भारतावर ५०० टक्के टॅरिफ?अमेरिकेचा खळबळजनक दावा

21 Jan 2026 10:20:47
नवी दिल्ली,
500 percent tariff on India रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अमेरिकेने टॅरिफ लावल्याचा आणि त्यामुळे भारताने रशियापासून दूर जाण्याचा खळबळजनक दावा अमेरिकेकडून करण्यात आला असून या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारतावर तब्बल ५०० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेने काही दिवसांपूर्वी दिली होती, त्यानंतर आता या मुद्द्यावर अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी केलेल्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
 
  

tariff on India 
युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करण्यास सुरुवात केली होती. यावरून अमेरिकेने वारंवार नाराजी व्यक्त करत भारतावर दबाव वाढवला. अमेरिकेने भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावल्याचे स्कॉट बेसेंट यांनी सांगितले असून, या दबावामुळेच भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आणि अखेर ती पूर्णपणे थांबवली, असा दावा त्यांनी केला आहे. हे केवळ अमेरिकेच्या दबावामुळे शक्य झाले. आम्ही भारताला रशियापासून दूर केले, असे थेट विधान त्यांनी केले.
 
 
अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारताला आर्थिक नुकसान होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र भारताने या परिस्थितीत अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार करून संभाव्य नुकसान भरून काढले आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही मोठा परिणाम झाला नाही. उलट, अमेरिकेच्या दबावानंतर लगेचच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते एकटे नसून सात मंत्र्यांसह आले होते. या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यात अनेक महत्त्वाचे करार झाले आणि दोन्ही देशांमधील संबंध किती मजबूत आहेत, हे जगासमोर स्पष्ट झाले.
 
 
दरम्यान, भारतावर ५०० टक्के टॅरिफ लावण्याच्या चर्चेने काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडवली होती. आता प्रत्यक्षात असा टॅरिफ लागणार की नाही, याबाबत ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जाणारे स्कॉट बेसेंट यांनी भूमिका मांडली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, टॅरिफच्या माध्यमातूनच भारताला रशियाकडून तेल खरेदी थांबवायला भाग पाडण्यात आले आहे. मात्र, स्कॉट बेसेंट यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भारताने खरोखरच रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे थांबवली आहे का, की हा केवळ अमेरिकेचा दावा आहे, यावर सध्या चर्चा सुरू आहे. अमेरिकेच्या या विधानावर भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा दावा कितपत सत्य आहे, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0