चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
पांढरकवडा,
तालुक्यातील Kelapur flyover केळापूर गावाच्या हद्दीबाहेर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय वाढली आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उड्डाणपूल गावाच्या बाहेर उभारण्यात येत असल्याने शाळेत जाण्यासाठी मुलांना थेट रस्ता ओलांडण्याचा पर्याय उरलेला नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना दररोज सुमारे 200 मीटर अंतर पायी जावे लागत आहे. त्यानंतर पुन्हा 200 मीटरचा फेरा मारून शाळेच्या रस्त्यावर पोहोचावे लागत आहे. ही परिस्थिती विशेषतः लहान वयाच्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.
जड वाहतुकीची सतत वर्दळ असलेल्या या मार्गावरून लहान मुलांना चालत जावे लागणे, सुरक्षित पर्यायी मार्ग नसणे व रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका निर्माण होणे यामुळे पालकांमध्येही तीव्र चिंता व्यक्त होत आहे. या पृष्ठभूमीवर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गावातून फेरा काढत थेट उड्डाणपुलाच्या ठिकाणी जाऊन तीव्र आंदोलन केले. हातात फलक घेऊन व घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी आपली व्यथा प्रशासनासमोर मांडली. आम्हाला शाळेत जायला बोगदा द्या, अन्यथा Kelapur flyover हा उड्डाणपूल नकोच, अशी ठाम व एकमुखी मागणी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी केली. बोगद्याची सुविधा उपलब्ध झाल्यास शाळकरी मुलांसह ग्रामस्थांची ये-जा सुरक्षित व सुलभ होईल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि सर्वसामान्य गावकèयांसाठीही बोगदा अत्यंत आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. या मागणीसाठी याआधीही केळापूर ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेऊन उपविभागीय अधिकारी केळापूर, जिल्हाधिकारी यवतमाळ, आमदार प्रा. राजू तोडसाम, खासदार प्रतिभा धानोरकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच महामार्ग प्रकल्पाचे व्यवस्थापक अभिजित जिचकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
Kelapur flyover या संदर्भात वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी घेऊन समस्येची जाणीव करून देण्यात आल्यावरही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे गावकèयांमध्ये तीव्र नाराजी असून बोगदा दिला नाही तर उड्डाणपूल नकोच, या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम आहेत. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवित सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने संवेदनशीलतेने दखल घ्यावी व त्वरित बोगद्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत आहे.