नवी दिल्ली,
Silver took a big leap सोन्या-चांदीच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतल्याने जळगावच्या सुवर्णनगरीत खरेदीदारांसह व्यापाऱ्यांनाही धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली दरवाढ आज नव्या विक्रमावर पोहोचली असून सोने आणि चांदीने आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी दरात मोठी वाढ नोंदवली गेली असून अवघ्या २४ तासांत सोन्याच्या दरात सुमारे अडीच हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल पंधरा हजार रुपयांची भर पडली आहे. आज जळगावमध्ये जीएसटीसह सोन्याचा दर थेट दीड लाखांच्या पुढे गेला असून तो १ लाख ५१ हजार रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीनेही विक्रमी झेप घेत जीएसटीसह ३ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा टप्पा गाठला आहे.
विशेष म्हणजे नववर्षाच्या सुरुवातीलाच सोने दीड लाखांच्या आसपास होते, तर चांदीने ३ लाख २० हजारांचा आकडा पार केला होता. मात्र केवळ वीस दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे १५ हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरात तब्बल ७८ हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. चांदीच्या दरात झालेल्या या अभूतपूर्व वाढीमागे आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्याच्या मुद्द्यावरून आठ युरोपीय देशांवर नवीन शुल्क लावण्याची धमकी दिल्यानंतर जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी स्वीडनला पाठवलेल्या पत्रातील वक्तव्य आणि ग्रीनलँडमध्ये वाढवलेली लष्करी हालचाल यामुळे आंतरराष्ट्रीय राजकीय तणाव अधिकच वाढला आहे. या घडामोडींचा थेट परिणाम सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या धातूंवर झाला असून सोन्या-चांदीच्या किंमतींनी जोरदार उसळी घेतली आहे.
तज्ज्ञांच्या मते, सध्या चांदी केवळ दागिन्यांपुरती मर्यादित न राहता गुंतवणूक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची धातू ठरत आहे. गुंतवणुकीसाठी चांदीची मागणी वाढत असतानाच सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहने आणि आधुनिक उत्पादन क्षेत्रातही तिचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. भारतातही या दोन्ही कारणांमुळे चांदीची मागणी सातत्याने वाढत असून त्यामुळे दर दीर्घकाळ चढते राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.