भाईगिरीचा धिंगाणा; तरुण व मध्यस्थांवर दगडफेक

20 Jan 2026 15:42:03
पिंपरी,
Pune Crime News : पिंपरीतील चाकण परिसरात भाईगिरीचा आव आणत तरुणाला आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मध्यस्थांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी आठच्या सुमारास घडली. कडाची वाडीतील बापदेववस्ती येथील ओमसाई नगर परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 

Pune Crime News
 
संग्रहित फोटो 
 
याप्रकरणी प्रवीण विष्णू कुंभार (वय ४८, रा. बापदेववस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुयश राजेंद्र यादव, शिवम संदीप हाके, शुभम संदीप हाके (वय १८), चिन्मय वाघ, सुदर्शन चौधरी, सोन्या वाघमारे आणि विराज कृष्णा कड (वय २३, रा. कडाचीवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
फिर्यादीनुसार, कुंभार रस्त्याने जात असताना संशयितांनी त्यांची गाडी अडवून “आम्ही इथले भाई आहोत, तू या रस्त्याने कसा चाललास?” अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर जिवे मारण्याच्या उद्देशाने दगड फेकून मारहाण करण्यात आली. भांडण मिटवण्यासाठी मध्ये पडलेल्या गणेश शेलार आणि प्रतीक शेलार यांच्या डोक्यावरही दगड मारण्यात आल्याने ते जखमी झाले.
 
या टोळक्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी भीतीपोटी दुकाने आणि घरे बंद करून घेतली. घटनेचा पुढील तपास दक्षिण चाकण पोलीस करत आहेत.
Powered By Sangraha 9.0