पुणे,
Theft Case : विमाननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका नामांकित सोसायटीत रामेश्वरम कॅफेच्या मालकाच्या घरात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी व्यंकटेश वसंत करंडे हा दोन वर्षांपासून सोसायटीत दूध वितरीत करत असल्यामुळे त्यावर कोणताही संशय घेतला जात नव्हता.
पोलिसांच्या माहितीनुसार, करंडे सकाळी दूध टाकण्याच्या बहाण्याने घराजवळ येत होता. घराच्या डिजिटल लॉकचा गैरफायदा घेत, वेगवेगळे पासवर्ड टाकून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत होता. गेल्या तीन महिन्यांपासून अनेकदा प्रयत्न करूनही अपयश आले, परंतु १७ जानेवारी रोजी त्याने योग्य पासवर्ड टाकून दरवाजा उघडला आणि घरातून १ लाख ३२ हजार रुपये लंपास केले.
चोरी उघडकीस आल्यानंतर विमाननगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी करंडेला अटक केली आणि चोरीची रक्कम जप्त केली.