वेध
- रेवती जोशी-अंधारे
t20 world cup क्रिकेटप्रेम हा नवा धर्म आहे, हे विधान धाडसाचे ठरणार नाही. धर्मांध सूडाग्नीने पेटलेल्या बांगलादेशने मात्र या धर्माशी प्रतारणा केली आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात होऊ घातलेल्या झटपट क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेसाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. पण, बांगलादेशने या आयोजनात मिठाचा खडा घातला आहे. भारताविषयी विनाकारण आकस ठेवून विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास नकार देणाऱ्या दिवाळखोर बांगलादेशचा सर्वार्थाने ‘खेला’ होणार आहे. क्रीडा, फॅशन, फिल्म आणि संगीत या क्षेत्रांना सीमांचे बंधन नाही, हे तर आम्ही बरीच वर्षे ऐकलेले सुविचार आहेत पण, कदाचित बांगलादेशींना अशी शिकवण कोणी दिली नाही. म्हणूनच, बिघडलेल्या राजकीय संबंधांचे प्रतिबिंब क्रिकेटच्या मैदानावर पाडण्याची ‘नादानी’ त्यांना सुचली आहे. पण, हे करताना ‘बाप तो हमेशा बाप ही रहेगा’ या पाकिस्तानला माहिती असलेल्या सत्याचा, बांगलादेशला मात्र विसर पडला आहे. आमची टीम भारतीय मैदानांवर खेळणार नाही, आमची व्यवस्था सहआयोजक श्रीलंकेच्या मैदानावर करून द्या, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाकडे केली.
पण, आयसीसीने त्यांच्या या मागणीला अजिबात भीक न घालता, खेळायचे असेल तर भारतातच खेळावे लागेल, असा सज्जड दम भरला. भारताचे उपकार विसरलेल्या बांगलादेशने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आणि स्कॉटलॅण्डचा स्पर्धेत प्रवेश झाला.
बांगलादेश क्रिकेटचा इतिहासच मुळात भारताने लिहिला आणि दुर्दैवाने त्याच जोरावर आज ही मुजोरी सुरू आहे. वर्ष 1998 पर्यंत बांगलादेश आयसीसीचा पूर्णकालीन सदस्य नसतानाही, मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष जगमोहन डालमिया यांनी ढाक्यातील वंगबंधू नॅशनल स्टेडियममध्ये आयसीसीची नॉकआऊट टूर्नामेंट आयोजित केली. या आयोजनामुळे बांगलादेश क्रिकेटला जगभरात ओळख मिळाली. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या पाठिंब्यामुळेच जून 2000 मध्ये आयसीसीने बांगलादेशला टेस्ट क्रिकेट स्टेटस दिला. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात बांगलादेश डेब्यू कसोटी सामना भारताच्याच विरोधात ढाक्यात खेळला. विशेष म्हणजे कर्णधार म्हणून सौरव गांगुलीचाही हा पहिलाच कसोटी सामना होता. यानंतरही दोन्ही देशांमध्ये नियमितपणे क्रिकेट सामन्यांच्या मालिका खेळल्या गेल्या. भारतीय क्रिकेट संघ, भारतीय खेळाडू यांच्याभोवतीचे वलय बघता, या मालिकांचा अप्रत्यक्षरीत्या फायदा बांगलादेश क्रिकेटलाच मिळाला. पण, गेल्या दोन वर्षांत बांगलादेश बदलत्या राजकारणामुळे भारताला सोडून, नवे मित्र जोडण्यास उत्सुक झाला आहे. बीसीबीच्या निर्णयामागे दोन कारणे दिसतात. पहिले म्हणजे आयपीएलमधून मुस्तफिजुर रहमानची हकालपट्टी! अभिनेता शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सने रहमानला साभार परत केल्यानंतर, अकडूपणा दाखवत बांगलादेशने आयपीएल प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय घेऊन आर्थिक दिवाळखोरीची पायाभरणी केली. तर, दुसरे कारण म्हणजे बांगलादेशातील सत्तापालटानंतर भारताच्या आश्रयाला आलेल्या शेख हसीना! शिवाय, बीसीसीआयच्या कठोर भूमिकेनंतर भारत-पाकिस्तान सामने दुबईत खेळवले गेले.t20 world cup या पृष्ठभूमीवर आपणही संधी साधावी, असा केविलवाणा प्रयत्न बांगलादेशने करून बघितला. पण, कुठे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ज्यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास 10 हजार कोटी रुपये आहे जे आयसीसीच्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे आणि कुठे बांगलादेश क्रिकेट बोर्ड ज्यांची वार्षिक कमाई 425 कोटी इतकी आहे. भारतीय चलनात एका टक्याची किंमत 75 पैसे आहे, हे उल्लेखनीय! ‘कहां राजा भोज, कहां गंगूतेली’ असेच हे समीकरण आहे.
या सगळ्यावर कडी म्हणजे बीसीबीचा अध्यक्ष आसिफ नजरुलचे वक्तव्य! ‘आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. बांगलादेश विश्वचषक खेळला नाही तर काय परिणाम होतील, हे जग बघेल,’ असा धमकीवजा इशारा नजरुलने क्रिकेटजगताला दिला आहे. बांगलादेशचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळवावेत का? यावर आयसीसीने घेतलेल्या एकूण 16 देशांच्या मतदानात फक्त पाकिस्तान आणि बांगलादेशने समर्थनाचे मत दिले आणि उर्वरित 14 देशांनी याचा विरोध केला. दररोज सरासरी एका हिंदूची हत्या करणाèया बांगलादेशींना भारतात येणाèया त्यांच्या क्रिकेट चमूच्या सुरक्षेची काळजी आहे, म्हणे! खरे तर आम्हीच बांगलादेशासोबत खेळणार नाही, पाकिस्तानप्रमाणे त्यांच्यासोबतही औपचारिक वागणूक ठेवू ही भूमिका भारतीय क्रिकेटनेच घ्यायला हवी होती. पण, आपल्या मनावर ‘सुविचार’ पक्के कोरलेले असल्यामुळे, उदारमतवादी भूमिका घेणाèया भारतापुढे बांगलादेश अडेलतट्टूपणा करतोय. परिणामी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट राजकारणात बांगलादेशचाच ‘खेला होबे’!
9850339240