वसंत पंचमी आणि त्याचे महत्त्व

    दिनांक :23-Jan-2026
Total Views |
vasant panchami भारतातील धार्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक परंपरांचा अगदी थोडासा अनुभव असलेल्या व्यक्तीलाही हे ठाऊक आहे की, वसंत पंचमी हा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू समाजासाठी हा सण कुटुंबीय व मित्रमंडळींच्या आनंदी पुनर्मिलनाचा दिवस असतो.
 
 

वसंत पन्चमी  
 
 
धार्मिक व ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
हिंदू उपासना परंपरेच्या अभ्यासकांसाठी आणि भारतीय ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांसाठी वसंत पंचमी हा अत्यंत शुभ दिवस आहे. धार्मिक दृष्टिकोनातून, हा माघ नवरात्र कालावधीतील देवीपूजेचा मुख्य दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, हा दिवस एवढा शुभ मानला जातो की कितीही अमंगलकारी योग जरी असले तरीही उपनयन, विवाह आणि इतर शुभ कार्य या दिवशी कोणत्याही संकोचाशिवाय करता येतात.
निसर्गाच्या दृष्टीने खऱ्या नववर्षाचा प्रारंभ
जर आपण निसर्गशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, तर वसंत पंचमी हा वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव आहे. ख्रिश्चन, पारशी, इस्लाम धर्मीयांची नवीन वर्षे ऐतिहासिक कारणांमुळे वेगवेगळ्या वेळी येतात. मात्र, हिंदू नववर्ष (चैत्र महिन्यातील गुढीपाडवा) हे खèया अर्थाने निसर्गनियमांवर आधारित आहे, कारण वसंत हा पहिला ऋतू आहे आणि मेष (अीळशी) राशी ही हिंदू आणि पाश्चात्त्य दोन्ही ज्योतिषशास्त्रांमध्ये पहिली राशी मानली जाते.
वसंताचा सर्वोच्च दर्जा का?
प्रश्न पडतो की ऋतूंचा चक्राकार प्रवास असताना वसंतालाच प्रथम क्रमांक का दिला जातो? त्याचे उत्तर असे की, वसंत ऋतूला निसर्गशास्त्रीय दृष्टिकोनातून विशेष स्थान आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यामुळे ज्याचे अस्तित्व मावळते, ते वसंताच्या आगमनाने पुन्हा फुलते आणि जिवंत होते.
वसंत आणि निसर्ग
उन्हाळ्यात जळलेली पाने, पावसाळ्यात कुजलेली पाने आणि हिवाळ्यात सुकून गळून गेलेली पाने वसंत ऋतूत पुन्हा नवीन अंकुर धारण करतात. पक्षी, विशेषतः कोकीळ, जी हिवाळ्यात गप्प असते, ती वसंत ऋतूमध्ये गोड गाणे गाऊ लागते. म्हणूनच संस्कृत सुभाषितात म्हटले आहे --
‘काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदः पिककाकयोः।
वसंतकाले संप्राप्ते काकः काकः पिकः पिकः।।‘
(कावळा आणि कोकीळ दोघेही काळे असतात, पण त्यांच्यातील फरक वसंत ऋतूत सहज कळतो -- कारण कोकीळ गोड गाते आणि कावळा करकस ओरडतो.)
मानवी जीवनावर परिणाम
फक्त निसर्गावरच नव्हे, तर मानवी मनोवृत्तीवरही वसंत ऋतूचा प्रभाव पडतो.
शारीरिक आणि भावनिक प्रभाव - हिवाळ्यात संथ झालेली जीवनशक्ती वसंत ऋतूमध्ये पुन्हा जागृत होते. म्हणूनच वसंत पंचमीला मदन पंचमी असेही म्हणतात, कारण हा दिवस प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक आहे.
बौद्धिक आणि आर्थिक प्रभाव - लेखक, विचारवंत आणि व्यापारी हिवाळ्यातील मरगळ झटकून नवीन जोमाने कार्यरत होतात. म्हणून वसंत पंचमीला सरस्वती पंचमी (विद्येची देवी) आणि श्री पंचमी (संपत्तीची देवी लक्ष्मी) असेही म्हटले जाते.
सामाजिक आणि धार्मिक प्रभाव- वसंत पंचमी हा परोपकारी कार्यांचा सण आहे. शंकराचार्यजींनीही म्हटले आहे --
‘वसंतवल्लोकहितं चरन्तः।।‘
(वसंत ऋतूप्रमाणे सत्पुरुष नि:स्वार्थपणे समाजकल्याणासाठी कार्य करतात.)
वसंताचे आध्यात्मिक शिक्षण
वसंत फक्त निसर्गाच्या पुनरुत्थानाचा साक्षीदार नाही, तर तो आध्यात्मिक गुरूही आहे.
आत्म्याचे अमरत्व - भगवद्गीतेच्या दुसèया अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात --
‘वासांसि जीर्णानि यथा विहाय - नवानि गृह्णाति नरोऽपराणि।।‘
(जुन्या वस्त्रांचे त्याग करून माणूस नवीन वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो.)
वसंत ऋतूमध्ये गळून पडलेली जुनी पाने नवी पालवी धारण करतात, त्याचप्रमाणे शरीराचे नाश होतो, पण आत्मा अजरामर असतो.
वसंत पंचमी आणि वसंत ऋतू
प्रश्न पडतो की वसंत ऋतू चैत्र महिन्यात सुरू होतो, मग वसंत पंचमी माघ महिन्यात का साजरी करतात? उत्तर सोपे आहे -- हिंदू परंपरेत कोणत्याही गोष्टीचा हिशेब केवळ प्रकट झाल्यानंतर केला जात नाही, तर त्याच्या गर्भधारणेपासून केला जातो.
जसे गर्भधारणेपासून बाळाच्या अस्तित्वाची नोंद केली जाते, तसेच वसंत पंचमी हा वसंत ऋतूच्या आगमनाचा पूर्वसूचक दिवस आहे. गीतेच्या दहाव्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात --
ऋतूनां कुसुमाकरः।।‘
(ऋतूंमध्ये मी वसंत आहे, कारण तो सृष्टीला फुलवतो.)
निष्कर्ष
वसंत पंचमी हा फक्त एक सण नाही, तर निसर्गाच्या पुनरुज्जीवनाचा आणि आध्यात्मिक शिकवणीचा संदेश देणारा दिवस आहे.
भगवंत वसंताप्रमाणे आपले जीवनही सतत नवा जोम, नवी उमेद आणि नव्या आशेने भरू दे.
।। ॐ तत्सत् ।।
परमपूज्य श्री जगद्गुरू शंकराचार्य ब्रह्मलीन स्वामी श्री 1108 श्री भारतीकृष्णतीर्थजी महाराज, गोवर्धन पीठ, पुरी
संस्थापक अध्यक्ष श्री विश्व पुनर्निर्माण संघ, जगद्गुरू परिसर तेलंगखेडी नागपूर.
वसंत पंचमी हा शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ यांचा महासमधी दिवस. त्या निमित्ताने
शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ यांच्या इंग्रजी लेख र्ींरीरपीं रिपलहराळ रपव ळीीींळसपळषळलरपलश चा मराठी अनुवाद
श्रीकांत देशपांडे
विश्वस्त
श्री विश्व पुनर्निर्माण संघ
जगद्गुरू परिसर , तेलंगखेडी नागपूर.