पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित, अनेक गावं अंधारात
21 Jan 2026 20:43:33
सरपंच संघटना आंदोलनाच्या तयारीत
समुद्रपूर,
सन २०२१ नंतर पुन्हा एकदा महावितरण कंपनीच्या ग्रामीण भागातील पथदिव्यांचा Power outage विद्युत पुरवठा खंडित करून गावे अंधारात ढकलण्याचा बडगा उगारला आहे. या विरोधात सरपंच संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे. सन २०२१ मध्ये सरपंच संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन करून हा प्रश्न मार्गी लावला होता. ऑटोबर २०२१ मध्ये गाव खेड्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या बिलाचा भरणा यापुढे ग्रामपंचायतीने भरावा असा फतवा काढण्यात आला होता. मात्र, या निर्णयाच्या विरोधात सरपंच संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला. शेवटी या विरोधासमोर सरकारने पूर्वीप्रमाणे गावातील पथदिव्यांच्या बिलांचा भरणा हा शासनाच्या वतीने पंचायत समितीच्या स्तरावरून भरणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मे २०२२ मध्ये ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाट सुरू झाला होता.
Power outage यावेळी सुद्धा सरपंच संघटनेने आक्रमक भूमिका घेतली होती. सरकारच्या वतीने मध्यस्थी करून बिल शासन भरेल, असे सांगितले होते. या निर्णयामुळे सरपंचांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता शासनाकडून हात वर केल्याची प्रचिती पहावयास मिळत असून शासनाने बिलाचा भरणा न केल्याने ४ वर्षानंतर महावितरण कंपनीच्या वतीने पुन्हा एकदा गावे अंधारात ठेवण्याचा खेळ सुरू केला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रशासक राज आहे तर मोजया ग्रामपंचायतींमध्ये सरपंच असून आता पथदिव्यांचे लाखो रुपयांचे बील भरायचे कुठून, हा गंभीर प्रश्न प्रशासक व सरपंचांसमोर निर्माण झाला आहे. शासनाने पाठ फिरवल्याने महावितरण कंपनीकडे पथदिव्यांच्या बिलांचा भरणा न केल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यातील गावे अंधारात जाण्याच्या मार्गावर आली असून अनेक गावांतील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा सरपंच संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत, जिल्हा सचिव सचिन गांवडे, प्रसिद्धी प्रमुख विलास नवघरे, विधानसभा प्रमुख किशोर नेवल, राजू नौकरकर, मुर्लीधर चौधरी, आदींनी दिला आहे.