तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
rape-case-of-a-minor-girl : बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी वणी तालुक्यातील आरोपी प्रशांत ठाकरे (नायगाव) यास न्यायालयाने दोषी ठरवत 20 वर्षे सश्रम कारावासाची कठोर शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल केळापूर येथील विशेष न्यायालयाने शुक्रवार, 2 जानेवारी रोजी दिला. नायगाव, ता. वणी, जि. यवतमाळ येथील एका अल्पवयीन बालिकेवर आरोपीने तिच्या घरासमोर एकटी असताना जबरदस्तीने अत्याचार केला. आरोपीने पीडितेच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने सुरुवातीला ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र, काही दिवसांनी तिची तब्येत बिघडल्याने वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाणे वणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 तसेच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा सिद्ध झाल्याने प्रकरण विशेष न्यायालयात चालविण्यात आले.
न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय अहवाल व तपासातील पुरावे सादर करण्यात आले. सर्व पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले. त्यानुसार बालकांचे लैंगिक अधिकार कायद्यान्वये 20 वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची तरतूदही करण्यात आली आहे. सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
हा निकाल केळापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश (विशेष) अभिजित देशमुख यांनी सुनावला. प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तपासाचे काम वणी पोलिस ठाण्याच्या अधिकाèयांनी केले. या निकालामुळे बाललैंगिक अत्याचाराविरोधातील लढ्यात न्यायव्यवस्थेची कठोर भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.