मोरेश्वर बडगे
Maharashtra municipal elections 2025 राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पाहायला मिळालेला अभूतपूर्व गोंधळ सुसंस्कृत राजकारणाला लाजवणारा होता. कित्येक वर्षांनंतर महापालिकांच्या निवडणुका लागल्या. त्यामुळे त्या लढण्यासाठी इच्छुकांची अस्वस्थता समजण्यासारखी आहे. पण एवढा गोंधळ कोणी अपेक्षिला नव्हता. ज्यांना उमेदवारी मिळाली ते खुश आहेत. ज्यांना मिळाली नाही ते जमेल त्या मार्गाने आपली नाराजी काढत आहेत. साèयाच राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी शेवटच्या दिवसांपर्यंत रखडली होती. महायुतीच्या तिकिटाला सोन्याचा भाव आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकमेकांविरोधात उभे दिसतात. महाविकास आघाडीमध्येही गोंधळाचे असेच चित्र आहे. बंडखोरीला उधाण आले आहे. पुण्यात तर अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपाच्या विरोधात उभी ठाकली आहे. मात्र, निकालानंतर सर्वांना महायुतीतच यायचे आहे, याची दोघांनाही कल्पना आहे. 15 दिवसांचा हा खेळ आहे. मात्र प्रचार करताना साèयाच नेत्यांची अडचण होणार आहे. एक चित्र स्पष्ट दिसते. याही निवडणुकीत विरोधी पक्ष कुठेही मजबुतीने दिसत नाही. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत हेच चित्र होते, तसल्याच निवडणुका पुन्हा होताना दिसतील. तेव्हाही महायुतीतले मित्र पक्षच एकमेकांशी टक्कर देत होते. आताही तेच दिसेल. दिसायला हा गोंधळ दिसतो. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही रणनीती आहे. जिंकून येईल तो आपला हा फॉर्म्युला आहे.
29 महापालिकांमध्ये निवडणुका असल्या, तरी खरी चुरस मुंबईमध्ये आहे. गेली 25 वर्षे मुंबई महापालिका ठाकरे कुटुंबाकडे एकहाती होती. पुढेही ती आपल्याकडे ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. गेल्या निवडणुकीत युतीचे सरकार असताना भाजपा आणि शिवसेना विरोधात लढले होते. तेव्हा एकसंध शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या तर भाजपाला 82. दोन जागांचा फरक होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबईत भाजपाचा महापौर बसवायचा यासाठी फडणवीस यांनी फार आधीपासून व्यूहरचना केली आहे. भाजपाला तोंड देऊ पाहणाèया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची दयनीय अवस्था आहे. शिवसेना फुटली आहे. शिवसेना हा पक्ष, त्याचे निवडणूक चिन्ह... सारे काही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आले आहे. मुख्यमंत्री होण्याच्या हव्यासापायी उद्धव ठाकरेंनी भाजपाला दगा दिला. महाविकास आघाडी करून ते शरद पवारांच्या मांडीवर बसले. ती महाविकास आघाडी आज मोडीत निघाली आहे. काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत लढते आहे. शरद पवारांची मुंबईमध्ये फारशी ताकद नाही. मुंबईचा निकाल काय लागणार हे उघड आहे. 13 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 46 टक्के मतं मिळाली होती. शिवसेनेला 23 टक्के तर मनसेला अवघ्या 7 टक्के मतांवर समाधान मानावे लागले होते. आताही हीच टक्केवारी चालणार. संकटकाळाची कुमक म्हणून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे यांच्याशी युती केली आहे. ठाकरे बंधूंनी मराठी अस्मिता हा निवडणुकीचा मुद्दा केला आहे. जुलैमध्ये हे भाऊ एक मंचावर आले होते. तेव्हाच ते कामाला लागले असते तर ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून आज चांगली हवा तयार झाली असती. पण निवडणूक युती जाहीर करायला दोघांनी खूप वेळ घेतला. ठाकरे बंधू एकत्र आले याचा खूप गाजावाजा झाला. पण जागावाटपात राज ठाकरेंच्या वाट्याला अवघ्या 52 जागा आल्या. मुंबईतल्या 227 जागांपैकी फक्त 52 जागा. आपल्या भावाची ही पत केली उद्धव ठाकरेंनी. युतीत ठाण्यामध्ये मनसेला 27, नाशिक व पुण्यात प्रत्येकी 25 जागा लढायच्या आहेत. मुंबईमध्ये फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना सोबत घेतले आहे. काँग्रेसने वंचितला सोबत घेतले असले तरी फायदा भाजपा-शिंदे सेनेलाच होताना दिसतो आहे. कारण दलित आणि मुस्लिम मतं विभागली जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतं ठाकरेंना मिळाली होती. यावेळी तो सारा फायदा ठाकरेंना मिळणार नाही. शिंदे यांच्यामुळे ठाकरेंची मराठी मतं विभागली जाणार आहेत. शरद पवारांच्या करिष्म्यावर ठाकरे विसंबून होते. पण पवारांचा उद्धव ठाकरे यांच्यातला ‘इंटरेस्ट’ केव्हाच गेला आहे.
शरद पवार यांनी पुणे महापालिकेत पुतण्याशी युती केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र भाजपाशी लढत आहेत. शरद पवार पूर्वीचे राहिलेले नाहीत. पुतण्यासोबतच्या त्यांच्या बैठका वाढल्या आहेत. मतचोरीच्या मुद्यावर शरद पवार बोलत नाहीत हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल. ईव्हीएमबद्दल आपली तक्रार नाही, हे आता सुप्रिया सुळेही सांगू लागल्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्या बोलण्यातला फरकही लक्षात घेण्यासारखा आहे. ‘आम्ही व्यावसायिक राजकारणी आहोत’ असे त्या मीडियाशी बोलताना म्हणाल्या. पवार कुटुंब कुठल्या दिशेने निघाले आहे याचे हे ट्रेलर आहे. उद्योगपती गौतम अंबानी सदैव विरोधी पक्षांच्या रडारवर असतात. धारावी पुनर्विकास, बंदर तसेच विमानतळ अदानींना दिले म्हणून काँग्रेस आणि उबाठा यांनी अदानी यांच्यावर हल्लाबोल चालवला आहे. त्याच गौतम अदानी यांचे नुकतेच पवार कुटुंबाने बारामतीत जंगी स्वागत केले. महापालिका निवडणुकीच्या धामधुमीच्या तोंडावर हा सोहळा झाला. शरद पवार, अजित पवार यांच्यापासून सारे पवार झाडून या स्वागताला होते. दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात वेगवेगळे लढणार असे सुरुवातीला जाहीर झाले होते. मात्र, गौतम अदानी यांच्या भेटीनंतर किल्ली फिरली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच नव्हे तर आता दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार अशी हवा आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर हे घडू शकते. शरद पवारांनी एनडीएसोबत जाण्याची तयारी केली आहे. त्यांचा जीव मुलीमध्ये अडकला आहे. 50 वर्षे राजकारणात राहूनही आपण आपल्या मुलीला ‘सेटल’ करू शकलो नाही, याची खंत शरद पवारांना टोचते आहे. आता पुढची साडेतीन वर्षे निवडणुका नाहीत. या काळात मुलीची काय अवस्था होईल, याची या बापाला कल्पना आहे. वयाच्या 85 व्या वर्षी हा बाप थकला आहे, दमला आहे. शरद पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, असा त्यांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेच्या गोष्टी ते करतात. मात्र ‘जिधर बम उधर हम’ हीच त्यांची विचारधारा राहिली आहे. त्याच अंतर्गत सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री झालेल्या दिसतील. भाजपासोबत बसण्याच्या हालचाली फार आधीपासून सुरू आहेत. 80 तासांचे सरकार काकाच्याच आशीर्वादाने उभे झाले होते. उद्धव ठाकरे पुढे आल्याने तो प्रयोग बारगळला. अजितदादा वैतागले होते. त्यातूनच राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले. आपला पक्ष फुटतो आहे हे शरद पवारांनी कळत होते. पवारांनी अनेक पक्ष फोडले, घरं फोडली. त्यांना आपल्या घरात काय चाललंय ते कळत नसेल अशातला भाग नाही. शरद पवारांनाच ते घडवून आणायचं होतं. यातला पहिला अंक झाला आहे. पुढचा अंक लवकरच पार पडेल. मात्र, संभ्रमावस्था हा पवारांचा स्वभावविशेष आहे. त्या हिशोबाने अजूनही ते उघडपणे पुढे यायला मागेपुढे पाहत आहेत. त्यांच्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळेच एकत्रीकरण लांबतंय का? याची त्यांच्याच सहकाऱ्यांमध्ये चर्चा आहे.