आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंह गुरूवारीच न्यायालयासमोर हजर

02 Jan 2026 21:17:37
चंद्रपूर,
roshan-kule-kidney-sale-case : किडनी विक्री प्रकरणातील दिल्लीतील प्रतिष्ठित आरोपी डॉक्टर रवींद्रपाल सिंह यास 2 जानेवारीला चंद्रपूर जिल्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश होते. मात्र, डॉ. सिंह गुरूवार, 1 जानेवारीलाच हजर झाला. त्याने अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला आणि निघूनही गेला. त्याच्या अर्जावर शनिवार, 3 जानेवारीला सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामीन मिळू नये म्हणून पोलिस आता प्रयत्न करणार आहेत. मात्र, गुरूवारी आरोपी चंद्रपुरात येऊन गेला तरीही पोलिसांना त्याची भनक लागली नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
 
CHAND
 
दिल्ली न्यायालयाने, आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंह याला 2 जानेवारीपर्यंत चंद्रपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे 1 जानेवारी रोजी डॉ. सिंग चंद्रपूरच्या न्यायालयात हजर झाला. आता या संदर्भात चंद्रपूर न्यायालयात 3 जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली आणि तामिळनाडूतील डॉक्टरांच्या सहभागानंतर विशेष पोलिस पथकाने 29 डिसेंबर रोजी डॉक्टर सिंग यांना दिल्लीत ताब्यात घेतले होते. परंतु, धुक्यामुळे विमान पहाटे 4 वाजता उड्डाण करू शकले नाही. त्यामुळे 24 तासांच्या आत डॉक्टरांना चंद्रपूर न्यायालयात हजर करणे शक्य झाले नाही. अशा परिस्थितीत त्याला पुन्हा दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात हजर करण्यात आले. तो एक नामांकित डॉक्टर असल्याचे सांगून न्यायालयाने त्याला अंतरिम जामिन मंजूर केला आणि त्याला 2 जानेवारी रोजी चंद्रपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले होते.
Powered By Sangraha 9.0