वॉशिंग्टन,
Sunita Williams' retirement २७ वर्षांची सेवा, तीन अंतराळ मोहिमा आणि तब्बल ६०८ दिवस अंतराळात घालवल्यानंतर नासाच्या ज्येष्ठ अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी निवृत्ती घेतली आहे. भारतीय वंशाच्या असलेल्या सुनीता विल्यम्स या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक महिने अडकलेल्या दोन अंतराळवीरांपैकी एक होत्या. नासाने मंगळवारी जाहीर केले की त्यांची निवृत्ती गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस अधिकृतपणे लागू झाली आहे.
विल्यम्स आणि विल्मोर यांना २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आले होते आणि ते बोईंगच्या नव्या स्टारलाइनर कॅप्सूलवर उड्डाण करणारे पहिले अंतराळवीर ठरले. मूळ नियोजनानुसार हे मिशन केवळ एका आठवड्याचे होते, मात्र स्टारलाइनरमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे हे मिशन नऊ महिन्यांहून अधिक काळ वाढले. अखेर गेल्या मार्च महिन्यात दोघेही सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले. ६० वर्षीय सुनीता विल्यम्स या माजी नौदल कॅप्टन असून त्यांनी नासामध्ये २७ वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावली. त्यांनी तीन वेगवेगळ्या अंतराळ स्थानक मोहिमांमध्ये सहभाग घेत एकूण ६०८ दिवस अंतराळात वास्तव्य केले. याशिवाय एका महिलेने सर्वाधिक काळ अंतराळात चालण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांनी एकूण ६२ तास स्पेसवॉक केला आहे.
नासाचे नवे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी सुनीता विल्यम्स यांचे “अंतराळ उड्डाण क्षेत्रातील प्रणेते” म्हणून कौतुक केले. निवेदनात त्यांनी त्यांच्या निवृत्तीबद्दल अभिनंदन करत त्यांच्या योगदानाचा गौरव केला. दरम्यान, बोईंगचे पुढील स्टारलाइनर मिशन हे मानवांना न नेता केवळ मालवाहतुकीसाठी असणार आहे. भविष्यात कोणालाही अंतराळात पाठवण्यापूर्वी कॅप्सूलच्या थ्रस्टर्ससह सर्व तांत्रिक अडचणी पूर्णपणे दूर केल्या जातील, अशी ग्वाही नासाने दिली आहे. हे चाचणी उड्डाण या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. सुनीता विल्यम्स यांचे वडील दीपक पंड्या हे प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट होते आणि मूळचे गुजरातचे होते, तर त्यांची आई उर्सुलिन बोनी पंड्या या स्लोव्हेनियन-अमेरिकन वंशाच्या होत्या. अंतराळ संशोधनाच्या इतिहासात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची निवृत्ती हा अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.