पुणे,
Congress and Vanchit Bahujan Aghadi आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात अधिकृत आघाडी झाली आहे. या महत्त्वाच्या आघाडीची घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव तथा पुणे जिल्हा समन्वयक ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी पत्रकार परिषदेत केली. आघाडीने जिल्हा परिषदेसाठी एकूण ७३ जागा आणि पंचायत समितीच्या १४६ जागांवर संयुक्तपणे उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे.
आघाडीच्या अंतर्गत उमेदवार निवडीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेतृत्वाने सुरुवातीला व्यापक चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील स्थानिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून संभाव्य उमेदवारांची नावे सुचवली गेली असून, जिल्हा पातळीवर दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी या यादीला अंतिम मान्यता दिली आहे. उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्या जागा कोणत्या पक्षाकडे असतील, याची अधिकृत माहिती जाहीर केली जाईल, असे श्रीरंग पाटील आणि ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी सांगितले.
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या या महाआघाडीचे मुख्य उद्दिष्ट फक्त सत्ता मिळवणे नसून, संविधानविरोधी आणि जातीवादी शक्तींना रोखणे आहे. सामाजिक न्याय आणि बहुजन, वंचित, शोषित घटकांच्या हक्कासाठी एकजुटीने काम करणे हा या आघाडीचा प्रमुख दृष्टिकोन आहे. या संदर्भात श्रीरंग पाटील आणि ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी स्पष्ट केले की, यांचे मुख्य उद्देश्य सामाजिक न्यायाच्या विचारधारेला बळकट करणे आणि जातिवादाच्या विरोधात ठामपणे उभे राहणे आहे.
यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, जिल्हा परिषदेसाठी नियुक्त केलेले निरीक्षक प्रशांत जगताप, वंचित बहुजन आघाडीचे विशाल गवळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या या ऐतिहासिक आघाडीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाचे परिणाम साधता येण्याची आशा आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील बहुजन, वंचित आणि शोषित समाजासाठी एक मजबूत आणि प्रभावी प्रतिनिधित्व उभे राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.उमेदवारी अर्ज प्रक्रिया आणि इतर निवडणूक संबंधित माहिती लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिली आहे.