ऑनलाईनमुळे स्थानिक उद्योग संकटात

20 Jan 2026 06:30:00
वेध
चंद्रकांत लोहाणा
industries in crisis ऑनलाईन खरेदीच्या मोहजालामध्ये आज प्रत्येक जण अडकत चालला आहे. ही खरेदी सहज सोपी आणि वेळेची बचत करणारी असली तरी त्याचे तोटेही तेवढेच भयंकर आहे. आजकाल विविध प्रलोभने देऊन ई-कॉमर्स कंपन्यांनी मानवी मनाचा आणि मेंदूचा ताबा घेतला आहे. त्यामुळे आम्ही जे विकतो तेच योग्य असा भ्रम या कंपन्यांनी समाजामध्ये पद्धतशीरपणे पसरविला आहे. आपल्या देशामध्ये सध्या विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांचा बोलबाला असून, त्यांनी संपूर्ण भारतीय समाजमनावर ताबा मिळविला आहे. स्मार्टफोनच्या पदार्पणानंतर त्याची व्याप्ती तर अधिकच वाढली आहे. त्यामुळे या बाबीचा अतिशय गंभीरतेने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ऑनलाईनच्या वाढत्या प्रस्थामुळे आपल्या देशामधील लहान लहान उद्योगांसमोर गंभीर संकट उभे ठाकले असून, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी वरवर चांगली दिसत असली तरी समाजासाठी अतिशय घातक ठरत आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये वस्तूचे चांगले रेटिंग दाखवून ग्राहकांना खराब उत्पादने विकण्याचा सपाटा ई-कॉमर्स कंपन्यांनी लावला आहे.
 
 

ऑनलाईन  
 
 
आंतरराष्ट्रीय कंपन्यांची ही एक प्रकारे दादागिरी असून, त्यावर वेळीच आळा घातला नाही तर पुढेही असे फसवणुकीचे प्रकार वाढीस लागून भारतीय ग्राहकांची लुबाडणूक सुरूच राहील. ऑनलाईन साईटवर खरेदी करताना आधी ग्राहक त्या वस्तूचे रेटिंग आणि रिव्ह्यू बघतो. 4 ते 5 स्टार रेटिंग असलेल्या वस्तूंना ग्राहक आपली पसंती देतो. परंतु, चांगले स्टार रेटिंग असूनही त्या वस्तू प्रत्यक्षात खराब असल्याचा अनेक ग्राहकांचा अनुभव आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या स्टार रेटिंगवरही प्रश्नचिन्ह लागले आहे. देशामध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचा हा गोरखधंदा अजूनही सामान्य ग्राहकांच्या लक्षात न आल्याने त्यांची दररोज फसणवूक होत आहे. विदेशी कंपन्यांना येथील समाजहिताशी काहीएक देणे घेणे नसल्याने भरपूर पैसे कमविण्याच्या नादामध्ये स्पर्धेच्या युगात सर्व नीतिनियम गुंडाळून बाजार काबीज करण्यामध्ये तरबेज आहेत. विदेशी कंपन्या चांगले स्टार रेटिंग व रिव्ह्यूसाठी लोकांना लाच देत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांची विश्वसनीयता किती असेल याचा प्रत्येक खरेदीदाराने गंभीरतेने विचार करावा. प्रत्यक्षात दुकानामध्ये जाऊन केलेली खरेदी व ऑनलाईन खरेदीमध्ये खूप फरक आहे. प्रत्यक्ष केलेल्या खरेदीमध्ये वस्तू पारखून घेऊ शकतो.industries in crisis परंतु, ऑनलाईन खरेदी करताना त्यावेळी आपली पारखी नजर सहज धोका देऊन जाते. आपण घेत असलेली वस्तू प्रत्यक्ष नजरेसमोर नसल्याने फक्त अंदाज बांधून आपण ती घेत असतो. त्यामुळे ग्राहकांच्या या कमजोरीचा फायदा उचलून या कंपन्या खराब उत्पादने ग्राहकांच्या माथी मारत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. एकावर एक मोफत, 50 टक्के सूट अशा आमिषाला बळी पडून ग्राहक ऑनलाईन खरेदीच्या मायाजालात सहज अडकतो. खरेदी केल्यावर मात्र ती वस्तू मुळात स्थानिक बाजारामध्ये स्वस्त असल्याची जाणीव होते. परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. कंपनी कोणतीही आणि कितीही मोठी असो, ती पैसा कमाविण्यासाठीच बाजारात आली आहे, हे ग्राहक विसरतो अन् फसव्या जाहिराती बघून लुबाडला जातो. विकली जाणारी वस्तू व अन्य साहित्य या कंपन्या तोट्यात का विकतील याचा आम्ही कधीच विचार करीत नाही. ऑनलाईन विक्री होणाऱ्या सर्वच वस्तू प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध आहेत. परंतु, ऑनलाईन खरेदीमुळे आजकाल शहरामधील लहान लहान उद्योग डबघाईस येत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताचे काम हिरावले गेले आहे. त्यांचा रोजगार गेला अन् आपला खरेदीचा आनंदही हिरावला गेला. मिळणारा नफा विदेशी कंपनीच्या घशात जात असल्याने आपण स्वत: देशाचे किती नुकसान करीत आहोत हेसुद्धा आपल्या लक्षात येत नाही. एकदा या कंपन्यांनी वस्तू ग्राहकांच्या माथी मारली की तिची जबाबदारी संपते. ती वस्तू खराब असली तरी ती कंपनी ग्राहकांना सहजासहजी दाद देत नाही. त्यामुळे ऑनलाईन खरेदी शारीरिक कष्टाविना असली तरी ती पुढे त्रास देणारीच ठरते. परिणामी, या कंपन्यांचे सहज फावते. त्यामुळे आपली फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक ग्राहकाने स्थानिक बाजारपेठ निवडली तर आपले अन् देशाचेही भले होईल.
 
9881717856
Powered By Sangraha 9.0