...तर इराण नकाशावरून पुसून टाकू!

21 Jan 2026 09:39:20
वॉशिंग्टन,
trump-aggressive-iran जर इराणने माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका इराणला जगाच्या नकाशावरून पुसून टाकेल, असे कडक विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. वॉशिंग्टनमध्ये न्यूज नेशनच्या ‘केटी पावलिच टुनाईट’ या कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इराणबाबत आपली आक्रमक भूमिका पुन्हा स्पष्ट केली. ट्रम्प म्हणाले की, त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कठोर सूचना दिल्या आहेत की त्यांच्या जीवाला काहीही धोका निर्माण झाला, तर इराणवर निर्णायक कारवाई करण्यात यावी. हे विधान अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव टोकाला पोहोचला आहे.
 
 
trump-aggressive-iran
 
ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर इराणकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. इराणी लष्कराचे प्रवक्ते जनरल अबुल फजल शेखरची यांनी ट्रम्प यांना इशारा देत म्हटले की, जर कोणी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्याकडे वाईट हेतूने हात पुढे केला, तर तो हात तोडून टाकला जाईलच, शिवाय संपूर्ण जग पेटवण्याची ताकद इराणकडे आहे. ट्रम्प यांनी खमेनी यांच्या जवळपास चार दशकांच्या सत्तेचा अंत करण्याचे आवाहन केल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे.
 
याआधीही ट्रम्प यांनी इराणविरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, जर इराणने त्यांच्या हत्येचा कट रचला, तर इराणला पूर्णपणे नष्ट करण्याचे आदेश त्यांनी आपल्या सल्लागारांना दिले आहेत. पॉलिटिकोला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प यांनी अयातुल्ला खमेनी यांना “आजारी माणूस” असे संबोधत, त्यांनी देश योग्य पद्धतीने चालवावा आणि लोकांची हत्या थांबवावी, असेही म्हटले होते. इराणला नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे विधानही त्यांनी केले होते.
 
 
२८ डिसेंबरपासून इराणमध्ये सुरू झालेल्या निदर्शनांनंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अधिकच वाढला आहे. कमकुवत अर्थव्यवस्थेविरोधात ही आंदोलने सुरू झाली होती, मात्र त्यावर अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे हिंसाचार भडकला. या पार्श्वभूमीवर अमेरिकन लष्कराची तैनाती करण्यात आल्याने दोन्ही देशांमधील संघर्षाचे वातावरण अधिक गंभीर झाले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचा विषय ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0