समुद्रपूर,
tiger-attack : तालुक्यातील शिवणफळ शिवारात पट्टेदार वाघ परिवाराने परिसरात दहशत पसरवली आहे. गेल्या काही दिवसात या वाघ कुटुंबांने विश्रांती घेतली होती. अचानक इंग्रजी वर्ष संपताना वाघोबाला जाग आली आणि त्यानेही मनुष्यप्राण्याप्रमाणे थर्टीफस्ट साजरा केला. एका बैलावर हल्ला करून नरडीचा घोट घेत ठार केले. ही घटना आज शुक्रवार २ रोजी सकाळी उघडकीस आली. बैल शेतकरी देवराव नैताम यांच्या मालकीचा आहे.
शिवणफळ येथील कृष्णा उमाटे शेतात ओलिताचे काम करीत असताना शेतात बांधलेला बैल जोरजोरात हंबरडा फोडत होता. दरम्यान, जुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने बैलावर झडप घालून त्याला ठार केले. या घटनेचा थरार कृष्णा उमाटे यांनी प्रत्यक्ष अनुभवला. बैल आणि कृष्णा यांच्यात केवळ ४० ते ५० फुटांचे अंतर होते. गेल्या आठ दिवसांपासून कोरा सहवन क्षेत्रातील करूर—पवनगाव परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे वनविभागाचा ताफा गस्तीवर असला तरी शिवणफळ गावालगतच्या जंगल परिसरात तीन वाघ वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी शिवणफळ, जोगीनगुंफा व परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सतत होणार्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत असून वनविभागाने तातडीने वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.