बंगळुरू,
mysore-silk-saree भारतीय महिलांमध्ये म्हैसूर सिल्क साड्यांविषयी असलेली क्रेझ किती टोकाची आहे, याचे लक्षवेधी चित्र नुकतेच समोर आले आहे. अस्सल म्हैसूर सिल्क मिळवण्यासाठी ग्राहकांनी अक्षरशः पहाटेपासून दुकानांबाहेर रांगा लावल्या होत्या. सकाळी चार वाजताच शोरूमबाहेर शेकडो लोक उभे असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. सूर्योदयापूर्वीच इतकी गर्दी पाहून नेटकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

हा प्रकार कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनच्या अधिकृत शोरूमबाहेर पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, या साड्यांची किंमत तब्बल 23 हजार रुपयांपासून सुरू होऊन अडीच लाख रुपयांपर्यंत जाते. एवढी मोठी रक्कम असूनही ही साडी खरेदी करण्यासाठी लोक तासनतास शांतपणे रांगेत उभे राहताना दिसत आहेत. mysore-silk-saree कारण अनेकांसाठी म्हैसूर सिल्क ही केवळ साडी नसून प्रतिष्ठेचे आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते. वाढत्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत होते. त्यामुळे कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने काही कडक उपाययोजना राबवल्या आहेत. आता शोरूममध्ये प्रवेशासाठी टोकन पद्धत लागू करण्यात आली असून, टोकन असलेल्या ग्राहकांनाच आत प्रवेश दिला जात आहे. यासोबतच, एका ग्राहकाला केवळ एकाच साडीची खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना साडी मिळू शकेल आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राहील.
सौजन्य : सोशल मीडिया
म्हैसूर सिल्कच्या लोकप्रियतेमागे केवळ तिचे सौंदर्य नाही, तर तिची दुर्मिळता हेही मोठे कारण आहे. या साड्यांना कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनकडून अधिकृत जीआय टॅग प्राप्त आहे. mysore-silk-saree म्हणजेच अस्सल म्हैसूर सिल्क तयार करण्याचा अधिकार केवळ याच संस्थेकडे आहे. शुद्ध सोन्याची जरी, मऊ पोत आणि उत्कृष्ट दर्जा ही या साड्यांची ओळख मानली जाते. या साड्यांचे उत्पादन अत्यंत कौशल्याने आणि संथ गतीने केले जाते. मात्र कुशल कारागिरांची संख्या मर्यादित असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. एका नव्या कारागिराला तयार होण्यासाठी साधारण सहा ते सात महिने प्रशिक्षण द्यावे लागते. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून संपूर्ण उत्पादन प्रक्रिया सरकारी केंद्रांमध्येच केली जाते.
कारागिरांची कमतरता आणि वाढती मागणी यामुळे म्हैसूर सिल्क साडी मिळवणे अनेकांसाठी जणू एखाद्या युद्धासारखे झाले आहे. तरीही पहाटेपासून रांगेत उभे राहून ही साडी मिळवणे, अनेक महिलांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब ठरत आहे.