examination pattern प्राध्यापकी पेशात एखाद्या हाडाच्या शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवणे, विद्यार्थ्यांमध्ये रमणे जेवढे आवडते तेवढेच त्या शिक्षकाला दोन गोष्टी अत्यंत टाळाव्याशा वाटतात. पण गंमत अशी आहे की टाळाव्याशा वाटणाऱ्या या दोन्ही गोष्टी त्याच्या पेशाचा अविभाज्य अंग असल्याने त्याने कितीही टाळाव्या म्हटल्यात तरी तो टाळू शकत नाही. एक म्हणजे परीक्षांदरम्यान पर्यवेक्षण करणे आणि दुसरी म्हणजे परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणे.
माझ्या बाबतीत मी या दोन्हीवर उतारा काढलाय. पर्यवेक्षण सुरू असताना जे आवश्यक काम आहे (परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांवर सह्या, बारकोड्स चिकटवणे, परीक्षाविषयक इतर नोंदी करणे वगैरे) ते साधारण अर्ध्या तासात संपवून उरलेला दीड-अडीच तास हा अगदी आपला वेळ असतो. या वेळात मी माझ्या लिखाणासंबंधी चिंतन करतो. एखादे टिपण घ्यावेसे वाटले तर जवळच्या छोट्या डायरीत टिपून घेतो. मनात खूप दिवसांपासून घोळत असलेल्या एखाद्या कल्पनेचा विस्तार करायचा असेल तर या वेळासारखा दुसरा वेळ नाही. हा वेळ मी असा सत्कारणी लावतो.
आणि परीक्षा झाल्या झाल्या पेपर्स तपासून घेतले म्हणजे मग पेपर तपासणीचे कामसुद्धा कंटाळवाणे होत नाही. अशा प्रकारे शिक्षकी पेशातल्या या टाळाव्याशा वाटणाऱ्या पण टाळता न येणाèया बाबींवर मी माझा तोडगा काढलेला आहे.
या पर्यवेक्षणादरम्यान माझ्या मनात या परीक्षा पद्धतींबाबत कायमच एक प्रश्नचिन्ह तयार होत असते. आजची आपली पारंपरिक परीक्षा पद्धती ही कालबाह्य होतेय का? आणि होत असली तर सर्वांनाच हे पटूनही त्यावर उपाययोजना का होत नाही?
पाठांतरावर आधारित परीक्षा पद्धतीला माझा विरोध नाही. ज्या ज्या देशांनी, संस्कृतींनी पाठांतरावर आधारित परीक्षा पद्धतीला पहिलेपासून झुगारून दिलेले आहे त्यांच्या शिक्षणपद्धतीचे काय हाल झालेत? ते आपण आज बघतोय. पाठांतरावर आधारित परीक्षा पद्धती हवीच पण ती पदवीला प्रवेश घेईपर्यंत. तोपर्यंत विद्यार्थ्यांचा मेंदू पाठांतरावर छान तयार व्हायला हवा.
पदवी परीक्षेत मात्र पाठांतरावर भर नकोय. पदवीच्या अगदी पहिल्या वर्षापासूनच. पदवी मिळवतोय म्हणजे जो विषय आपण पदवीसाठी निवडलाय त्यात मला कौशल्य प्राप्त करायचेय. मग त्यात आपली पारंपरिक परीक्षा पद्धती थिटी पडतेय असे मला ठामपणे वाटत आलेले आहे. या सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठांतर परीक्षेऐवजी त्यांनी त्या विषयातले किती कौशल्य अर्जित केले याचे मूल्यमापन व्हावे असे मला वाटते. आणि आजचा काळ हा सर्वार्थाने या सर्व बदलांसाठी अनुकूल असताना तर हे करणे अत्यंत सोपी आहे. फक्त कुणीतरी तसा ठाम निर्णय घेऊन तसे पाठबळ या नवविचारांना द्यायला हवे.
कोरोना काळात घरी बसल्या बसल्या, महाविद्यालयात रोजचे जाण्यायेण्याचे तास वाचल्याने, फक्त थेअरी लेक्चर्स घ्यायचे असल्याने प्रात्यक्षिकांचे तास वाचल्याने उरलेल्या वेळात आपल्यापैकी बèयाच जणांनी कोर्सेरासारख्या ऑनलाईन माध्यमावर अनेक विषय शिकले. मी पण त्यातलाच एक होतो. माझ्या विषयाव्यतिरिक्त मी अनेक नवीन तंत्रज्ञान त्या माध्यमातून शिकलो. त्या अभ्यासक्रमात अनेक तज्ज्ञांची व्हिडीओ लेक्चर्स असतात, त्यांच्या नोट्स दिलेल्या असतात. आपण ते बघायचे आणि आपल्याला कळलेय की नाही हे बघायला त्यांच्या परीक्षा द्यायच्यात. परीक्षा पण ऑनलाईनच. परीक्षेदरम्यान त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आपण त्यांचे व्हिडीओ बघू शकतो, नोट्स वाचू शकतो. कारण शेवटी ही परीक्षा आपल्या आकलनाची असते आपल्या पाठांतराची नव्हे. आणि परीक्षेतले प्रश्न सुद्धा नोट्स वाचून, व्हिडीओज पाहून त्यातून थेट उत्तरे देण्यासारखे नसतात. परीक्षेतले प्रश्न सुद्धा आपल्या आकलनावर आधारित असतात आणि बèयाचशा विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी चक्क 80 टक्के गुण मिळवायचे असतात. समजा एखाद्या दिवशी आपण त्या परीक्षेत तेवढे गुण प्राप्त करू शकलो नाही तर पुन्हा 24 तासांनीच ती परीक्षा पुन्हा द्यायला मिळते तोपर्यंत तो पेपर आपल्या कॉम्प्युटरवर पुन्हा उघडत नाही. 24 तासांत पुन्हा तेवढे ज्ञान प्राप्त करायचे, तेवढे आकलन प्राप्त करायचे आणि मग परीक्षा द्यायची. मला ही पद्धत फार आवडली.
आज मी संगणक अभियांत्रिकी, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता वगैरे क्षेत्रातले विद्यार्थी आजच्या पारंपरिक परीक्षा पद्धतीत प्रोग्रॅमिंगचे पेपर्स लिहिताना बघितले की त्यांची, त्यांचे पेपर्स तपासणाèयांची आणि या एकूणच परीक्षा पद्धतीची कीव येते. एखादा कॉम्प्युटर प्रोग्राम कागदावर लिहिताना तो नीट चालतोय की नाही हे त्या विद्यार्थ्याला कसे कळणार? तो प्रोग्राम बरोबर लिहिलाय की नाही हे त्या पेपर तपासणाèयाला तरी कसे कळणार? हे माझ्यापुढचे गहन प्रश्न आहेत. त्यापेक्षा त्यांची अशी कोर्सेरा पद्धतीची परीक्षा झाली असती तर तो प्रोग्राम चालतोय की नाही हे त्यांचे त्यांनाच कळले असते. त्यातल्या चुका कशा काढायच्या याचे कौशल्य त्यांचे त्यांनीच मिळवले असते. यात परीक्षकाची भूमिका केवळ तसा पेपर देण्याची आणि अशा ऑनलाईन माध्यमात जर व्यवस्थित नियोजन केले तर प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच काठिण्यपातळीचे पण वेगवेगळे प्रोग्राम्स लिहायला सांगता येऊ शकेल त्यामुळे एकमेकांचे बघून लिहिणे वगैरे प्रकार टळू शकतील.
आजकाल तर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून अनेक सॉफ्टवेअर कंपन्या विद्यार्थ्यांची घरबसल्या परीक्षा घेत असतात. एकाच वेळी अक्षरशः हजारो विद्यार्थ्यांची. त्यात त्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या विंडो व्यतिरिक्त दुसरी विंडो (गूगल, चॅट जीपीटी वगैरेला विचारण्यासाठी) नुसती उघडली तरी त्या विद्यार्थ्याची परीक्षाच रद्द होते. त्या विद्यार्थ्याच्या लॅपटॉप / डेस्कटॉपचा कॅमेरा त्या विद्यार्थ्याच्या सगळ्या हालचाली टिपत असतो. थोडीही संशयास्पद हालचाल, बोलणे त्यात दिसले की एक वॉर्निंग येते आणि त्या वॉर्निंगला भीक न घालता आपण आपले चुकीचे काम सुरूच ठेवले तर त्या विद्यार्थ्याची ती परीक्षा रद्द होते.
हे आधुनिक तंत्रज्ञान आता सर्वत्र उपलब्ध आहे आणि सर्व विद्यापीठांना शैक्षणिक संस्थांना अगदी परवडण्यासारखे आहे. मग आजकालच्या युगातल्या परीक्षा अशा स्मार्ट पद्धतीने का होऊ नयेत?
नरसी मोनजी विद्यापीठात अध्यापन करीत असताना माझे मार्गदर्शक आणि विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. शरद म्हैसकर आमच्या स्थापत्य अभियांत्रिकीतला एक अत्यंत कठीण विषय शिकवीत असत. भूतंत्रज्ञान अभियांत्रिकी. पारंपरिक परीक्षा पद्धतीत या विषयासाठी खूप फॉॅर्म्युले, खूप डेरिव्हेशन्स, खूप संकल्पना लक्षात ठेवाव्या लागतात आणि म्हणून हा विषय बहुतेक विद्यार्थ्यांना डोकेदुखी वाटतो. नरसी मोनजी विद्यापीठात या विषयाची ओपन बुक परीक्षा व्हायची. त्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके, नोट्स वापरण्याची मुभा असायची आणि पेपरमध्ये नुसते फॉर्म्युले, डेरिव्हेशन्स न विचारता (नाहीतर विद्यार्थ्यांनी ते सगळे सरळ पुस्तकांमधून पाहून लिहून टाकले असते.) एखाद्या फाऊंडेशनचे डिझाईन करायला विचारले जात असे. विद्यार्थ्यांनी पुस्तकांमधून, आयएस कोडमधून त्या डिझाईनची प्रक्रिया बघून दिलेल्या डेटावरून डिझाईन करायचे असायचे. ते विद्यार्थी पदवी घेऊन आपापल्या क्षेत्रात गेल्यानंतर जर त्यांना एखादे फ़ाऊंडेशन डिझाईन करायचे असले तर त्यांच्याकडे संदर्भासाठी पुस्तके, आयएस कोडस असतीलच. फक्त त्यांचा वापर करून डिझाईन कसे करायचे, हे कौशल्य त्यांना त्या अभ्यासक्रमात शिकवायचे आहे. आणि म्हणूनच त्यांची तशी परीक्षा घ्यायची आहे हे माझ्या मार्गदर्शकांनी मला सांगितले होते. किती अभिनव कल्पना! अभियांत्रिकीसोबतच इतरही सगळ्याच पदवी परीक्षांसाठी या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना शिकवले गेले आणि तशा पद्धतीने त्यांच्या परीक्षा घेतल्या गेल्यात तर विद्यार्थ्यांचा किती कौशल्यविकास होईल, नाही? नुसते फॉर्म्युले, डेरिव्हेशन्स ही थेअरी लक्षात ठेवून जर एखाद्या विद्यार्थ्याला ते कुठे आणि कसे वापरायचे हे कौशल्य मिळत नसेल तर परीक्षेत चांगले गुण मिळवूनसुद्धा त्याचा उपयोग कुठल्याही क्षेत्रात त्याला आणि समाजालाही होणार नाही.
आणखी एक मुद्दा. वर्षभर शिकवून वर्षाअखेर एका तीन तासांच्या परीक्षेत त्या विद्यार्थ्याचे ज्ञान जोखण्याची जुनी पद्धती कशाला? वर्षभर त्या विद्यार्थ्याने महाविद्यालयात किती प्रोजेक्टस केलेत, किती संशोधन केले, किती विविध कौशल्ये आत्मसात केलीत, त्याची आकलन क्षमता किती आहे, याचे गुणांकन त्या त्या वेळी त्या त्या शिक्षकाने केले तर शेवटी ही परीक्षा घेणे हेच कालबाह्य ठरेल. हे त्या त्या शिक्षकांना हे जोखू द्यात ना. अंतिम तीन तासांच्या परीक्षेचा आणि त्या विद्यार्थ्याने वर्षभर केलेल्या मेहनतीचा संबंध आपल्याला तोडता येणार नाही का?
बरे या अंतर्गत मूल्यमापनात हे शिक्षक जर भेदभावपूर्वक वागणूक करीत असतील तर त्यावरही अंकुश ठेवण्याची यंत्रणा अगदी सहज उभारता येऊ शकते. असलेल्या कौशल्यापेक्षा जास्त मूल्यमापन करण्याचे एखाद्या संस्थेने ठरविले आणि त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांचे ओव्हरव्हॅल्युएशन केले तर ती एक केवळ कागदी सूज ठरेल. कारण असे ओव्हरव्हॅल्युड विद्यार्थी जेव्हा नोकरीसाठी त्या त्या कंपन्यांमध्ये, आस्थापनांमध्ये जातील तेव्हा त्यांच्या या फ़ुगवलेल्या गुणांचे पितळ उघडे पडेल आणि त्या त्या महाविद्यालयाची, विद्यापीठाची विश्वासार्हता धोक्यात येईल. याउलट आकसापोटी जाणूनबुजून एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण प्रदान करणाèयांवरही महाविद्यालयांतर्गत, विद्यापीठांतर्गत कठोर अंकुश ठेवण्याची यंत्रणा राबवता येईल.
थोडक्यात काय, आजची लक्षात ठेवण्याची क्षमता तपासणारी पारंपरिक परीक्षा पद्धती आपल्याला विद्यापीठातल्या पदवी स्तरापासून पुढे नक्की टाळता येऊ शकते. त्याऐवजी विद्यार्थ्यांची कौशल्ये तपासण्याची पद्धती आणायला आजच्या युगात फार श्रम पडणार नाहीत. गरज आहे ती शिक्षणतज्ज्ञांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची आणि त्यांना सरकारमधल्या, विद्यापीठामधल्या, समाजातल्या सर्वच घटकांकडून मिळणाèया अगदी सकारात्मक सहकार्याची.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर/
9922116687
(लेखक गेली तीस वर्षे अभियांत्रिकी अध्यापन क्षेत्रात आहेत.)