खा. धानोरकर व आ. वडेट्टीवारांच्या वादाने शिखर गाठले!

21 Jan 2026 20:21:24
चंद्रपूर 
Chandrapur Municipal Corporation Elections महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार आणि खा. प्रतिभा धानोरकर यांच्यातील पक्षांतर्गत वाद आता शिखरावर पोहोचला आहे. त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फै री झडत असून, त्या अगदीच धारदार झाल्या आहेत. त्यांना पक्षश्रेष्ठीही आवरू शकत नसल्याचे चित्र सध्यातरी समोर येत आहे.
 
 
 
महानगर पालिकेत 27 जागा जिंकून काँगे्रस सर्वात मोठा पक्ष ठरला. मित्रपक्ष मिळून बहूमतासाठी केवळ 4 जागांची गरज असताना, काँग्रेसमध्येच वडेट्टीवार-धानोरकर यांच्या अंतर्गत गटात आता नगरसेवक विभागले गेले आहेत. दोन गटांमध्ये सध्या हे नगरसेवक नागपूरच्या वेगवेगळ्या हॉटेलात आहेत. गटनेता माझाच होईल, हा त्यामागचा वाद आहे. दोन्ही नेत्यांनी काम करून भाजपापेक्षा जास्ता जागा तर मिळवल्या, पण हे यश त्यांना पचवता आले नाही. या दोघांच्या भांडणात भाजपाचा लाभ होतो की काय, असे काहीचे चित्र सध्यातरी दिसत आहे.
 
 
खासदार झाले म्हणून जिल्ह्याचे मालक होत नाही : वडेट्टीवार
Chandrapur Municipal Corporation Elections खासदार झाले म्हणून कोणी जिल्ह्याचे मालक होत नाही. खा. प्रतिभा धानोरकर यांना पक्षात येऊन सहाच वर्ष झाली आहे. त्यांचे पती दिवंगत बाळू धानोरकर यांना मीच पक्षात आणले होते. चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष कमकुवत होता, तेव्हा मोठ्या कष्टाने मी पक्षांची बांधणी केली. माझ्याच जिल्ह्यात कुणी मला ढवळाढवळ करू नये असे म्हणत असेल तर ते चालणार नाही. धानोरकर यांनी थोडा संयम बाळगावा, अशा शब्दात आमदार विजय वडेट्टीवार यांनी धानोरकर यांना खडसावले.
 

vijay dksk 
 
ते पुढे म्हणाले, शिवानी वडेट्टीवार यांना लोकसभेची उमदेवारी मिळावी म्हणून दिल्लीला गेलेल्या माझ्या काही समर्थकांची तिकीट खा. धानोरकर यांनी कापली. पण शेवटी आम्ही दोघांनी संयुक्त यादीवर स्वाक्षरी केली. सर्व नगरसेवक माझेच आहेत, असे त्या म्हणत असेल तर कसे चालेल. मी म्हणेल तसेच झाले पाहिजे, हा त्यांचा आग्रह पक्षश्रेष्ठीही मान्य करणार नाही. वैचारिक मतभेद असू शकतात, पण जुना इतिहास काढायला गेले, तर अनेक गोष्टी बाहेर येतील, असा इशारा वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
 
 
मागील 25 वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा मी सांभाळत आहे. प्रतिभा धानोरकर नवख्या आहेत. हा पक्ष जुन्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. नगरपरिषद निवडणुकीत मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केले धानोरकरांचा सहभाग नगण्या होता, असा आरोपही वडेट्टीवार यांनी लावला. 
खा. धानोरकर यांचा गैरसमज झाला असावा. कुठल्याही नगरसेवकाला आम्ही जबरदस्तीने बोलावले नाही. नगरसेवक स्वतःहून आमच्याकडे आले. उलट धानोरकर यांनीच गाडीत बसवून आमच्या नगरसेवकांना नेले. एकत्र बसूनच चंद्रपूरचा महापौर ठरवायचा आहे, निर्णय नगरसेवक घेतील, नेते नाहीत, असेही ते म्हणाले. पक्ष सोडून जाण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण कार्यकर्ता जिवंत असेल तरच पक्ष जिवंत राहतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
माझे नगरसेवक पळवण्याची गरज काय? : खा. धानोरकर
आ. विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना पळवायचे कारण काय, असा संतप्त सवाल खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला. सोबतच त्यांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेतली. आ. वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महानगरात गरजेपेक्षा जास्त लुडबूड करू नये. महानगर माझ्या मतदार संघात येते. येत्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मी पण मग ब्रम्हपुरीत वडेट्टीवारांच्या मतदार संघात जाऊन आपले उमेदवार उभे करेल. ब्रम्हपुरी मतदार संघ हा गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येतो. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात काम करावे. माझ्या मतदार संघात लुडबूड करू नये, असा पूनर्उच्चारही खा. धानोरकर यांनी केला.
 
 
dhanorkar
 
Chandrapur Municipal Corporation Elections चंद्रपूर महानगर पालिकेत काँगे्रस पक्षाचे नगरसेवक निवडूण आले ते सगळे माझेच आहेत. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच महापौर होणार आहे. त्यामुळे माझ्या नगरसेवकांना लपवून ठेवण्याची गरज नाही. वडेट्टीवार हे राज्याचे नेते आहेत. मात्र, ते चंद्रपुरात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करतात. हे असेच सुरू राहिले तर मलाही त्यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात जावे लागले, असा इशारा त्यांनी दिला आहे. मी या सर्व प्रकाराची पक्षातील वरिष्ठांना माहिती दिली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याही कानावर हा प्रकार घातला आहे. सपकाळ हे चंद्रपूरला येणार आहेत. त्यानंतर मला काय करायचे याचा निर्णय मी घेईल. मला न विचारता वडेट्टीवारांनी नगरसेवकांना लपवले. वादाची सुरुवात त्यांनीच केली. त्यामुळे त्यांच्यासोबत आता बोलण्याचा प्रश्नच येत नाही. तसाही त्यांचा चंद्रपूर महापालिकेशी काही संबंध नाही, असा पलटवार खा. धानोरकर यांनी केला.
Powered By Sangraha 9.0