2026 15:09:45
इंदूर,
Rahul Gandhi : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पिण्याच्या पाण्यामुळे जुलाब आणि उलटीची साथ पसरली असून, आतापर्यंत किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १४०० हून अधिक नागरिक आजारी पडले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे, कारण इंदूर गेली आठ वर्षे सलग भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.
 
 
RAHUL GANDHI
 
 
 
या गंभीर प्रकारावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करताना राहुल गांधी म्हणाले की, “इंदूरमध्ये पाणी नाही तर जणू विष वाटले गेले आणि प्रशासन कुंभकर्णी झोपेत होते. घराघरात शोककळा आहे, गरीब हतबल आहेत आणि त्यावर भाजप नेत्यांची अहंकारी वक्तव्ये ऐकायला मिळत आहेत. लोकांनी वारंवार दुर्गंधीयुक्त व घाणेरड्या पाण्याबाबत तक्रारी केल्या, तरीही त्याकडे दुर्लक्ष का झाले? सांडपाणी पिण्याच्या पाण्यात कसे मिसळले? वेळेत पाणीपुरवठा बंद का करण्यात आला नाही? जबाबदार अधिकारी आणि नेत्यांवर कारवाई कधी होणार?”
 
 
 
 
 
 
राहुल गांधी पुढे म्हणाले की, हे प्रश्न विनाकारण नाहीत तर जबाबदारी निश्चित करण्यासाठी आहेत. स्वच्छ पाणी हा उपकार नसून नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि या हक्काच्या उल्लंघनासाठी भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार, निष्काळजी प्रशासन आणि असंवेदनशील नेतृत्व जबाबदार आहे. मध्य प्रदेश आता कुशासनाचे केंद्र बनले असून, कधी खोकल्याच्या सिरपमुळे मृत्यू, कधी सरकारी रुग्णालयात उंदरांमुळे बालकांचे बळी, तर आता दूषित पाणी पिल्याने नागरिकांचे प्राण जात आहेत. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे गप्प असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
दरम्यान, इंदूरचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. माधव प्रसाद हसानी यांनी सांगितले की, एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा अहवालानुसार भागीरथपुरा परिसरात पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाइपलाइनमध्ये गळती झाली होती. या गळतीमुळे पाणी दूषित झाले आणि याच भागातून साथीची सुरुवात झाली. संबंधित ठिकाणी पाइपलाइनच्या वरच शौचालय बांधलेले असल्याचेही समोर आले आहे.
 
प्रयोगशाळा तपासणीतून हे स्पष्ट झाले आहे की, जुलाब आणि उलटीची साथ दूषित पिण्याच्या पाण्यामुळेच पसरली. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, भागीरथपुरा येथील १७१४ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ८५७१ नागरिकांची तपासणी झाली. यापैकी ३३८ जणांमध्ये सौम्य लक्षणे आढळली, ज्यांच्यावर घरीच प्राथमिक उपचार करण्यात आले. साथीच्या आठ दिवसांत एकूण २७२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी ७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या २०१ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील ३२ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0