दिल्ली वार्तापत्र
nitin naveens भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांनी मंगळवारी सूत्रे स्वीकारली. भाजपचेच नाही तर देशातील सर्व राष्ट्रीय पक्षातील सर्वांत तरुण अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांच्या नावाची नोंद झाली आहे. भाजप जेवढा तरुण तेवढेच त्याचे राष्ट्रीय अध्यक्षही तरुण आहेत, योगायोग म्हणजे दोघेही एकाच वयाचे म्हणजे 45 वर्षांचे आहेत. भाजप हा पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखला जातो, म्हणजे भाजप हा देशातील अन्य राष्ट्रीय पक्षांपेक्षा आचार, विचार आणि कृतीने वेगळा पक्ष आहे. आपल्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करताना भाजपने हे दाखवून दिले.
भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, तर काँग्रेस हा नेत्यांचा. त्यामुळे काँग्रेसमध्ये आजपर्यंत एकाही कार्यकर्त्यांची पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली नाही, तर कोणत्या तरी मोठ्या त्यातही गांधी घराण्यातील नेत्याच्या गळ्यातच अध्यक्षपदाची माळ टाकण्यात येते. गांधी घराण्यातील नेता अध्यक्ष होत नसेल तर त्या घराण्याच्या चरणी आपली निष्ठा वाहणाèया नेत्याला अध्यक्ष केले जाते. पण भाजपमध्ये नितीन नबीन यांच्यासारख्या तळागाळातील, तसेच पक्षाच्या समर्पित आणि प्रामाणिक नेत्याची पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
एवढेच नाही तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हेच संघटनात्मक बाबतीत माझे ‘बॉस’ असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे हे माझे बॉस असल्याचे विधान कधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या तोंडून कोणाला ऐकू आले नाही. काँग्रेसमध्ये खडगे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी पक्षात त्यांचे स्थान सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे, असे म्हटले तर ते चूक ठरूरु नये. त्या पृष्ठभूमीवर नबीन हेच माझे बॉस हे मोदी यांचे विधान उठून दिसणारे आहे.
राष्ट्रीय राजकारणात नसणारे पण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले नबीन हे नितीन गडकरी यांच्यानंतर दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. नितीन नबीन यांच्या तुलनेत गडकरी हे तेव्हा राष्ट्रीय राजकारणात नसले तरी चर्चित व्यक्तिमत्त्व होते. देशातील लोक त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून महाराष्ट्रात केलेल्या कामासाठी ओळखत होते. योगायोग म्हणजे अध्यक्ष होण्याआधी गडकरी यांच्याप्रमाणे नितीन नबीनही बिहारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. नितीन गडकरी शिवसेनेचे मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात तर नबीन हे जदयुचे नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. म्हणजे दोन्ही नेते मित्रपक्षाच्या नेतृत्वातील युतीच्या मंत्रिमंडळात होते.
1980 मध्ये भाजपची स्थापना झाल्यापासून नितीन नबीन भाजपाचे अध्यक्ष म्हणून पंधरावे तर व्यक्ती म्हणून बारावे अध्यक्ष आहेत. जगतप्रकाश नड्डा यांच्याकडून नबीन यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली. जानेवारी 2020 ला नड्डा यांची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. भाजपाच्या अध्यक्षाचा कार्यकाळ हा सामान्यपणे तीन वर्षांचा असतो, पण नड्डा यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक आणि अन्य कारणामुंळे दोन कार्यकाळ म्हणजे सहा वर्षे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले. सलग सहा वर्षे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवणारे नड्डा हे अटलबिहारी वाजपेयी आणि अमित शाह यांच्यानंतरचे तिसरे नेते आहेत.
1980 मध्ये भाजपाची स्थापना झाल्यानंतर अटलबिहारी भाजपाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष झाले. 1980 ते 1986 असे सलग सहा वर्षे वाजपेयी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले. विशेष म्हणजे वाजपेयी यांनी नंतर सहा वर्षे देशाचे पंतप्रधानपदही यशस्वीपणे सांभाळले. देशाचे पंतप्रधान झालेले वाजपेयी हे भाजपाचे आतापर्यंतचे तरी एकमेव अध्यक्ष आहेत. नरेंद्र मोदी सलग अकरा वर्षांपासून देशाचे पंतप्रधान आहेत, पण ते भाजपाचे अध्यक्ष कधी नव्हते. लालकृष्ण अडवाणी देशाचे उपपंतप्रधान झाले, पण पंतप्रधानपदाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. लालकृष्ण अडवाणी तीन वेळा तर राजनाथसिंह दोन वेळा भाजपाचे अध्यक्ष होते.
भाजपाचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान लालकृष्ण अडवाणी यांच्या नावावर आहे. अडवाणी यांनी तीन कार्यकाळ मिळून अकरा वर्षे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले. तर सर्वांत कमी काळ भाजपाचे अध्यक्षपद सांभाळण्याचा विक्रम बंगारू लक्ष्मण आणि जना कृष्णमूर्ती यांच्याकडे आहे. हे दोघे प्रत्येकी फक्त एक वर्ष अध्यक्ष होते.
1986 ते 1991 अशा पहिल्या कार्यकाळात अडवाणी पाच वर्षे भाजपाचे अध्यक्ष होते. दुसèया कार्यकाळात 1993 ते 1998 असे आणखी पाच वर्षे अध्यक्ष होते. अडवाणी यांचा भाजप अध्यक्ष म्हणून तिसरा कार्यकाळ 2004 ते 2005 असा एक वर्षाचा होता. डॉ. मुरलीमनोहर जोशी 1991 ते 1993 असे दोन वर्ष भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
1998 ते 2000 अशी दोन वर्षे कुशाभाऊ ठाकरे भाजपाचे अध्यक्ष होते. बंगारू लक्ष्मण आणि जना कृष्णमूर्ती सर्वांत कमी कार्यकाळ म्हणजे प्रत्येकी एक वर्ष भाजपाचे अध्यक्ष होते. बंगारू लक्ष्मण यांनी 2000 ते 2001 तर जना कृष्णमूर्ती यांनी 2001 ते 2002 या काळात भाजपाचे अध्यक्षपद सांभाळले. 2002 ते 2004 या काळात व्यंकय्या नायडू भाजपाचे अध्यक्ष होते. व्यंकय्या नायडू यांनी नंतर देशाचे उपराष्ट्रपतिपदही भूषवले. उपराष्ट्रपतिपदाची जबाबदारी सांभाळणारे नायडूही भाजपाचे एकमेव अध्यक्ष आहेत.
2005 ते 2009 असे चार वर्ष राजनाथसिंह भाजपाचे अध्यक्ष होते. 2009 ते 2013 असे चार वर्ष नितीन गडकरी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले. 2013 ते 2014 असे नंतर एक वर्ष पुन्हा राजनाथसिंह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपाने राजनाथसिंह यांच्या नेतृत्वात लढवली आणि देशाच्या इतिहासात प्रथमच स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवले. या निवडणुकीतच भाजपाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केले होते.
2014 ते 2020 असे सलग सहा वर्ष अमित शाह यांनी भाजपाचे अध्यक्षपद सांभाळले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाहच भाजपाचे राष्ट्रीय होते. या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर दुसèयांदा बहुमत मिळवले. अमित शाह यांच्यानंतर जगतप्रकाश नड्डा यांच्याकडे भाजपाचे अध्यक्षपद आले. 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपाने नड्डा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात लढवली, पण या निवडणुकीत भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. भाजपाचा विजयरथ 240 वर अडकला.
2029 ची लोकसभा निवडणूक भाजपा नितीन नबीन यांच्या नेतृत्वात लढवणार हे निश्चित आहे. 2029 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवून देण्याचे आव्हान नबीन यांच्यासमोर राहणार आहे. हे शिवधनुष्य ते यशस्वीपणे पेलतील यात शंका नाही. पण त्याला अजून तीन वर्ष आहेत, त्याआधी या वर्षात तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या दोन राज्यांत आतापर्यंत भाजपाला कधीच सत्ता मिळाली नाही. त्यामुळे या राज्यात भाजपाला सत्तेवर आणण्याचे आव्हान नबीन यांच्यासमोर आहे, यातच त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी या दोन राज्यांतील निवडणूक नबीन यांना भाजपाला कोणत्याही स्थितीत जिंकून द्यावी लागणार आहे.
श्यामकांत जहागीरदार
9881717817