वडगाव मावळ,
Zilla Parishad Elections : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी पक्षाच्या आघाडीची अधिकृत उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार)चे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी ही यादी प्रसिद्ध केली. मंगळवारी (दि. २०) सकाळी दहा वाजता वडगाव येथील पोटोबा महाराज मंदिरातून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश ढोरे, रामनाथ वारिंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या पाच गटांसाठी टाकवे-बुद्रुक नाणे गटातून अनंता हनुमंत पावशे (खांडी), वराळे-इंदुरी गटातून पल्लवी संदीप दाभाडे (माळवाडी), खंडकाळे-काले गटातून दीपाली दीपक हुलावळे (काले), कुसगाव बुद्रुक-काले गटातून संतोष गबळू राऊत (कुसगाव बु.) तर गट क्रमांक ३३ सोमाटणे-चांदखेडमधून मनीषा नितीन मुहे (सोमाटणे) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पंचायत समिती गणांसाठी टाकवे बुद्रुकमधून प्राची देवा गायकवाड, नाणेमधून आशा ज्ञानेश्वर मोरमारे, वराळेमधून अतुल काळूराम मराठे किंवा राजेंद्र गुलाब कडलक यापैकी एक, इंदुरीतून दिलीप नामदेव ढोरे, खंडकाळेतून समीर खंडू जाधव, कार्लामधून रेश्मा राजू देवकर, कुसगाव बुद्रुकमधून योगेश मुरलीधर लोहोर, कालेमधून शैला रामचंद्र कालेकर, सोमाटणेमधून साहेबराव नारायण कारके आणि चांदखेडमधून सुनीता मनोहर येवले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर करत निवडणुकीसाठी तयारीला वेग दिला असून, मंगळवारी होणाऱ्या शक्तिप्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.