भंडारा,
mogarkasa-tiger-cub-death-incident : नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा संवर्धन राखीव क्षेत्र आणि त्याला लागून असलेल्या भंडारा जिल्ह्यातील लेंडेझरी संवर्धन क्षेत्रात वाघिणीचा बछडा मृत अवस्थेत आढळून आल्याच्या घटनेने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पहिल्या दिवशी एका पर्यटकाला बछड्याचा मृतदेह आढळला, तर दुसऱ्या दिवशी त्याचा केवळ एक पाय सापडल्याने हे प्रकरण अधिकच संशयास्पद बनले आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षकांनी नागपूर मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांनी सहा सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीत नितेश देवगडे, विभागीय वन अधिकारी (विजिलन्स), मनोज मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक – काटोल, अरुण पेंदोरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी फ्लाइंग स्क्वॉड नागपूर तसेच नागपूरचे मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे तसेच लवादा-२ कक्ष क्रमांक ३६ लेंडेझरी वनपरिक्षेत्र भंडारा वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने भंडारा सहाय्यक वनसंरक्षक रितेश भोंगाडे आणि भंडारा मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान यांनाही या समितीत समाविष्ट करण्यात आले आहे. ही समिती लवकरच घटनास्थळी भेट देऊन चौकशी करणार आहे.
मानद वन्यजीव रक्षकांच्या तक्रारीनुसार रविवार, २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेतीनच्या सुमारास प्रतिबंधित पर्यटन क्षेत्र असलेल्या लेंडेझरीच्या कक्ष क्रमांक ३६ मध्ये पर्यटक हार्दिक राठोड यांना वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. काही दिवसांपूर्वी या अल्पवयीन बछड्याचा त्याच्या आईसोबतचा व्हिडीओ व फोटो व्हायरल झाला होता. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी मृतदेह सापडला ते क्षेत्र पर्यटनासाठी पूर्णतः प्रतिबंधित आहे. अशा परिस्थितीत पर्यटक हार्दिक राठोड तेथे कसे पोहोचले, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हार्दिक राठोड यांनी जिप्सी चालक व गाईड यांना या प्रकरणाची कोणतीही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊ नये, अशी ताकीद दिल्याचा आरोप आहे.
दुसऱ्या दिवशी स्थानिक टूर ऑपरेटर ऋतुराज जयस्वाल यांनी मृत बछड्याचे छायाचित्र मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवले. त्यानंतर वनविभाग हालचालीत आला, मात्र अद्यापही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणारे पर्यटक हार्दिक राठोड आणि ऋतुराज जयस्वाल यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच वाघ मृत्यूची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणालाही उशिरा देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वनविभाग कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे काय, अशी शंका व्यक्त होत आहे. वेळेत निष्पक्ष चौकशी न झाल्यास हे प्रकरण थंड्या बस्त्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता चौकशी समिती सत्य बाहेर काढते की प्रकरण हातातून निसटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणातील दिरंगाईमुळे वनविभागाच्या भूमिकेवर बोट ठेवले जात आहे. भंडाऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान, नदीम खान, पंकज देशमुख, नागपूरचे रोहित कारु, उधमसिंग यादव, अविनाश लोंढे, अजिंक्य भटकर तसेच गोंदियाचे सावन बाहेकर आणि मुकुंद धुर्वे यांनी मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांच्याकडे दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच भंडाऱ्यातील तीनही मानद वन्यजीव रक्षकांनी भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह यांची भेट घेऊनही कारवाईची विनंती केली आहे. यावेळी योगेंद्र सिंह यांनी समितीमार्फत सखोल चौकशी केली जाईल आणि कोणत्याही दोषीला मोकाट सोडले जाणार नाही, असा विश्वास दिला आहे.