सेवासदन : शिक्षण सेवेचे समृद्ध शतक

02 Jan 2026 05:30:32
Sevasadan educational institution सेवासदन संस्थेचा भाग होणे, हा माझ्या सार्वजनिक जीवनातील एक समृद्ध टप्पा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी करणाऱ्या रमाबाई रानडे यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा चालविणाऱ्या संस्थेचे नेतृत्व करणे, हे माझ्यासाठी आपणच एका शाळेत प्रवेश घेण्यासारखे होते. अ. रा. गोखले-सुशीलाबाई गोखले यांच्या संस्कारात वाढलेल्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन माझ्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू झाला. एक साधे रोप लावायचे म्हटल्यावर चांगली माती असून चालत नाही; त्या रोपट्याला रोज पाणी द्यावे लागते. त्याला खत टाकावे लागते. रोज निगा राखावी लागते. पालक होऊन त्याचे रक्षण करावे लागते तरच त्या रोपट्याचे वृक्ष होत असते. अनेक ऋतू बघितलेले सेवासदन नावाचे एक भव्य वृक्ष अन् त्याची सावलीही आता 100 वर्षांची होतेय. त्या वृक्षाच्या सावलीत काम करणे, हा मी माझाच गौरव समजते.
 

Sevasadan educational institution 
2007 पासून मी संस्थेची Sevasadan educational institution  अध्यक्ष आहे. पूर्वी कार्यकारिणीत होते; संस्थेत सक्रिय नव्हते. बापूसाहेब भागवत, वासंती भागवत आणि रोहिणी गोडबोले यांच्या आग्रहामुळे मी या संस्थेत महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली. पुढच्या काळात ज्युनियर कॉलेज, सीबीएसई शाळा, सिनियर कॉलेज, एनडीए अभ्यासक्रम सुरू झाला. परिसर सुंदर झाला. शाळेची लोकप्रियता वाढली, याचा खूप आनंद आहे.100 वर्षांच्या या प्रवासात संस्थेने अफलातून प्रगती केली, पण हा मार्ग सोपा नव्हता. अनेक संघर्षांवर, अडचणींवर मात करून हा टप्पा गाठला आहे. मी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा माझ्यासाठी एक व्यासपीठ तयार होते. अ. रा. गोखले यांनी शाळा सुरू केली, पण त्यांच्यासह जुन्या लोकांनी अतिशय कष्टातून सेवासदन नावाचे कुटुंब उभे केले होते. मी त्या कुटुंबात नव्याने सामील झाले होते. संस्थेतील जुनी-जाणती मंडळी आजही संस्थेसाठी झटत आहेत; त्यांनी नवे बदल करण्यासाठी, नवे उपक्रम सुरू करण्यासाठी मला मोलाची साथ दिली. त्यामुळे आज संस्थेने जे भव्य रूप धारण केले आहे, त्याचे श्रेय त्याच मंडळींनी जाते. माझ्या सासुबाई कै. भानुताई गडकरी यांनी संस्थेतून माँटेसरीचे ट्रेनिंग घेतले होते. त्यामुळे मला संस्थेबद्दल माहिती होती. संस्थेचे कार्य माहिती होते. ‘टीम वर्क’ हे या संस्थेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. कुठलीही जबाबदारी पालकत्व घेऊन करण्याची कमालीची वृत्ती संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाची आहे. कार्यकारिणी असो, शिक्षक असोत किंवा शिक्षकेत्तर कर्मचारी, आपल्याला दिलेली जबाबदारी समर्पणातून पार पाडण्याची भावना प्रत्येकात आहे. एकमेकांबद्दल किंतु-परंतु मनात नाही. एकमेकांबद्दलचा विश्वास, आपुलकी आहे. एखाद्याने घेतलेला निर्णय चुकला, तर दोष देण्यापेक्षा त्याला सांभाळून घेण्याची भावना सर्वांमध्ये आहे. याच कारणांनी संस्था एवढ्या वर्षांचा समृद्ध प्रवास करू शकली आणि याच कारणांनी संस्था दिवसेंदिवस लौकिक प्राप्त करीत आहे. एखाद्या संस्थेतील प्रत्येक व्यक्ती शतसंवत्सरी सोहळा उत्तमरीत्या साजरा करण्याचा ध्यास घेऊन कार्य करीत असेल, तर यापेक्षा मोठे यश तरी कुठले असावे!
 
 
 
मी अनेक संस्थांमध्ये Sevasadan educational institution  काम केले, पण शैक्षणिक संस्थेचे काम केलेले नव्हते. त्यातही रमाबाई रानडे यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जाणाèया संस्थेचे नेतृत्व करायचे म्हणजे आव्हानच होते. रमाबाई रानडे यांच्याबद्दल प्राथमिक माहिती मला होती. दरम्यानच्या काळात त्यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तकं वाचली. त्यांचा संघर्ष जाणून घेतला. स्त्री शिक्षण चळवळीत त्यांचे योगदान समजून घेतले. त्यामुळे काम करणे सोपे झाले. महत्त्वाचे म्हणजे संस्थेतील प्रत्येकाने मला समजून घेतले आणि सामावून घेतले. माझ्यापेक्षा बापूसाहेब आणि वासंती भागवत वयाने आणि अनुभवाने मोठे आहेत. त्यांची मला उत्तम साथ मिळतेय. सेवासदन हा तर या मंडळींचा श्वास आहे. सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास त्यांच्या मनात असतो. रमाबाई रानडे शिक्षण-प्रबोधन पुरस्कार सुरू करण्याची कल्पना बापूसाहेब भागवतांनीच मांडली. हा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला न देता शिक्षण क्षेत्रात समर्पित वृत्तीने काम करणाèया संस्थेला देण्याचा निर्णय झाला. रमाबाई रानडे यांचे काम खूप मोठे आहे, पण त्यांच्या नावाने एकही पुरस्कार नव्हता. 2016 पासून आम्ही हा पुरस्कार सुरू केला. पहिल्या वर्षी अर्ज मागवले, पण नितीनजींनी आम्हाला अर्ज मागवण्यापेक्षा चांगल्या संस्थांचा शोध घेण्याचा सल्ला दिला. आज हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जातो.
 
 
बदलत्या काळानुसार Sevasadan educational institution  संस्थेतही अनेक नवे बदल झालेत. डिजिटल शिक्षण देणे आवश्यक होते. स्मार्ट बोर्ड उपलब्ध करून देण्यात आले. काही गोष्टी मनाला पटत नाहीत; त्यातही आपण विद्यार्थ्यांचे, समाजाचे प्रबोधन करण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने बदल करू शकतो, याचा आम्ही विचार करतो. उत्तम नागरिक घडविण्याच्या दृष्टीने जे जे काही करता येईल, ते संस्था करीत असते. त्यामुळेच शिक्षक-पालकांमध्ये उत्तम संवाद आहे. त्यांच्यात उत्तम नातं आहे. बहुतांश मुलं गरीब कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांचंही भावनिक पालकत्व घेण्याची जबाबदारी संस्थेतील प्रत्येक शिक्षकाने स्वीकारली आहे. पाचवी ते दहावी या सहा वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षी एक स्तोत्र विद्यार्थ्यांना पाठ झाले पाहिजे, असा आमचा प्रयत्न असतो. या स्तोत्रांचे स्वर, संस्कार आणि महत्त्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचत असते. काही मुलांचे पालक अशिक्षित आहेत, कष्टकरी आहेत. दोघांनीही मोलमजुरी केल्याशिवाय कुटुंबाचा गाडा रेटणे शक्य नाही. अशा घरांमध्ये संध्याकाळी दिवे लागल्यानंतर, घरात कुणी पाहुणे आल्यानंतर मुलं मोठ्यांना वाकून नमस्कार करतात, तेव्हा खèया अर्थाने संस्थेतून मिळणाèया संस्काराचे दर्शन पालकांना घडते.
 
 
2 जानेवारी 2025 पासून पुढचे वर्ष सेवासदन संस्था शतसंवत्सरी वर्ष साजरे करणार आहे. हे वर्ष नव्या निर्धाराचे, नव्या निश्चयाचे असणार आहे. वर्षभरात वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून पुढचा प्रवास सुरू होणार आहे. या प्रवासातील प्रत्येक टप्पा समृद्ध व्हावा, यादृष्टीने आम्हाला पाऊल टाकायचे आहे. विद्येमुळे विनम्रता येते; विनयामुळे पात्रता येते. पात्रतेमुळे धन प्राप्त होते, धनातून धर्म घडतो आणि धर्मामुळे सुख मिळते. शिक्षण सेवा हा आमचा धर्म आहे आणि या धर्माचे योग्यरीत्या पालन करून आम्हाला आदर्श निर्माण करायचा आहे.
‘विद्या ददाति विनयं, विनयाद्याति पात्रताम् ।
पात्रत्वाद्धनमाप्नोति, धनाद्धर्मं ततः सुखम् ।।’

कांचन गडकरी
(अध्यक्ष, सेवासदन शिक्षण संस्था)
 
 
मनशक्ती प्रयोग केंद्र
लोणावळ्यातील मनशक्ती केंंद्राचे कार्यक्रम सेवासदन संस्थेतील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांसाठी आयोजित केले जात आहेत. उत्तम नागरिक, आदर्श शिक्षक आणि जबाबदार पालक घडविण्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. कार्यशाळांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, बाल मानसशास्त्र, ज्ञान-विज्ञान, एकाग्रता यांचे प्रशिक्षण दिले जाते.
 
 
मुलींची सैनिकी शाळा
सेवासदन संस्थेने मुलींची सैनिकी शाळा सुरू करायला हवी, अशी कल्पना बापूसाहेब भागवत यांनी मांडली आहे. नाशिकला अशी शाळा आहे, पण इकडे नाही. त्यामुळे आपल्या भागातील मुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 

एक वाढदिवस, एक पुस्तक
संस्थेच्या कार्यकारिणीत, शिक्षकांमध्ये, शिक्षकेत्तर कर्मचाèयांमध्ये कुणाचाही वाढदिवस असेल तर त्याने एक पुस्तक शाळेला द्यायचे, असा उपक्रम आम्ही राबवितो. त्यामुळे संस्थेच्या ग्रंथालयात मोलाची भर पडतेय आणि एक चांगली सवय सर्वांना लागत आहे.
 
 
मोबाईलचा विळखा दूर करायचाय
शाळेतील मुलांनीच कथा लिहायच्या आणि त्यांच्यातच स्पर्धा आयोजित करायची, असा उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे. मुलांना पुस्तकं वाचायला देऊन वाचनाची गोडी लावण्याच्या दृष्टीने उपक्रम सुरू करायचा आहे. मोबाईलच्या विळख्यातून मुलांना बाहेर काढायचे असेल तर त्यांना पर्याय द्यावा लागेल. अशा उपक्रमांमधून हा पर्याय निर्माण होऊ शकतो, असे मला वाटते.
Powered By Sangraha 9.0