शेतकर्‍यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना केंद्रीय सहसचिवांची भेट

20 Jan 2026 18:22:00
चंद्रपूर, 
'Pradhan Mantri Dhandhanya Krishi Yojana'. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेंतर्गत देशातील 100 जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाचे सहसचिव तथा प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचे केंद्रीय नोडल अधिकारी आशिष मोरे यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध शेतकर्‍यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना भेट दिली.
 

sheti 
 
पडोली येथे एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत संगिता मुस्कावार यांच्या पॉलीहाऊस येथे ‘ऑरचिड कल्टीव्हेशन व ड्रॅगन फ्रुट फॉर्म’ची त्यांनी पाहणी केली. यावेळी ऑरचिडची रोपे कुठून आणली, कोणत्या हंगामात लावली जातात, एक रोप किती काळ टिकते, यासाठी एकूण किती खर्च आला, ऑरचीडची फुलांचे मार्केट कुठे आहे, इतर राज्यातून मागणी होते का, होत असल्यास कशी विक्री केली जाते, या रोपांना स्प्रिंकलरने किती वेळा पाणी द्यावे लागते आदी माहिती मोरे यांनी जाणून घेतली. तसेच आंब्याच्या बागेची पाहणी केल्यानंतर ड्रॅगन फ्रुटचे किती वर्षाचे नियोजन केले आहे. एका एकरमध्ये किती झाडे लावता येतात याबाबतही विचारणा केली.
 
 
'Pradhan Mantri Dhandhanya Krishi Yojana'. साखरवाही येथे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मत्स्य बोटुकली संचयन कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी मोरे यांनी तलावातून मासे कसे पकडतात, याचे प्रात्यक्षिक बघितले. यावेळी मच्छिमार बांधवांनी तलावाची खोलीकरण करण्याची मागणी केली. यावर नक्कीच उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी यांनी सांगितले. भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे वनक्रांती शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडच्या वतीने चालविण्यात येणार्‍या जैविक निविष्ठा संसाधन केंद्र शेत बांधावरील प्रयोग शाळेला त्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.
 
 
त्यानंतर वरोडा तालुक्यातील चिनोरा येथील कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड येथे संचालक व शेतकर्‍यांसोबत मोरे यांनी चर्चा केली. यावेळी कांचनी येथील जिनिंग व प्रेसिंग युनिट, धान्य साठवणे व प्रतवारी युनिट, 3000 मेट्रिक टन गोडाऊनला भेट दिली. कांचनी शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी धोबे यांनी प्रकल्पाची माहिती व संकल्पना सांगितली. तर, कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे यांनी येणार्‍या अडचणीबाबत सविस्तर चर्चा केली.
 
500 शेतकर्‍यांचा सेंद्रीय द्रव्यांचा वापर कौतुकास्पदः मोरे
येथे येवून अतिशय चांगला अनुभव मिळाला. जैविक प्रक्रियेबाबत येथील प्रयोगशाळा अतिशय उत्तम आहे. परिसरातील 500 शेतकर्‍यांना सेंद्रीय द्रव्यांचा वापर करण्यास प्रवृत्त करणे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. 500 कुटुंबाची उपजिविका या युनिटवर चालते. हे काम निरंतर चालू ठेवा, असा सल्लाही त्यांनी केले.
Powered By Sangraha 9.0