पिंपरी,
young man dies of heart disease : पिंपरीत छातीत तीव्र वेदना होत असलेल्या ३० वर्षीय सुमित श्रीकांत गद्रे सोनावणे याचा औंध जिल्हा रुग्णालयात हृदयविकाराची शंका असूनही फक्त अॅसिडिटीवर उपचार करून घरी पाठवण्यात आल्याने मृत्यू झाला. रविवारी (दि. १८) पहाटे सुमितच्या छातीत वेदना सुरू झाल्यावर तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले. आपत्कालीन कक्षातील डॉक्टरांनी 'ईसीजी' तपासणी केली, अहवाल सामान्य असल्याचे सांगितले आणि छातीतल्या वेदनांना पित्ताचा त्रास असल्याचे निदान करून अॅसिडिटीची गोळी, मळमळ व चक्कर थांबवणारे व वेदनाशामक इंजेक्शन देऊन काही वेळातच सुमितला घरी पाठवले.
घरी गेल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला. नातेवाइकांनी तातडीने रुग्णालयात परत नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संतप्त नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सांगवी पोलिसांनी तक्रार नोंदवून ससून रुग्णालयातील तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर योग्य कारवाई होईल, असे आश्वासन दिले.
आरोग्य कार्यकर्ते शरत शेट्टी यांनी रुग्णालयातील हृदयरोग उपचारांची अपुरी व्यवस्था असल्याचा आरोप केला. जिल्हा रुग्णालयातील तीन डॉक्टरांची चौकशी समिती नेमण्यात आली असून दोन-तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुमितचा भाऊ विवेक गद्रे म्हणतो, “सुमितवर वेळेत योग्य उपचार झाले असते, तर तो आज जिवंत असता. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच त्याचा मृत्यू झाला.”