नव्या भस्मासुराचा उदय

    दिनांक :24-Jan-2026
Total Views |
 
दिल्ली अग्रलेख
trump era अमेरिकेची खरी ओळख ही जगातील सर्वांत जुनी लोकशाही म्हणून आहे. पण गेल्या काही वर्षांपासून जगाचा पोलिस अशी ओळख झालेली अमेरिका आता गावगुंडासारखी वागू लागली आहे, असे नाईलाजाने म्हणावेसे वाटते. दुसऱ्याचे घर, जमीन, संपत्ती बळकवावी, तशी अमेरिका आता एकामागे एक जगातील चिमुकले देश बळकवत चालली आहे. अमेरिकेच्या उक्ती आणि कृतीत फारसा फरक उरला नाही. आतापर्यंत जगात कुठेही काही कमी-जास्त होत असेल तर अमेरिका तिथे नाक खुपसायची. नको त्या गोष्टीत नाक खुपसायची अमेरिकेला सवय होती. मात्र रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याच्या आधी अमेरिकेची ही सवय काहीशी मर्यादित होती. म्हणजे अमेरिका ज्या गोष्टीत नाक खुपसायची, त्याचे पटले नाही तर लंगडे का होईना सैद्धांतिक समर्थन अमेरिकेला करता यायचे.
 
डोनाल्ड ट्रम्प  
 
 
पण आता ट्रम्प युगात अमेरिका जगात अस्थिरता निर्माण करत आहे, जगाला तिसèया महायुद्धाच्या दिशेने ढकलत आहे, असे म्हणावेसे लागते. ट्रम्प जगात एकीकडे युद्धसदृश परिस्थिती निर्माण करत असताना दुसरीकडे जगातील सात-आठ युद्धे आपण थांबवल्याचा परस्परविरोधी दावाही करत असतात. भारत आणि पाक यांच्यातील युद्ध आपण थांबवल्याचा अतिशय बालिश तसेच हास्यास्पद दावाही ट्रम्प यांनी आतापर्यंत किमान डझनभरवेळा केला आहे. आपल्याला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा, असा ट्रम्प यांचा अनाठायी आग्रहही आहे. रीतसर मार्गाने शांततेचा नोबेल पुरस्कार मिळत नसल्यामुळे दुसऱ्याच्या हातातील नोबेल पुरस्कार हिसकावून घ्यायलाही ते मागेपुढे पाहात नाही. गंमत म्हणजे अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायलने गाझा पट्टीत बॉम्बवर्षाव करत हजारो निरपराध लोकांची हत्या केली. यात महिला आणि मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तरी ट्रम्प निर्लज्जपणे शांततेच्या नोबेल पुरस्काराची मागणी करत आहेत, हे पाहून हसावे की रडावे ते समजत नाही. कोणताही डोके ठिकाणावर असलेला वा डोके असलेला माणूस अशी मागणी करणार नाही.
 
आता युद्धग्रस्त गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी ‘पीस ऑफ बोर्ड’ म्हणजे शांतता मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी 60 देशांना अमांत्रित केले आहे. यापैकी 21 देशांनी ट्रम्प यांच्या या पुढाकाराला पाठिंबा दर्शवला, म्हणजे या प्रक्रियेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. भारतासह अन्य काही देशांनी या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. जे देश तयार झालेत ते उत्स्फूर्तपणे नाही तर ट्रम्प यांच्या दबावामुळे तयार झाले आहेत. ट्रम्प यांची ही कृती ‘सौ चूंहे खाकर बिल्ली हज को चली’ अशी म्हणावी लागेल. नि:ष्पाप आणि निरपराधांच्या रक्ताने स्मशानभूमी झालेल्या गाझा पट्टीला ट्रम्प यांना आता सुंदर असा बगीचा करायचे आहे. म्हणजे आधी आग लावायची आणि नंतर विझवण्याचे नाटक करायचे अशी ट्रम्प यांची दुटप्पीपणाची वागणूक आहे.
 
जागतिक स्तरावरील सर्व आंतरराष्ट्रीय संघटनांना निष्प्रभ करत ट्रम्प यांना जगात आपले एकमेव नेतृत्व प्रस्थापित करायचे आहे, असे दिसते. मी म्हणेन ती पूर्व अशी त्यांची हुकूमशाहीकडे झुकणारी प्रवृत्ती आहे. जे देश आपले ऐकत नाही त्यांच्यावर आर्थिक निर्बंध ट्रम्प यांनी लादले आहेत, यातून भारतही सुटला नाही. यातून जगाचे आर्थिक संतुलन ट्रम्प यांनी बिघडवले आहे. अनेक देशांसमोर गंभीर स्वरूपाचे आर्थिक संकट उभे झाले आहे. दुसèयांसाठी खड्डा खोदणाèया ट्रम्प यांनी आपल्या नकळत अमेरिकेसाठीही मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. त्यात कोणत्याही क्षणी अमेरिका कोसळू शकते, हे जेव्हा अमेरिकेतील सुजाण लोकांच्या लक्षात येईल, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे आपण कुणाला राष्ट्राध्यक्ष निवडून दिले म्हणून डोके फोडून घेण्याची वेळ अमेरिकेतील जनतेवर एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही.
 
दुसèयांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांची स्थिती ‘आधीच मर्कट त्यात मद्य प्यायलेला’, अशी झाली, असे म्हणावेसे वाटते. अमेरिकेचे खरे हितैषी आपणच आहोत, असे दाखवत आणि तथाकथित राष्ट्रवादाचा बुरखा पांघरत ट्रम्प अमेरिकेच्या लोकांना आपल्यामागे फरफटत येण्यास भाग पाडू लागले. ट्रम्प यांनी मनमानी निर्णय घेत जगाचे संतुलन बिघडवण्यासोबत जागतिक शांतताही धोक्यात आणत आहे, असे म्हटले तर चूक ठरू नये. कधीकाळी जगात अमेरिका आणि रशिया अशा दोनच महाशक्ती होत्या. चीन त्यावेळी महाशक्ती म्हणून जगाच्या खिजगणतीतही नव्हता. नंतर मात्र रशियाचे विघटन झाले आणि जगात अमेरिका ही एकमेव महाशक्ती उरली. त्यामुळे अमेरिकेची जगात दादागिरी सुरू झाली. डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचा पहिला कार्यकाळ हा समाधानकारक म्हणावा असा होता, पण दुसèया कार्यकाळापासून त्यांनी जगात नंगानाच घालणे सुरू केले. ‘आले ट्रम्पच्या मना तेथे कोणाचे चालेना’ अशी स्थिती उद्भवली. माकडाच्या हाती कोलीत दिल्यानंतर जसा तो धिंगाणा घालतो, तसा प्रकार ट्रम्प यांनी सुरू केला. ट्रम्प राजकारणी कमी आणि व्यापारी जास्त आहेत, त्यांच्या वागण्यातून ते पदोपदी जाणवून देतात. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कोणत्याही थराला जायची ट्रम्प यांची तयारी असते.
 
अध्यक्षपदाचा पहिला कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुकीत ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव केल्यानंतर तो पराभव मानण्यास ट्रम्प यांनी नकार दिला. आपल्या बिनडोक समर्थकांना अमेरिकेचे संसद भवन असलेल्या कॅपिटल हिलवर चालून जाण्याची चिथावणी द्यायलाही ट्रम्प यांनी मागेपुढे पाहिले नाही. अमेरिकेच्या आतापर्यंतच्या कोणत्याही अध्यक्षाने अमेरिकेचे केले नाही, एवढे नुकसान एकट्या ट्रम्प यांनी केले, असे नाईलाजाने म्हणावेसे वाटते. जगातील तेलाचे सर्वाधिक साठे असलेला व्हेनेझुएला बळकावल्यानंतर ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता उत्तर गोलार्धातील ग्रीनलॅण्ड या चिमुकल्या बेटावर गेली आहे. व्हेनेझुएला बळकावल्यानंतरही अमेरिकेचे समाधान झाले नाही. त्याने तेथील अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे पत्नीसह अपहरण केले आणि न्यू यार्कच्या तुरुंगात डांबले. त्यांच्यावर अमली पदार्थाचा व्यापार आदी अनेक आरोप करत खटलाही भरला. व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांनी त्यांच्या देशात जे काही केले, त्याचे कोणालाच समर्थन करता येणार नाही, मात्र त्यांच्यावर अशा पद्धतीने कारवाई करण्याचा अधिकार अमेरिकेला कोणी दिला, हा खरा प्रश्न आहे.
 
आधी ग्रीनलॅण्ड हा प्रदेश पैशाच्या बळावर विकत घेण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला, पण तो फसला. आपल्या आर्थिक ताकदीच्या बळावर आपल्याला हवे असलेले प्रांत विकत घेण्याची अमेरिकेची सवय जुनी आहे. याआधी अमेरिकेने अलास्का, लुईझियाना असे प्रांत विकत घेतले आहेत. जे विकत घेऊ शकत नाही, ते लष्करी बळाच्या ताकदीवर बळकवायलाही अमेरिका मागेपुढे पाहत नाही. ग्रीनलॅण्डवर अमेरिकेचा डोळा आजचा नाही तर खूप आधीपासून आहे. 1867 आणि नंतर 1910 मध्ये अमेरिकेने ग्रीनलॅण्ड विकत घेण्याचा प्रयत्न केला, पण तो तेव्हा फसला होता. पण अमेरिकेने आपला हा प्रयत्न सोडला नाही. हिटलरच्या जर्मनीच्या आक्रमणाचा सामना करण्यास सक्षम नसल्यामुळे ग्रीनलॅण्ड बेटाची मालकी असलेल्या डेन्मार्कने अमेरिकेकडे मदतीची मागणी केली आणि अमेरिकेने ग्रीनलँण्ड बेटावर आपला लष्करी तळ उभारत तेव्हा डेन्मार्कचे जर्मनीपासून रक्षण केले. आता त्याची किंमत वसूल करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. बोट पकडायला दिले तर पूर्ण मनगट पकडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न यातून दिसतो आहे. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी ग्रीनलॅण्ड आवश्यक असल्याचा अमेरिकेचा दावा हास्यास्पद आहे. कारण, ग्रीनलॅण्ड अमेरिकेपासून 4800 किमीवर दूर आहे. डेन्मार्क हा चिमुकला देश असला तरी पाकिस्तानसारखी त्याने अमेरिकेसमोर शरणागती पत्करली नाही. डेन्मार्कला पाठिंबा देणाèया देशांवर अमेरिकेन आर्थिक निर्बंध लादण्याचाही इशारा दिला आहे. विशेष म्हणजे फ्रान्स आणि ब्रिटन यासारख्या मित्र देशांनाही अमेरिकेची ही आक्रमक आणि विस्तारवादी भूमिका मान्य नाही. डेन्मार्क हा युरोपचा भाग आहे आणि युरोपीय देशात झालेल्या सुरक्षाविषयक करारानुसार, कोणत्याही एका देशावर झालेला हल्ला हा संपूर्ण युरोपवरील हल्ला मानला जातो. त्यामुळे अमेरिकेने बळकावण्यासाठी ग्रीनलॅण्डवर हल्ला केला तर युरोपातील देश डेन्मार्कच्या मदतीला धावतील, यात शंका नाही. अमेरिकेची लष्करी ताकद आणि समस्त युरोपची ताकद यांची तुलना होऊ शकत नसली तरी संघर्ष उडाला तर तिसèया महायुद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनाही याची जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी सध्या तरी ग्रीनलॅण्डवर हल्ला करणार नाही, अशी कधी नव्हे ती शहाणपणाची भूमिका घेतली आहे. पण डोनाल्ड ट्रम्प हे दिशाविहिन क्षेपणास्त्र आहे. ते कधी काय करतील, कधी पलटतील, याचा भरवसा नाही. एकंदरीत ट्रम्प हे जगाच्या दृष्टीने कधीही बरी होणारी डोकेदुखी झाली असून भस्मासुर ठरत आहे, यात शंका नाही.