इस्लामाबाद,
All-rounder Shoaib Malik retires पाकिस्तानचा अनुभवी आणि शक्तिशाली अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिक याने पाकिस्तान सुपर लीगमधून (पीएसएल) निवृत्तीची घोषणा केली असून त्यामुळे या लीगमधील एका यशस्वी आणि संस्मरणीय अध्यायाचा अंत झाला आहे. पीएसएलच्या ११व्या हंगामापूर्वीच मलिकने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने चाहत्यांशी ही भावना व्यक्त केली आहे. पीएसएलमधील आपल्या दशकभराच्या प्रवासाची आठवण काढत शोएब मलिकने एक भावनिक संदेश शेअर केला. मैदानावर आणि मैदानाबाहेर अनुभवलेल्या प्रत्येक क्षणाचे आणि निर्माण झालेल्या मैत्रीचे महत्त्व कायम मनात राहील, असे सांगत आता निरोप घेण्याची वेळ आल्याचे त्याने नमूद केले. मात्र क्रिकेटच्या भल्यासाठी काम करण्याची आपली जिद्द आणि आवड कायम राहील, असेही त्याने स्पष्ट केले आणि पीएसएलचे आभार मानले.
शोएब मलिक हा पीएसएलच्या सुरुवातीपासूनच लीगचा एक महत्त्वाचा चेहरा राहिला आहे. आपल्या कारकिर्दीत त्याने कराची किंग्ज, मुलतान सुल्तान्स, पेशावर झल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स अशा चार वेगवेगळ्या फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले. पीएसएलच्या दहाव्या हंगामात क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून त्याने शेवटचा सामना खेळला. पीएसएलमधील मलिकची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. लीगच्या इतिहासात तो चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. ९२ सामन्यांत त्याने ३३.०९ च्या सरासरीने २,३५० धावा केल्या असून अष्टपैलू भूमिकेत १७ विकेट्सही घेतल्या आहेत. टी-२० क्रिकेटच्या एकूण इतिहासातही शोएब मलिकने आपले वेगळे स्थान निर्माण केले असून १३,५७१ धावा, ८३ अर्धशतके आणि १२७.२४ च्या स्ट्राईक रेटसह तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही शोएब मलिकची कारकीर्द उज्वल राहिली आहे. २००९ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता. त्याने तिन्ही प्रकारांत पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे. १९९९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मलिकने पाकिस्तानसाठी एकूण ४४६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने १२ शतके आणि ६१ अर्धशतकांच्या जोरावर ११,८६७ धावा केल्या असून गोलंदाजीमध्येही २१८ विकेट्स घेतल्या आहेत. शोएब मलिकच्या निवृत्तीने पाकिस्तान क्रिकेटमधील एक अनुभवी आणि विश्वासार्ह अध्याय संपुष्टात आला आहे.