तू धाडसी वडिलांची धाडसी मुलगी!

22 Jan 2026 16:14:25
ठाणे,
Owaisi's statement on Sahar Sheikh ठाणे महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ३० मधून एआयएमआयएमच्या उमेदवार सहर शेख यांनी दणदणीत विजय मिळवला असून त्यांच्या यशाबद्दल पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. २५ वर्षीय सहर शेख यांनी सांगितले की, ओवैसी हे वैयक्तिक कारणांमुळे फोन करू शकले नाहीत, मात्र त्यांनी संदेश पाठवून आपली भावना व्यक्त केली. त्या संदेशात ओवैसी यांनी, तू अतिशय धाडसी वडिलांची धाडसी मुलगी आहेस. भविष्यात आणखी उत्तम काम करशील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे म्हटले असून हा संदेश वाचून आपल्याला खूप आनंद झाला, असे सहर शेख यांनी सांगितले.
 
 
 Sahar Sheikh
 
सहर शेख यांनी पुढे सांगितले की, एआयएमआयएमचे नेते खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनीही त्यांना फोन करून विजयाबद्दल अभिनंदन केले. ते खूप आनंदी होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पक्ष माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यांच्या फोनमुळे मला एआयएमआयएमकडून मिळणारा पाठिंबा अधिक ठळकपणे जाणवला, असे त्या म्हणाल्या. आपल्या कामाबाबत बोलताना सहर शेख यांनी सांगितले की, गेल्या सहा-सात वर्षांत लोकांनी दाखवलेला विश्वास जपण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला. “माझ्याकडे मदतीसाठी येणारे लोक आधी अल्लाहकडे दार ठोठावतात आणि मग अल्लाह त्यांना माझ्यापर्यंत आणतो, अशी माझी भावना आहे. मी कधीही कोणालाही निराश केले नाही. एखादे काम माझ्याकडून थेट होऊ शकत नसेल, तर माझ्या संपर्कांद्वारे त्यांना मदत करण्याचा मी नेहमी प्रयत्न केला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 
सहर शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संदर्भातही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, त्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी द्यायची इच्छा नव्हती आणि त्यामागे पॅनेलचा दबाव असल्याचे कारण सांगण्यात आले. हा निर्णय चुकीचा ठरला आणि त्यामुळेच पक्ष कमकुवत झाला. आमचे त्यांच्याशी कौटुंबिक नाते असल्याने आम्ही वैयक्तिक पातळीवरही विचारणा केली, पण त्यांच्या उत्तरांवरून स्पष्ट झाले की मला निवडणूक लढवू द्यायचीच नव्हती, असा दावा त्यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या की, जरी एका पक्षाने तिकीट नाकारले तरी इतरांकडून ऑफर होत्या. त्यांना भीती होती की मी दुसऱ्या पक्षात जाईन, मात्र अखेर संपूर्ण चित्र बदलले. सहर शेख यांचे वडील युनूस शेख हे पूर्वी शरद पवार गटात होते आणि त्यांनी मुलीसाठी तिकीट मागितले होते. ते न मिळाल्यानंतर त्यांनी एआयएमआयएममध्ये प्रवेश केला आणि अखेर सहर शेख यांनी निवडणूक जिंकत पक्षाला यश मिळवून दिले.
 
 
Powered By Sangraha 9.0