पंजाबमध्ये रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट!

मालगाडीचे इंजिन उडाले, लोको पायलट जखमी

    दिनांक :24-Jan-2026
Total Views |
फतेहगढ साहिब,
Explosion on railway track in Punjab पंजाबमधील फतेहगढ साहिब जिल्ह्यात सरहिंद परिसरात रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्री उशिरा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. फतेहगढ साहिब–सरहिंद रेल्वे स्थानकापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरवर ही घटना घडली. रात्री सुमारे अकराच्या सुमारास एक मालगाडी या मार्गावरून जात असताना खानपूर गेटजवळ अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की रेल्वे रुळांचा सुमारे बारा फूट भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि मालगाडीचे इंजिन मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले.
 

railway track in Punjab 
या घटनेत इंजिन चालवत असलेला लोको पायलट जखमी झाला असून त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर अधिक उपचारांसाठी त्याला चंदीगडला हलवण्यात आले. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि रेल्वे व पोलिस प्रशासनाला तातडीने माहिती देण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तपासासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. कायदा व सुव्यवस्था विभागाने सांगितले की स्फोटासाठी कोणत्या स्फोटकांचा वापर झाला, याबाबत सध्या निश्चित माहिती उपलब्ध नाही. आरडीएक्सचा वापर झाला का, याचीही तपासणी सुरू आहे. नुकसानग्रस्त इंजिन पुढील तपासणीसाठी अंबाला येथे पाठवण्यात आले आहे.
 
घटनास्थळी पोहोचलेले रोपर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. नानक सिंग यांनी सांगितले की या घटनेमागे दहशतवादी कारवायांची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. फॉरेन्सिक पथकाने स्फोटस्थळावरून नमुने गोळा केले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथकाने रेल्वे मार्गासह आजूबाजूच्या परिसरात सखोल शोधमोहीम राबवली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्फोट प्राणघातक स्वरूपाचा नव्हता, मात्र इंजिनचे मोठे नुकसान झाले असून एक रेल्वे कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती आणि सध्या पंजाब पोलिस तसेच अन्य तपास यंत्रणा समन्वयाने या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.