-रेल्वे टास्क टिमची कारवाई
गोंदिया,
स्थानिक पोलिस स्टेशन आणि रेल्वे पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या मोबाईल चोरीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या History sheeters caught by police तीन हिस्ट्री-शीटर्स चोरट्यांना रेल्वे टास्क टिमच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे मंडळ सुरक्षा आयुक्त दीप चंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय टास्क टिमतर्फे सतत देखरेख, गस्त आणि सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, २० जानेवारी रोजी, दादरहून- गोंदियाला रेल्वेगाडी क्रमांक १२१०५ विदर्भ एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या एका प्रवाशाच्या खिशातून ६८ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार स्थानिक रेल्वे पोलिसांकडे दाखल झाली.
याआधारे रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून आरोपी मनीष कुमार (२२ वर्षे), आर्यन नोनिया (१९ वर्षे) आणि देवराज चौधरी (१८ वर्षे) या तीन संशयीतांना ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपी देवराज चौधरी याचेकडून १ लाख १० हजार रुपये किमतीचे चोरीचे तीन मोबाईल फोन मिळून आले. चौकशीदरम्यान, आरोपींनी गोंदिया स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरील गर्दीचा फायदा घेत विदर्भ एक्सप्रेसमधून प्रवास करताना एक मोबाईल चोरल्याचे कबूल केले. तर इतर दोन मोबाईल गोंदिया बस स्थानक आणि शहरातील बाजारपेठ परिसरातून चोरी केल्याचे कबुल केले. तपासात आढळून आलेल्या माहितीनुसार अटक केलेले तिघेही आरोपी हे History sheeters caught by police हिस्ट्री-शीटर्स चोर असून त्यांच्याविरुद्ध स्थानिक पोलिस, रेल्वे पोलिस गोंदिया आणि जीआरपी नागपूर येथे मोबाइल चोरीशी संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींना, जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी रेल्वे पोलिस गोंदियाकडे सोपवण्यात आले.