केवळ पुस्तक विकत घेणे म्हणजे खरा प्रतिसाद नाही

20 Jan 2026 15:15:15
नागपूर,
Nagpur News डॉ. लैलेशा मंगेश भुरे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन शंकर नगर येथील शेवाळकर सभागृहात थाटात संपन्न झाले. साहित्य विहारच्या अध्यक्ष आशा पांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “केवळ पुस्तक विकत घेणे म्हणजे खरा प्रतिसाद नाही; ते पुस्तक वाचून लेखकाशी संवाद साधणे म्हणजे खरा प्रतिसाद आहे.” कथासंग्रह ‘ओंजळ फुलांची’ या पुस्तकावर ज्येष्ठ कादंबरीकार विजया ब्राह्मणकर यांनी भाष्य केले. त्यांनी लेखिकेचे आणि संग्रहातील कथांचे विशेष कौतुक करताना म्हटले की, “नजर सर्वांना असते, पण दृष्टी फक्त लेखकाला असते. लेखक समाजाला नवी दृष्टी देण्याचे काम करतो.”
 
Nagpur News
 
साहित्य विहार संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. माधुरी वाघ यांनी लेख संग्रह ‘काळोखातील काजवे’ विषयी सांगितले की, “या लेखांचा आकार छोटा, आशयपूर्ण आणि माहितीपर आहे; ते वाचकाला समृद्ध करतात.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा ढोले यांनी केले, तर शारदा स्तवन सुरेल आवाजाच्या धनी राधिका राजंदेकर यांनी गायले. Nagpur News  लेखिकेने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या दोन्ही पुस्तकांतील अनुभव अनेक वर्षांपासून मनात साठवलेले होते आणि ते पुस्तकाच्या स्वरूपात व्यक्त झाले. कार्यक्रमाला भुरे परिवार, झाडे परिवार, मित्र आणि साहित्य विहारचे सदस्य उपस्थित होते. आभार प्रदर्शन सुजाता काळे यांनी केले.
सौजन्य: मंदा खंडारे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0