फडणवीसांच्या ‘ब्रॅण्ड महाराष्ट्र’चा डंका!

21 Jan 2026 09:31:20
 
अग्रलेख...
 
brand maharashtra नेतृत्वाविषयीच्या अनेकांच्या कल्पना फार भाबड्या असतात. व्यासपीठावरून उच्चरवाने बोलणे, कार्यकर्त्यांना उपदेश करीत फिरणे, टोमणे मारणे, विरोधकांवर सतत टीकेचा भडिमार करणे यालाही अनेक लोक नेतृत्व समजतात. तसे अनेक नेते महाराष्ट्रात आहेत आणि देशातही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मात्र अशा पठडीत बसणारे नाही. ते सुशिक्षित आणि अनुभवी आहेत. शिवाय, शासन-प्रशासनात मुरलेले आहेत. राजकारण करताना ते खटाला खट आहेतच; पण कामातही वाघ आहेत. एखाद्या राज्याचा विकास कसा करायचा असतो, हे त्यांनी अनेक प्रकल्पांतून दाखवून दिले. मोजकी उदाहरणे द्यायची तर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू, कोस्टल रोड इत्यादी. फडणवीसांचा भर 2014 मध्ये ते मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यावर राहिला. त्यांच्या काळात केवळ मुंबई-पुणे नव्हे तर नागपूर-गडचिरोलीपर्यंतही भरभक्कम गुंतवणूक आली. अनेक उद्योग सुरू झाले. रोजगार निर्माण झाले. आता त्यांच्या ताज्या दावोस दौऱ्यानंतर गुंतवणुकीतून होणाऱ्या रोजगार निर्मितीला अधिक बळ मिळणार आहे. लाखो कोटींचे करार झाले आहेत. त्यांचे फायदे नजीकच्या भविष्यात दिसतील.
 
 
fadnvis
 
 
नेतृत्व म्हणजे संधी ओळखणे, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि संपूर्ण यंत्रणेला एकाच दिशेने कार्यरत करणे. ते फडणवीसांनी करून दाखविले. महाराष्ट्र आज ज्या टप्प्यावर उभा झालेला आहे, ते पाहिले तर एक गोष्ट निर्विवादपणे सिद्ध होते की, प्रशासकीय शिस्त, नियोजन व दूरदृष्टीतून फडणवीसांनी महाराष्ट्राच्या विकासात फार मोठे योगदान दिले आहे. कधी नव्हे तो ब्रॅण्ड महाराष्ट्र त्यांनी तयार केला आहे आणि तो देखील जागतिक पटलावर! भारतामध्ये अनेक राज्ये गुंतवणुकीसाठी स्पर्धा करीत आहेत. प्रत्येकाकडे आकर्षक सवलती, जमिनीचे दर, कर-सवलती यांची यादी आहे. या साèयांत महाराष्ट्र एका वेगळ्याच पातळीवर उभा आहे. ते वेगळेपण आहे महाराष्ट्राच्या विश्वासार्हतेत. ही विश्वासार्हता अचानक निर्माण झालेली नाही. ती फडणवीसांच्या निर्णयक्षमतेतून, दूरदृष्टीतून निर्माण झालेली आहे. उद्योगविश्वाला सर्वांत जास्त भीती असते ती अनिश्चिततेची. आज मंजुरी, उद्या आडकाठी; आज स्वागत, उद्या नियमांत बदल असे घडत राहिले तर उद्योजक त्यापासून दूर राहतात. राजकारण आणि प्रशासन यांच्यातील सीमारेषा स्पष्ट ठरवलेल्या असल्यामुळे फडणवीसांच्या धोरणात सातत्य राहिले. धोरण ठरवताना राजकीय इच्छाशक्ती आणि अंमलबजावणीत व्यावसायिकता हे त्यांच्या कार्यशैलीचे सूत्र. अशी शासकीय व प्रशासकीय संस्कृती निर्माण होणे हे मुख्यमंत्र्याचे फार मोठे यश म्हटले पाहिजे.
भारताच्या औद्योगिक नकाशावर महाराष्ट्र नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. पण फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत साराच कारभार संथ गती होता हे वास्तव. फडणवीसांनी देशी आणि विदेशी गुंतवणुकीचे महत्त्व ओळखले आणि ते कामाला लागले. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राची जी प्रतिमा फडणवीसांनी गेल्या काही वर्षांत निर्माण केली, ती भारतातील कोणत्याही राज्याला हेवा वाटेल अशीच आहे. एकेका दौèयात लाखो कोटींच्या गुंतवणूक करारांवर शिक्कामोर्तब होणे हा योगायोग नसतो. त्यासाठी भरपूर तयारी लागते. अभ्यास लागतो. शिवाय, त्या राज्याच्या नेत्याबद्दल विश्वास वाटावा लागतो. हाच विश्वास फडणवीस यांच्या नेतृत्वाचा गाभा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात येत असलेली गुंतवणूक मोजक्या क्षेत्रांपुरती नाही. हरित ऊर्जा, अन्नप्रक्रिया, पोलादनिर्मिती, आयटी-आयटीईएस, डेटा सेंटर्स, ईव्ही-ऑटोमोबाईल, जहाजबांधणी, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अशी ही यादी फार मोठी होईल. पारंपरिक उद्योगांना बळ देतानाच नव्या तंत्रज्ञानावर आधारित उद्यमांना खुले आमंत्रण देणारी ही दृष्टी राज्याला भविष्यातील विकासासाठी सज्ज करणारी आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वातील विकासाचा हा प्रवास मुंबई-पुण्यापुरता मर्यादित नाही. पालघर, रत्नागिरी, गडचिरोली, अहिल्यानगरसारख्या भागांपर्यंत उद्योग पोहोचत आहेत. ही फक्त आर्थिक विकेंद्रीकरणाची प्रक्रिया आहेच. शिवाय, तो विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. उद्योग जिथे जातात, तिथे रोजगार निर्मिती होते आणि रोजगार जिथे निर्माण होतात, तिथे स्थलांतर थांबते. फडणवीस यांच्या धोरणातला हा अबोल असा पण प्रभावी सामाजिक अर्थशास्त्राचा धडा. कुणीही आपली गुंतवणूक बेभरवशाच्या ठिकाणी करीत नाही. प्रत्येक गुंतवणूकदाराला परतावा आणि नफा हवा असतो. गुंतवणुकीच्या ठिकाणी राजकीय, सामाजिक शांतता व स्थैर्य असावे लागते. राज्याचे अर्थकारण शिस्तीत असावे लागते. शिवाय, नेतृत्वही विश्वासार्ह आणि नव्या काळातील नव्या गरजांशी जुळवून घेणारे असावे लागते. या साऱ्या अटी-शर्ती फडणवीस पूर्ण करतात. सरकार हा आपल्यासाठी अडथळा नव्हे तर भागीदार आहे, असे आश्वासन त्यांच्या नेतृत्वातून गुंतवणूकदारांना मिळते. यातून गतिमान होणाèया विकासाच्या प्रक्रियेचा सर्वांत महत्त्वाचा परिणाम असतो रोजगारनिर्मिती. लाखो कोटींच्या गुंतवणुकीसोबत लाखो नोकèया निर्माण होतात तेव्हा समाजाचे अर्थकारण बळकट होते.brand maharashtra त्यातून क्रयशक्ती वाढते, बाजारपेठ सशक्त होते, गुंतवणूक वाढते, बचतही वाढते. यातून समाजात आर्थिक स्थैर्य निर्माण होते. विशेषतः दुर्गम आणि मागास भागांत उद्योग जातात, तेव्हा त्यातून केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक व मानसिक बदल मोठ्या प्रमाणात घडतो. जागतिक अर्थकारणातील सध्याचा काळ बराच अस्थिरतेचा आहे. जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता, युद्धे, पुरवठा साखळीवरील ताण, तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल अशा साऱ्या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र हे एक स्थिर, विश्वासार्ह आणि भविष्याभिमुख राज्य म्हणून उभे राहते. कारण निर्णय घेताना केवळ आजचा विचार न करता भविष्याचा वेध घेतला जातो. जागतिक अर्थकारणातील अनिश्चिततेच्या काळातही महाराष्ट्र हे राज्य गुंतवणुकीसाठी सुरक्षित, स्थिर आणि आकर्षक पर्याय म्हणून उभे राहिले आहे. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे धोरणात्मक स्पष्टता आणि निर्णायक नेतृत्व. उद्योगविश्वाला आज जे काही हवे आहे, सोयी-सवलतींसह स्थैर्य, वेग आणि विश्वास, ते सारे महाराष्ट्रात मिळते. रिअल इस्टेट, लॉजिस्टिक्स, आयटी, डेटा सेंटर्स आणि नागरी पायाभूत सुविधांमध्ये होत असलेली अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक ही एखाद्या सेक्टरची भरभराट नव्हे. संपूर्ण शहरी अर्थव्यवस्थेची पुनर्रचना त्यामुळे होणार आहे. रोजगारनिर्मिती केवळ नोकऱ्यांपुरती मर्यादित राहत नाही. सेवा क्षेत्र, लघुउद्योग, स्टार्टअप्स आणि कौशल्याधारित रोजगारांची साखळी तयार होते. हे ‘मल्टिप्लायर इफेक्ट’चे अर्थशास्त्र फडणवीस सरकारने अचूक ओळखलेले आहे आणि दावोसमध्ये ब्रॅण्ड महाराष्ट्रला मिळालेला प्रतिसाद हा त्याचा परिणाम आहे.
महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या गडचिरोलीसारख्या भागात मोठे पोलाद प्रकल्प आले, येताहेत. या भागात दशकानुदशके विकासाचा अर्थ केवळ घोषणांपुरता मर्यादित होता. आता तिथे प्रत्यक्ष उद्योग सुरू झाले. हे वातावरण आत्मविश्वास निर्माण करणारे आहे. ‘‘आपल्याही भागात संधी आहे’’, ही भावना त्या परिसराची मानसिकता बदलणारी आहे. निर्णय प्रक्रिया वेगवान, उत्तरदायी आणि पारदर्शक असावी, हा आग्रह फडणवीस नेहमीच धरतात. ‘‘कोणाकडे जायचं?’’ हा प्रश्न गुंतवणूकदाराला पडू नये याची ते काळजी घेतात आणि त्यासाठी ‘मैत्री’ (महाराष्ट्र इंडस्ट्री, ट्रेड अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन) सारखी यंत्रणा तयार करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याचा डंका वाजतोय, त्या ब्रॅण्ड महाराष्ट्रचा हा महत्त्वाचा घटक. यातील आणखी एक मुद्दा असा की, फडणवीस यांचे नेतृत्व उद्योगकेंद्री असले तरी ते मानवी घटक विसरत नाहीत. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या, कौशल्य विकास, स्थानिक युवकांना संधी या सगळ्यांवर त्यांचा भर असतो. दावोसमध्येही त्यांनी तेच दाखविले. उद्योग वाढले, पण त्याचा फायदा स्थानिक समाजाला झाला नाही तर तो विकास टिकाऊ ठरत नाही ही जाणीव त्यांच्या धोरणांत स्पष्टपणे दिसते. दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय घेणे ही त्यांची शैली आहे. उद्योग, पायाभूत सुविधा, शहरी नियोजन या क्षेत्रांत घेतलेले निर्णय वर्तमानासाठी तर महत्त्वाचे आहेत. पुढच्या पिढ्यांना त्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळेच फडणवीसांचे नेतृत्व हे वर्तमानापुरते न राहता ते भविष्यवेधी ठरते. फडणवीसांच्या ब्रॅण्ड महाराष्ट्रचा आज जो डंका वाजतोय तो त्यामुळेच!
Powered By Sangraha 9.0