डाॅ. गिरीश गांधी वि. सा. संघ अध्यक्षपदाच्या शर्यतीत

20 Jan 2026 14:03:03
नागपूर,
dr girish gandhi विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीचा ज्वर चढायला लागला आहे. विशेष म्हणजे सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात अग्रणी असलेले डाॅ. गिरीश गांधी यांनी अध्यक्षपदासाठी साेमवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे साहित्य वतुर्ळात चर्चेला ऊत आला असून, निवडणूक रंगणार की अविराेध हाेणार, अशी चर्चा रंगली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 साठीच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडणूक प्रक्रियेला 7 जानेवारीपासून सुरुवात झाली. अर्ज सादर करण्याची मुदत 22 जानेवारीपर्यंत आहे. वि. सा. संघाचे आजीव सभासद असलेल्या अनेक साहित्यिकांनी आजवर अर्जांची खरेदी केली आहे. आपल्याला समर्थन मिळावे यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. यातच नागपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वतुर्ळात अग्रणी असलेले व विदर्भ गाैरव प्रतिष्ठानसह विविध संस्थांचे संस्थापक व प्रमुख डाॅ. गिरीश गांधी यांनीही वि. सा. संघाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला. इतकी वर्षे वि. सा. संघापासून दूर असलेल्या डाॅ. गांधींनी अर्ज सादर केल्याने अनेक साहित्यिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
 

 
विदर्भ साहित्य
 
 

121 अर्जांची विक्री, 21 सादर
येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जानेेवारीपर्यंत 121 अर्जांची खरेदी झाली आहे. अध्यक्षपदासाठी डाॅ. गिरीश गांधी यांच्यासह लखनसिंह कटरे यांनी अध्यक्षपद आणि कार्यकारिणी सदस्यपदासाठी अर्ज सादर केला आहे. विलास चिंतामण देशपांडे यांनीही एकूण कार्यकारिणीसाठी 19 अर्ज सादर केले. विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते यांच्यासह डाॅ. रवींद्र शाेभणे, डाॅ. श्रीपाद जाेशी, चंद्रकांत लाखे, आशुताेष अडाेणी आदींसह अनेकांनी अर्ज नेले आहेत. ते कधी सादर करतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुरवणी यादी अद्याप नाही
7 जानेवारीपासून अर्ज विक्री सुरू झाली. अर्जासाेबत मतदारांची यादी असलेले विदर्भ आणि नागपूर शहर असे दाेन संच देण्यात येतात. या यादीत ज्यांची नावे नाहीत, त्यांच्यासाठी पुरवणी सूची दिली जाते. ती सूची अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे ज्यांची नावे या दाेन संचांमध्ये नाहीत, त्यांना अर्ज सादर करावयाचा असल्यास यादी येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करताना दाेन सूचक आणि पाच अनुमाेदक, तर सदस्यपदासाठी दाेन सूचक व तीन अनुमाेदक लागणार आहेत. या यादीत नाव नसलेल्यांना त्यामुळे फारच कमी अवधी मिळणार आहे. ही पुरवणी यादी मंगळवारपर्यंत येणार असल्याची माहिती सरचिटणीस विलास मानेकर यांनी दिली.
प्रतिक्रिया

विदर्भ साहित्य संघाच्या साहित्यिक कामाचा दर्जा वाढला पाहिजे. तेथे चांगले प्रशासन असणे आवश्यक आहे, असे मला वाटते. तसेच वि. सा. संघाच्या इमारतीशी संबंधित प्रश्नांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. अध्यक्षपदावर राहिल्यास मी याबाबत चांगले काम करू शकताे. त्यामुळे मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
डाॅ. गिरीश गांधी
अध्यक्ष, विदर्भ गाैरव प्रतिष्ठान
Powered By Sangraha 9.0