जिद्दीचे पंख आणि आत्मविश्वासाचे बळ...

21 Jan 2026 13:31:05
भंडारा,
first air tourism वैमानिक होण्याची इच्छा होती, परिस्थिती विपरीत आली. इच्छित पूर्ण झाले नसले म्हणून काय? मनात जिद्द कायम होती. एरोमॉडेलिंग चे प्रशिक्षण घेऊन त्याने स्वतःला सिद्ध केले आणि आज विदर्भातील पहिले हवाई पर्यटनाचे केंद्र भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू करून पर्यटनाच्या नव्या आयामाचा मुहूर्त साधला. पंखात बळ आणि मनात जिद्द असेल तर त् आभाळही ठेंगणे असते, हेच सांगणारे धाडस करणारा तरुण म्हणजे निलेश धुर्वे! ग्रामीण भागातील तरुण शेती किंवा पारंपरिक नोकरीच्या मागे धावताना दिसतात. मात्र, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील हत्तीडोई सारख्या छोट्याशा गावातील निलेश धुर्वे या तरुणाने चक्क आभाळाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरविले. वरठी नजीकच्या खोडगाव नदीच्या संथ प्रवाहाकाठी निलेश यांनी 'महर्षी ॲडव्हेंचर' या माध्यमातून साहसी पर्यटनाचे एक नवे दालन उभारले आहे. हा प्रकल्प म्हणजे केवळ व्यवसाय नसून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व निर्माण करणारा एक रोमहर्षक प्रवासच म्हणावा लागेल.
 
 

nilesh 
 
 
निलेश धुर्वे यांचे प्राथमिक शिक्षण मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. शालेय वयातच कागदी विमाने बनवताना, विमानांच्या तंत्रज्ञानाने त्यांच्या बालमनाला भुरळ घातली. 'एरोनॉटिकल मॉडेलिंग'च्या आवडीने त्यांच्या मनात भविष्यातील पायलट होण्याची ठिणगी टाकली. परंतु, वास्तव हे स्वप्नापेक्षा कठीण होते. घरची आर्थिक ओढाताण आणि विमान वाहतूक क्षेत्रातील त्यावेळची मंदी यामुळे वैमानिक होण्याचे रीतसर शिक्षण घेणे निलेश यांच्यासाठी अशक्यप्राय झाले होते. म्हणून निलेश यांनी हार मानली नाही. त्यांनी हवाई एनसीसीच्या माध्यमातून स्वतःला घडविले. या क्षेत्रातील तांत्रिक बारकावे, वाऱ्याचा वेग, हवामानाचा अंदाज आणि उपकरणांची हाताळणी याचे रीतसर प्रशिक्षण पूर्ण केले. ते केवळ प्रशिक्षण घेऊन थांबले नाही, तर आपल्या कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय एरोमॉडेलिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावून जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर कोरले. विविध साहसी संस्थांसोबत काम करताना त्यांनी या क्षेत्रातील 'एक्स्पर्ट' म्हणून ओळख निर्माण केली. इस्रायलसारख्या तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या देशातून येणारी महागडी उपकरणे हाताळताना या गोष्टीचा आनंद पुण्या-मुंबईसारख्या शहरातील लोक घेऊ शकतात, तर माझ्या भंडाऱ्यातील सामान्य नागरिकांना हे सुख का मिळू नये?" याच विचाराने 'महर्षी ॲडव्हेंचर'ची पायाभरणी झाली.
हवाई पर्यटनासाठी सुरक्षित आणि योग्य जागा मिळवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. जिथे वीजवाहिन्यांचा अडथळा नाही आणि जिथे निसर्गाचे वरदान लाभले आहे, अशा जागेचा शोध घेताना त्यांना वरठी जवळील खोडगाव नदीपात्राचे लोभसवाणे ठिकाण मिळाले. गेल्या तीन वर्षांपासून निलेश या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. आपल्या आईच्या नावाने 'महर्षी ॲडव्हेंचर' या संस्थेची स्थापना केली. या प्रकल्पात केवळ करमणूक नाही, तर जिवाची धडधड वाढवणारा थरार आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य अनुभवता येते. आकाशात एका मोठ्या फुग्याच्या मदतीने संथपणे तरंगताना, खाली वाहणारी नदी आणि हिरवागार निसर्ग पाहण्याचा अनुभव राजेशाही आहे. पाठीवर इंजिन बांधून, पॅराशूटच्या मदतीने पक्षांसारखे आकाशात विहार करणे, हा अनुभव शब्दांत वर्णन करण्यापलीकडचा आहे. अन्यही साहसी खेळ येथे आहेत. सोबतच शहराच्या गजबजाटापासून दूर, नदीकाठी तंबूत राहून रात्रीच्या चांदण्याचा आनंद घेणे, ही पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. हा प्रकल्प केवळ पर्यटनापुरता मर्यादित नाही. त्यांनी आपल्या परिसरातील युवक-युवतींना या साहसी खेळांचे विशेष प्रशिक्षण दिले आहे.first air tourism आज या केंद्रात अनेक स्थानिक तरुण गाईड आणि प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. "विदर्भातील तरुणांमध्ये ताकद आहे, फक्त त्यांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे," असे निलेश आत्मविश्वासाने सांगतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो हातांना रोजगार देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. एका तरुणाच्या या प्रयत्नाला शासन प्रशासनाचे बळ मिळाल्यास भविष्यात साहसी पर्यटनाचा नवा अध्याय भंडाऱ्याच्या जिल्ह्याच्या नावाने लिहिला जाऊ शकेल.
Powered By Sangraha 9.0