देशातील १६७ औषधे निकृष्ट, ७ बनावट असल्याचा धक्कादायक अहवाल

21 Jan 2026 15:32:44
नवी दिल्ली,
167 medicines are substandard देशभरातील औषधांच्या सुरक्षिततेबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, बाजारात विक्रीस असलेल्या अनेक औषधांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे उघड झाले आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने (सीडीएससीओ) डिसेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, तपासणीदरम्यान तब्बल १६७ औषधे गुणवत्ता निकषांवर अपयशी ठरली आहेत. याशिवाय, रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी सात औषधे थेट बनावट असल्याचेही आढळून आले आहे. सीडीएससीओच्या माहितीनुसार, तपासलेल्या औषधांपैकी ७४ नमुने केंद्रीय औषध प्रयोगशाळांमध्ये, तर ९३ नमुने राज्यस्तरीय प्रयोगशाळांमध्ये चाचणीत नापास झाले. या औषधांनी ठरवून दिलेले शुद्धता, घटकांची अचूक मात्रा किंवा इतर गुणवत्तेचे निकष पूर्ण केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही औषधे ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’ अर्थात दर्जाहीन ठरवण्यात आली आहेत.
 
 
गोळ्या
 
याच अहवालात आणखी गंभीर बाब समोर आली असून, विविध राज्यांतून जप्त करण्यात आलेली सात औषधे पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही औषधे गाझियाबाद, अहमदाबाद, बिहार आणि महाराष्ट्रातील एफडीए तपासणीदरम्यान आढळून आली. तपासात असे समोर आले की, अधिकृत कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून अनधिकृत उत्पादकांनी ही औषधे तयार केली होती. या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सरकारकडून नागरिकांना दिलासा देण्यात आला असून, आढळलेला दोष हा संबंधित औषधांच्या विशिष्ट बॅचपुरताच मर्यादित आहे. संपूर्ण ब्रँड किंवा त्या औषधांच्या सर्व उत्पादनांवर त्याचा परिणाम होत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही, रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही सर्व निकृष्ट आणि बनावट औषधे बाजारातून तात्काळ मागे घेण्यात येत आहेत. सामान्य नागरिकांना सुरक्षित आणि प्रभावी औषधे मिळावीत यासाठी सीडीएससीओ आणि राज्य सरकारे संयुक्तपणे दरमहा औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. निकृष्ट, भेसळयुक्त आणि बनावट औषधांवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0