शिरूर तालुक्यातील राजकीय भूचाल; गावडे कुटुंब भाजपकडे झुकण्याची चर्चा

20 Jan 2026 15:24:00
मलठण,
Zilla Parishad Election : शिरूर तालुक्यातील बेट भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय घडामोडींचा हवालदार झाला आहे. कवठे येमाई-टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वासू माजी आमदार पोपटराव गावडे पक्ष सोडल्याची माहिती समोर आली आहे. गटातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे, तर आता गावडे कुटुंबीय कमळ हातात धरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
 

bjp 
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर पोपटराव गावडे यांनी अजित पवार गटाची साथ दिली होती, ज्यामुळे राजेंद्र पोपटराव गावडे यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र दोन्ही पक्षांनी अचानक एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण राजकीय गणित बदलले आणि गावडे कुटुंब व समर्थकांमध्ये नाराजी पसरली.
 
या अनपेक्षित परिस्थितीत पोपटराव गावडे यांनी गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली आणि सर्वांचा सल्ला घेऊन आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या विश्वासू सहकारी आर. बी. गावडे यांनी बुधवारी भाजपचा झेंडा हातात घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी दर्शविल्याने गावडे गट भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. पोपटराव गावडे यांनी सांगितले की, “पक्षांतराचा निर्णय सर्वांच्या मतानेच घेतला जाईल,” तर भाजप सत्तेत असून मुख्यमंत्री मित्र असल्याचे सूचक वक्तव्य त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला बळ देत आहे.
Powered By Sangraha 9.0