मुंबई,
hearing in the Shiv Sena case शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनाव व चिन्हाच्या वादावर उद्या, २१ जानेवारी रोजी, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. २०२२ मध्ये झालेल्या राजकीय फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील मूळ नाव व निवडणूक चिन्ह कोणाकडे राहावे, यावरून सुरू झालेला वाद गेली तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हा एकनाथ शिंदे यांचा पक्ष असल्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार यांचा पक्ष असल्याचा निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटांनी या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे गटाने शिवसेना नाव व धनुष्यबाण या चिन्हावर निवडणुका लढवल्या, तर उद्धव ठाकरे गटाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावाखाली मशाल चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी सुनावणीत जर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या बाजूने गेले, तर त्याचे राजकीय परिणाम काय असू शकतात, यावर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील ॲड. असिम सरोदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत संभाव्य राजकीय चित्र मांडले आहे. त्यांनी नमूद केले आहे की शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरील याचिका उद्या सर्वोच्च न्यायालयात आहे, मात्र ती यादीतील ३७ क्रमांकाची असल्याने प्रत्यक्ष सुनावणीपर्यंत पोहोचणे कठीण असू शकते. तरीही, जनमानसात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे की, जर एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना नाव आणि चिन्ह काढून घेतले गेले, तर मुंबई महापालिकेच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल.
असिम सरोदे यांच्या मते, अशा परिस्थितीत शिंदे गटाचा भाजपमध्ये विलय होण्याची शक्यता आहे आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. शिंदे गटातील अनेक नेते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परत येण्याची शक्यता असून त्यामुळे मूळ शिवसेना अधिक मजबूत होऊ शकते. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबई महापालिकेतील राजकारणाला पूर्णपणे वेगळे वळण मिळू शकते, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयातून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष अखेरीस सर्वोच्च न्यायालयातच संपेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर नेमका हक्क कोणाचा, या प्रश्नावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे उद्याच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटालाच खऱ्या शिवसेनेचा दर्जा देणाऱ्या आणि त्यांना धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, यावर पुढील राज्यातील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.