अमेरिकेत हिमवादळाचा तडाखा...१०० हून अधिक वाहनांचा साखळी अपघात

20 Jan 2026 10:17:50
वॉशिंग्टन,
Snowstorm hits America अमेरिकेतील मिशिगन राज्यात सुरू असलेल्या तीव्र हिमवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रँड रॅपिड्स परिसरात भीषण वाहतूक अपघातांची मालिका घडली आहे. जोरदार बर्फवृष्टीमुळे रस्ते पूर्णपणे निसरडे झाल्याने १०० पेक्षा अधिक वाहने एकमेकांवर आदळली, तर अनेक वाहने रस्त्याबाहेर घसरली. ग्रँड रॅपिड्सच्या नैऋत्य दिशेला असलेल्या इंटरस्टेट १९६ या महामार्गावर हा मोठा अपघात घडला असून संपूर्ण परिसर बर्फाच्या पांढऱ्या थराने झाकला गेला आहे. या दुर्घटनेनंतर मिशिगन राज्य पोलिसांनी इंटरस्टेट १९६ हा महामार्ग दोन्ही बाजूंनी तातडीने बंद केला. अपघातस्थळी अडकलेली वाहने हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव आणि साफसफाईचे काम सुरू असून, ३० हून अधिक सेमी-ट्रेलर ट्रकसह सर्व वाहनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
 

Snowstorm hits America 
 
या अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असली, तरी सुदैवाने कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही. ओटावा काउंटी शेरीफ कार्यालयाच्या माहितीनुसार, या भागात अनेक ठिकाणी वाहनांचे अपघात झाले असून असंख्य गाड्या रस्त्याच्या कडेला किंवा मध्येच अडकून पडल्या आहेत. अडकलेल्या वाहनचालकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना हडसनव्हिल हायस्कूलमध्ये नेण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महामार्ग अनेक तास बंद राहण्याची शक्यता आहे. अपघातस्थळी अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या ग्रँड व्हॅली टोइंग या कंपनीने डझनभर ट्रक तैनात केले आहेत. कंपनीचे व्यवस्थापक जेफ वेस्टरवेल्ड यांनी सांगितले की शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त वाहने हटवून महामार्ग पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
 
 
 
दरम्यान, अपघातातून बचावलेले वाहनचालक पेड्रो माटा ज्युनियर यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की ते अपघाताच्या वेळी ताशी २० ते २५ मैल वेगाने वाहन चालवत होते. जोरदार बर्फवृष्टीमुळे समोरील वाहने नीट दिसत नव्हती. त्यांनी आपली गाडी सुरक्षितपणे थांबवली, मात्र मागून येणाऱ्या वाहनांच्या सततच्या धडका आणि मोठ्या आवाजांमुळे परिस्थिती अधिक भयावह बनली होती. समोरचे दृश्य दिसत होते, पण मागील परिस्थितीचा अंदाज येत नव्हता, असे त्यांनी सांगितले.हिमवादळामुळे मिशिगनमधील अनेक भागांत वाहतूक सेवा ठप्प झाली असून प्रशासनाने नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0